ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे


ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे
ती जे जे झाकत होती ते टाकी आता उघडे

जे रणांगणावर होते त्यांनी समझोते केले
जे छावणीत बसलेले ते करू लागले झगडे

अफवेने त्यांच्या नुसत्या हे जंगल जर घाबरते
असणार पाहिले त्यांनी एवढे भयंकर जबडे

त्यांनीच घेतला आहे एकेक दिशेचा ताबा
जे करती भाषा मोघम, बोलतात शब्द निसरडे

अश्रूंची झाली माती, मातीतुन उठले टाहो
टाहोंचे झाले झेंडे, झेंड्यांना फुटले सरडे

या दुनियेइतके दुसरे कोणीच गबाळे नाही
या दुनियेइतके नाही कोणाचे सुंदर रुपडे

देवाच्या दारापाशी माणूस उभा आहे पण
काळीज फाटके त्याचे, मेंदूचे भांडे उपडे

ही माझी कविता कुठल्या शाळेतुन शिकली नाही
बारीक समजते सगळे पण बोले जाडेभरडे

-- चंद्रशेखर सानेकर

प्रतिसाद

ही गझल बरीचशी समजलीच नाही. माफ करा.

जे रणांगणावर होते त्यांनी समझोते केले
जे छावणीत बसलेले ते करू लागले झगडे       .....सुंदर
अश्रूंची झाली माती, मातीतुन उठले टाहो
टाहोंचे झाले झेंडे, झेंड्यांना फुटले सरडे           .....मार्मिक
ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे
ती जे जे झाकत होती ते टाकी आता उघडे       .....छानच. पण...
एक नम्र बदल सुचवावासा वाटतो...
ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे
ती जे जे झाकत होती ते पडले आता उघडे
टाकी ऐवजी पडले कसे वाटते?
किंवा
ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे
ती जे जे झाकू पाहे ते पडते आता उघडे

कलोअ चूभूद्याघ्या

अश्रूंची झाली माती, मातीतुन उठले टाहो
टाहोंचे झाले झेंडे, झेंड्यांना फुटले सरडे 
 
व्वा ! चळवळींच्या साहित्यालादेखील हा शेर लागू पडेल असे वाटते !
 

पुन्हा तेच...खणखणीत गझल.

ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे
ती जे जे झाकत होती ते टाकी आता उघडे
मार्मिक भाष्य.
अफवेने त्यांच्या नुसत्या हे जंगल जर घाबरते
असणार पाहिले त्यांनी एवढे भयंकर जबडे
वा...वा...वा... सुंदर.
अश्रूंची झाली माती, मातीतुन उठले टाहो
टाहोंचे झाले झेंडे, झेंड्यांना फुटले सरडे
अ प्र ति म
या दुनियेइतके दुसरे कोणीच गबाळे नाही
या दुनियेइतके नाही कोणाचे सुंदर रुपडे
क्या बात है !
ही माझी कविता कुठल्या शाळेतुन शिकली नाही
बारीक समजते सगळे पण बोले जाडेभरडे
वा...वा... हा शेर तर कळसाध्यायच...
विशेषतः दुसरी ओळ.