शे(अ)रो शायरी, भाग-६ : तफरीह का सामान किया जाये

नमस्कार मित्रांनो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या ६व्या भागात आपण सुप्रसिद्ध शायर कतील शिफाई ह्यांच्या एका आशयसंपन्न गझलेचा आस्वाद घेणार आहोत.
ह्या गझलेची चित्र-ध्वनीफित मी आंतरजालावर बघितली आणि त्यातील सर्वच्या सर्व शेर मला अतिशय आवडले. हीच गझल मी तुमच्याशी ह्या भागात शेअर करतोय... बघा किती सुरेख लिहिले आहे ते! मतला असा आहे की-

आओ कोई तफरीह का सामान किया जाए
फिर से किसी वाईज़ को परेशान किया जाए

[ १) तफरीह = करमणूक, विरंगुळा २) वाईज़ = धर्मगुरू ]

शायर म्हणतोय की, चला, विरंगुळ्याचा एखादा मार्ग अथवा उपाय शोधू या. पण तो कोणता; तर ,एखाद्या धर्मगुरूला हैराण करु या. आता आपण म्हणाल की, विरंगुळा आणि धर्मगुरूला हैराण करणे, ह्यांचा आपापसात काय संबंध? तो असा की, धर्मगुरु हा खरे तर दांभिकतेचे एक मूर्तिमंत प्रतीक म्हणूनच प्रसिद्ध(?) आहे, किंबहुना तो दांभिकच आहे. म्हणजे दिवसा लोकांना धर्मानुसार वागण्याचे धडे द्यायचे आणि रात्री स्वत: लपून-छपून ’मैखान्यात’ जायचे. म्हणून तर तो उर्दू शायरांच्या थट्टेचा विषय झाला आहे. गालिबने तर म्हटलेच आहे की-

कहाँ मैखाने का दरवाजा ’गालिब’ और कहाँ वाईज़
पर इतना जानते है कल वो जाता था के हम निकले

अरे, कुठे मैखाना आणि कुठे धर्मगुरू! तो कधीतरी तिथे जाणे शक्य आहे का? पण एक नक्की सांगतो, की काल रात्री मी जेंव्हा मैखान्याच्या बाहेर निघत होतो, त्याच वेळी तो मला आत जाताना दिसला! (आता बोला!)
मग काय! अश्या दांभिक धर्मगुरूची मस्त छेड काढायची, त्याला विचारायचे, " क्यों शेख साहब? कल रात मैखाने में शायद आप भी दिखे थे", मग त्याला उलट-सुलट प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. हे ऐकून तो बावचळेल, आपले पितळ उघडे पडते की काय, ह्या भितीने तो अधिकच कावरा-बावरा होईल, त्याची बोबडी वळेल. मग आपण मन-मुराद हसायचे. त्याच्या ह्या फजितीचा आनंद घ्यायचा. शायर म्हणतोय की, अश्या आत एक आणि बाहेर एक असणाऱ्या शेख-साहेबांना वारंवार त्यांच्या दांभिकतेवरून छेडण्यात एक औरच मजा येते.

बे-लरज़िश-ए-पा मस्त हो उन आँखो से पी कर
यूँ मुहतसीब-ए-शहर को हैरान किया जाए

[ १) लरज़िश= थरथर, थरकाप, २) पा=पाय ३) बे-लरज़िश-ए-पा= पाय थरथर न कापता सुद्धा ४) मुहतसिब= लोकांनी मद्यपान करु नये म्हणून त्यांच्यावर नजर ठेवणारा ]

वा! भलताच अनोखा कल्पना-विलास आहे! मुहतसिब हा असा एक अधिकारी असतो की जो लोकांनी मद्यपान करु नये म्हणून त्यांच्यावर नजर ठेवून असतो.
पण शायर म्हणतोय की आपण आता खुद्द मुहतसिबालाच, जरा ’रोमँटीक तरीकीसे’ हैराण करु या. ते स्वत: लोकांवर, त्यांनी मद्यपान करु नये म्हणून पाळत ठेवून असतात ना, मग आपण त्यांनाच धुंद करु यात ! मद्यधुंद माणसाचे पाय जसे थरथर कापतात, तसे त्यांचे पाय कापणार तर नाहीत, पण ते धुंद होतील! पण हे कसे? तर ती शराबी डोळे असलेली सांकी, जिच्या नुसत्या ’नजरेनी पिऊनच’ लोक मदहोश होतात, तिला वारंवार त्यांच्यासमोर आणायचे! मग त्यांची काय मजाल की ते साकीचे शराबी डोळे बघून मदहोश होणार नाहीत? वारुणीचा एक थेंबही नाही, पायात थरथर नाही, पण मनाची अवस्था मात्र एकदम धुंद! ( अशी अवस्था झाल्यावर ते नंतर कुणावरही पाळत ठेवायचे कदाचित विसरूनच जातील). क्या बात है!

हर शय से मुक्क्दस है खयालात का रिश्ता
क्यूँ मस्लहतो पर इसे कुर्बान किया जाए

[ १) शय= वस्तू, गोष्ट २) मुकद्दस = पवित्र, महान ३) मस्लहत = मसलत, सल्ला, उपदेश; विवेक, शहाणपण ]

ह्या शेराचा अर्थ मला सुरुवातीला नीटसा उमगला नाही. काही जाणकारांना विचारुनच तो आपल्या समोर ठेवतो आहे. भावार्थ फार छान आहे. शायर म्हणतोय की तुमचे तुमच्या स्वत:च्या विचारांशी असलेले नाते हे इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यात तुमची स्वत:ची एक इंडीव्हीजुऍलिटी आहे. मग असे जर आहे, तर इतरांशी सल्ला-मसलत करून असे उगाचच का विचारावे की," का हो, मला ह्या बाबतीत असे-असे वाटते आहे,माझे मत असे आहे; हे योग्य की अयोग्य?". असे विचारून आपल्या ओरिजिनॅलिटीला आपण उगाचच सॅक्रिफाईस करतो. एक विचार प्रवाह मला असा ही कळला की, आपण जर एखादी चांगली गोष्ट करण्याच्या विचाराने झपाटलेले असू, तर मग ती करण्याआधी आपल्या विचारांना उगाचच विवेक आणि शहाणपणाच्या कसोटीवर तपासत बसू नये. जस्ट फॉलो युवर ओन पॅशन अँड थॉटस.
(जाणकारांनी ह्यावर कृपया अधिक भाष्य करावे)

मुफलिस के बदन को भी है चादर की ज़रूरत
अब खुल के मज़ारो पर ये ऐलान किया जाए

[ १) मुफलिस = गरीब, २) मज़ार = फकीराची समाधी ३) ऐलान = घोषणा ]

हा शेरात तर पक्क्या बंडखोर बुद्धीवादी विचारांचे प्रतिबिंब पडले आहे. कवि म्हणतोय की हे लोक, जे एखाद्या फकीराच्या समाधीवर चादरीवर चादरी चढवतात, तेंव्हा त्यांना ह्याची जाणीव तरी असते का, की थंडीने कुडकुडणाऱ्या एखाद्या गरीबाच्या शरीराला सुद्धा अश्याच एखाद्या चादरीची गरज आहे? अश्या आंधळ्या भक्तांना हे उच्चरवाने आणि ठणकावून सांगणे आता जरुरी आहे की पैगंबरवासी झालेल्या एखाद्या फकीराच्या समाधीवर चादर चढवायच्या आधी, जो जिवंत आहे, त्याच्या देहाची चिंता करा. त्या गरीबाला सुद्धा चादरीची तेव्हढीच गरज आहे;किंबहुना त्याच्या उघड्या अंगावर आधी चादर घालणे हाच खरा-खुरा धर्म आहे.

वो शक्स जो दीवानो की इज़्ज़त नहीं करता
उस शक्स का चाक गिरेबान किया जाए

[ १) शक्स= व्यक्ती, २) चाक गिरेबान करना = दु:खातिशयाने अंगावरील कपडे फाडणे ]

असे म्हणतात, की जेंव्हा एखादा माणूस दु:खाने वेडा-पिसा होतो, तेंव्हा तो आपल्या अंगावरील कपडे फाडतो. अश्या वेड्या झालेल्या व्यक्तीच्या वाट्याला बहुदा हेटाळणीच येते. त्याची वेदना काय होती, त्याचे दु:ख कशामुळे होते, ह्याचा, त्याच्या भूमिकेत जाऊन, सहानूभूतीपूर्वक विचार करताना, कधीच कोणी दिसत नाही. कवि म्हणतोय की, असे जे संवेदनाशून्य लोक आहेत, ज्यांना अश्या वेड्याच्या वेदनेची तसूभरही जाणीव नाहीय, त्यांच्याही अंगावरचे कपडे कधी कुणी फाडावेत. म्हणजे त्यांनाही अश्या हृदय विदीर्ण करणाऱ्या वेदनेची कल्पना येईल. दीवानो की इज़्ज़त करना ह्या मधे कविला असे म्हणायचे आहे की अश्या वेड्या-पीराची वेदना, किंवा अश्या जातीच्या वेड्यांची वेदना, व्यथा, त्यांच्या ठिकाणी स्वत:ला ठेवून समजून घ्या. किंबहुना अशी वेदना जो पर्यंत तुमच्या वाट्याला येत नाही, तो वर तुम्हाला त्या दीवान्याचे दु:ख काय होते ते कधीच कळणार नाही.

पहले भी 'कतील' आँखो ने खाए कई धोखे
अब और न बीनाई का नुकसान किया जाए

[ १) बीनाई= दृष्टी ]

ह्या शेरातील भावार्थ अगदी सोपा असा आहे की, आता पर्यंतच्या आयुष्यात माझ्या नजरेने माणसे ’पारखण्यात’ नेहमीच चूक केली आहे. ज्या नात्यात खरे तर भावनांचे मृगजळच होते, तिथे मी भावनेच्या ओलाव्याची अपेक्षा करत आलो, आणि फसत गेलो! परंतु ह्या पुढे मात्र मी खबरदार राहणार आहे. आता मी अश्या कुठल्याही भुलाव्याला भुलणार नाही, आणि ह्या पुढे माझ्या दृष्टीला -जिने आता पर्यंत अनेक घाव सहन केले आहेत, अधिक जखमी होऊ देणार नाही.
चला तर भेटू या पुढच्या भागात! बाय-बाय!
-मानस६

प्रतिसाद

हर शय से मुक्क्दस है खयालात का रिश्ता
क्यूँ मस्लहतो पर इसे कुर्बान किया जाए

मानस,

या शेराचा मला जाणवलेला अर्थ!

कोणत्याही लौकीक गोष्टीमुळे बनलेल्या नात्यापेक्षा (जसे पैसा, रक्ताचे नाते वगैरे) मनाच्या नात्याचे पवित्र अपरंपार आहे. केवळ काही व्यवहारी तत्वज्ञानाच्या आहारी जाऊन अशा नात्यांना का सोडावे, का कुर्बान करावे?

========================================

माझ्या माहितीप्रमाणे शेख / वाईज / जाहिद हे भोंदू नसायचे, ते कडक असायचे. मात्र शायरांच्या तबीयतला ते नियम मंजूर व्हायचे नाहीत म्हणून 'ते भोंदू आहेत' असे शायरीत नोंदवून त्यांची टर उडवली जायची.

============================================

आपली लिखाणाची शैली, विशेषतः या मालिकेबाबत तर. फारच छान आहे.

===================================================
वो शक्स जो दीवानो की इज़्ज़त नहीं करता
उस शक्स का चाक गिरेबान किया जाए

यात 'गिरेबान चाक' याला एक सांकेतिक अर्थ आहे असे मला वाटते. 'कॉलर फाटणे' हे बेईज्जत होणे आहे असा त्याचा अर्थ असावा. जो माणूस आशिकांना यथोचित सन्मान देत नाही त्यालाही ('उस शक्स का भी' यातील 'भी' राहिला असावा असे वाटले, कृपया कळवावेत) बेईज्जत करावे, असा मला त्याचा अर्थ जाणवला.

====================================================

आपली ही मालिका फार आवडते.

=================================

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आपले खयालात के रिश्ताचे स्पष्टीकरण अगदी पटण्यासारखे आणि तार्किक आहे.
मी मूळ गझल बघितली, परत एकदा, त्यात 'भी' नाही आहे, (मला सुद्धा असेच वाटले होते आधी)
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
-मानस६

आपली ही मालिका सुंदर आहे!

सुंदर मालिका! धन्यवाद!
तुमची आणि भूषणरावांची चर्चा पण मस्तच.
वृत्ताच्या दृष्टिने "भी" गरजेचा आहे. युट्युब वर गझल वाचनाच्या विडियो मधे ह्या शेर मधे "भी" आहे:

http://www.youtube.com/watch?v=vnh42XEWuwo&feature=player_embedded#!

धन्यवाद हेमंत,
मी प्रशासकांना 'भी'जारोपण करण्याची विनंती करतो. :)
हेमंत, आनंदयात्री..आपल्या प्रतिसादाबद्दल आभार
-मानस६

उपक्रम खूप चांगल आहे.

पहिल्या शेरात,
आओ कोई तफरीह का सामान किया जाए
फिर से किसी वाईज़ को परेशान किया जाए

अरबी सन्स्क्रुती मधे करमणूक व्यर्ज आहे.
तिथे 'मुतव्वा' हा धर्मगुरु फिरत असतो, कुणी गाणं म्हणतय का,
कुणी करमणूकी साठी एकत्र येतय क ते पाहायला..

तिथे बगीचे नाहीत, सभाग्रुह नाहीत..

कदाचित म्हणून,
त्या धर्मगुरुला आपण करमणूकिचे सामान एकत्र करुन
मनस्ताप देउया का?
अश्या अर्थाचे काही???

-बे-लरज़िश-ए-पा मस्त हो उन आँखो से पी कर
येथेही,

मद्य प्यायल्याची कुठलिही लक्शणे दिसणार नाहित अशी डोळ्यांची मदिरा पिउन
धूंद हो, अणि वरिल अर्थानेच परत...

यूँ मुहतसीब-ए-शहर को हैरान किया जाए
ते आश्चर्य चकीत होतील की मी तर पाळत ठेउन होतो,येथे तर कुणीच मद्यपान केले नही मग ही नशा कसली?

येथे 'पी कर' म्हटले आहे, पिलाकर नाही,
मुहतसीबला पाजुया नाही म्हटले,
तर आपण पिउया.

अश्या अर्थाने बघता येइल का वरिल शेरांकडे?

मनीषा,
आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आपण सांगितलेले दोन्ही अर्थ अतिशय तर्क-संगत आहेत.
विशेषतः मुहतिसिब ह्या शेराचा जो अर्थ आपण लावला आहे तोच अर्थ श्री. मिलिंद फणसे ह्यांनी सुद्धा मनोगत ह्या संकेत-स्थळावर मांडला आहे, आणि तो अगदी पटण्यासारखा आहे.
तफरीह मधे मला अर्थाची जी शेड दिसली, जी मी मांडली. पण आवश्यक तेथे मी अर्थात नक्कीच दुरुस्ती करेन.
धन्यवाद.
-मानस६

हीच तर खर्‍या शायरीची गंमत आहे ना , की
खुप अर्थाने तिचा आस्वाद घेता यावा!

धन्यवाद!
मागे पहिल्या भागात मी गालिब च्या शेराबद्दल बोलणार होते, परंतु प्रवासात अस्ल्याने राहुन गेले,
त्या भागातच सांगते, वाचाल....