म्हणून माझी झेप कधी उंच जाऊ शकली नव्हती


म्हणून माझी झेप कधी उंच जाऊ शकली नव्हती
कारण माझ्या पायतळीची जमीन खचली नव्हती

कसे म्हणू की मी माझ्या मर्जीचा मालक होतो
तुझ्या कैदखान्याची मज हद्दच कळली नव्हती

मनात जे काही घडले ते कळले, दिसले नाही
गडगडाट झाला, मेंदूची वीज चमकली नव्हती

आता पाहू इतकी सुंदर दाद कोण देतो ते
अशी कल्पना याआधी कोणाला सुचली नव्हती

असे बरसले नव्हते आधी मेघ कधी याआधी
आग तुझी याआधी केव्ही अशी भडकली नव्हती

गाठ तुझ्याशी पडल्यावर जन्माची गफलत कळली
`गाठ सुटावी, अशी कुणाशी गाठच पडली नव्हती`

घरात तस्कर रहात होते, आज सिद्ध झाले, पण
कैक पिढ्यांना आधीच्या ही गोष्टच कळली नव्हती

युगाएवढी जखम कपाळावर माझ्या दिसणारच
घाव नभाचा होता, ती मुंगीची टपली नव्हती

-- चंद्रशेखर सानेकर

प्रतिसाद

अप्रतिम गझल आहे. एकसे एक शेर आहेत. फारच मजा आली.

म्हणून माझी झेप कधी उंच जाऊ शकली नव्हती
कारण माझ्या पायतळीची जमीन खचली नव्हती
एक मात्रा जास्त घेउन पहिली ओळ रचतानाच कवी अत्यंत प्रांजळपणे त्याची झेप उंच का जा शकली नाही ते कबूल करतो. एक अत्यंत सुंदर शेर! ज्यांना कधीच कुठल्याही संकटांचा सामना वगैरे करावा लागत नाही त्यांची लौकीक अर्थाने प्रगती होउ शकत नाही असा भाव त्यात आहे.

कसे म्हणू की मी माझ्या मर्जीचा मालक होतो
तुझ्या कैदखान्याची मज हद्दच कळली नव्हती
पहिल्या शेरातील एक जास्त घेतलेली मात्र इथे ऍडजस्ट करुन वर एक आणखीन मात्रा कवी दुसर्‍या ओळीत कमी करत आहे. ही क्रिएटिव्हिटी दुर्मीळ आहे. एकंदर गणित जमले पाहिजे असा एक क्रांतिकारक विचार या निर्मितीमधून पुढे येताना दिसतो. हा शेर इश्वराला उद्देशून आहे. शेर उत्तम आहे.

मनात जे काही घडले ते कळले, दिसले नाही
गडगडाट झाला, मेंदूची वीज चमकली नव्हती
इथे जरा समीक्षा करणे जरुरीचे होउन बसते. मनात गडगडाट झाला अन ते मेंदूला समजले नाही. आता इथे मन एकाचे अन मेंदू दुसर्‍याचा असे असेल तर हे होणे शक्य आहे. पण दोन्ही एकाचेच असेल तर कोणच्या व्यक्तींचे असे होते ते पहायला पाहिजे. म्हणजे मला काय होतेय हे मला कळत नाही हा एक वेगळ्याच स्वरुपाचा प्रॉब्लेम आहे. इथे दुसरे काय करू शकणार? म्हणजे विचारायला जावे की बाबा काय झाले? तर उत्तर मिळेल की कुठे काय झाले? हां! गडगडाट जर मनात न होता मेंदुत झाला असेल अन तरीही मेंदुत वीज चमकली नसेल तर तो अत्यंत भिन्न स्वरुपाचा क्लिष्ट असा मुद्दा ठरेल. त्याच्यासाठी एक समिती नेमावी लागेल.

आता पाहू इतकी सुंदर दाद कोण देतो ते
अशी कल्पना याआधी कोणाला सुचली नव्हती
खरे आहे. अशा कल्पना पहिल्यांदाच येतायत. व्वा व्वा! हा शेर आधीचे दोन-तीन शेर ऐकवल्यानंतर कवी स्वगत स्वरुपात बोलत आहे. की बघुया कोण कोण दाद देतो ते!

असे बरसले नव्हते आधी मेघ कधी याआधी
आग तुझी याआधी केव्ही अशी भडकली नव्हती
सुंदर कल्पना! मात्र यात 'आधी' हा शब्द तीन वेळा आला आहे. त्यातील एक 'आधी' वगळला तर दुसरा शब्द पेरावा लागेल. कारण नाहीतर मग मात्रा जुळायच्या नाहीत.

गाठ तुझ्याशी पडल्यावर जन्माची गफलत कळली
`गाठ सुटावी, अशी कुणाशी गाठच पडली नव्हती`
उत्तम शेर आहे. पण आमच्यामते थोडी गडबड आहे. म्हणजे, 'याआधी सुटावी अशी गाठ कुणाशी पडलीच नव्हती' या विधानाचा अर्थ असा होतो की कवी ज्यांना कुणाला भेटायचा किंवा जे कोण कवीला भेटायचे त्यांच्याशी कवीच्या गाठी कधी सुटायच्याच नाहीत. मात्र ही जी कोण एक व्यक्ति आहे, तिच्याशी गाठ पडल्यावर ती गाठ सुटणारी आहे हे कवीला जाणवले व आत्तापर्यंत आपण 'न सुटणार्‍या गाठी' बांधत होतो ही त्याला आता आपली जन्माची गफलत वाटत आहे. आमच्यामते पहिली ओळ अशी असायला पाहिजे होती. "गाठ तुझी सुटल्यानंतर जन्माची गफलत कळली "किंवा दुसरी ओळ अशी असायला पाहिजे. " गाठ सुटावी कधी न ऐशी गाठच पडली नव्हती".

घरात तस्कर रहात होते, आज सिद्ध झाले, पण
कैक पिढ्यांना आधीच्या ही गोष्टच कळली नव्हती

अतिशय उत्तम शेर. अत्यंत चांगली शब्दरचना!

युगाएवढी जखम कपाळावर माझ्या दिसणारच
घाव नभाचा होता, ती मुंगीची टपली नव्हती
सुंदर शेर आहे.

वा...सानेकरसाहेब, वा !
कोणकोणत्या शेराचा उल्लेख करायचा ?  आख्खी गझलच खणखणीच आहे. सानेकरी शैलीतील उत्तम गझल.