मान्यवरांची गझल

मान्यवरांची गझल

दीनांच्या चाकरीसाठी : लोकशाहीर वामनदादा कर्डक


भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.


उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.


निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्‍यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.


भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.


तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे.

मला वाचवा: घनःश्याम धेंडे


"मला वाचवा, मला वाचवा" मरण बोलले
"बसू लागले चटके मजला" सरण बोलले


स्थलांतराचे दु:ख काय ते मला विचारा
"मी ही आहे ग्रस्त खरे तर" धरण बोलले


टिकून आहे उमेद माझी चालायाची
"थकून गेली वाटच पण ही" चरण बोलले


झुणका-भाकर, कांदा, ठेचा कुठवर खाऊ
"बासमतीचा भात कुणी द्या" वरण बोलले


तळे पाहुनी तृषार्त मी मग धावत सुटलो
"मृगजळ कुत्सित हसले होते" हरण बोलले


ह्रदय घेवुनी आईचे पळताना पडता...
"कुठे लागले बाळा?" अंतःकरण बोलले


घनःश्याम धेंडे
पुणे

मा.शंकर वैद्यांची गझल

काव्य संग्रहः दर्शन

मी खिन्न गीत गाता त्या कोण रोधिताहे?
आता मना कळे की आनंद येत आहे

मी व्यर्थ या विराण्या छेडीत,गात आलो
चित्तातल्या झर्‍याचा  उलटा स्वभाव आहे

या कातळामधूनी, गर्भातूनी मनाच्या
आनंद अमृताचा वर्षाव होत आहे

सृष्टीच मोर झाली, उत्फुल्ल हे पिसारे
डोळे मिटून घेणे हे पाप होत आहे

वारा फिरे सुखाचा अन् चांदणे दिगंती
'मी या जगात आहे', हे हेच सौख्य आहे


(जयन्ता५२)

 

फोटो : डॉ.श्रीकृष्ण राऊत


ना झोपतो, ना जागतो, मी वागतो वेड्यापरी;
तंद्रीत एका वेगळ्या मी राहतो वेड्यापरी.


सत्यात अन् स्वप्नातही झाल्या किती भेटी तुझ्या;
रात्रंदिनी बोटावरी मी मोजतो वेड्यापरी.


वेणीत जी तू खोवली  होती गुलाबाची फुले;
एकेक त्यांच्या पाकळ्या सांभाळतो वेड्यापरी.

नाते मला लागे पुसू,  "आहेस माझी कोण तू?"
प्रश्नास ह्या साध्यासुध्या मी हासतो वेड्यापरी.


होणार ते होवो उद्या त्याची न मजला काळजी;
प्रेमात माझ्या आजच्या मी झिंगतो वेड्यापरी.


वरात : डॉ. श्रीकृष्ण राऊत

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;
अजूनही तशीच तू तनामनात राहिली.


अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.


शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली.


कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली.


पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला;
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली.

('गुलाल आणि इतर गझला' संग्रहातून)

घनश्याम धेंडेंची गझल


कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे
लाखोंमधुनी मला हेरुनी हाक बाहिली आहे


ओलेतीची कवी-कल्पना असेल त्यांच्यासाठी
धुवांधार पावसात माझ्यासवे नाहिली आहे


बोलत असते माझ्याशी ती फूलपाखरी भाषा
महाल बांधुन दवबिंदूचा त्यात राहिली आहे


हात लावुनी पहा हवे तर, कशास खोटे बोलू
शब्दांशब्दांमधून माझ्या कशी काहिली आहे


जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे

समर्पण : डॉ. श्रीकृष्ण राऊत



समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते;
मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते.

 

झोप सुखाची, चैन जिवाची, खुशी मनाची;
अशी आपली दौलत सारी प्रेम मागते.

 

आनंदाचे देणे-घेणे करते नगदी;
आठवणींची किती उधारी प्रेम मागते!

 

कधी रातच्या विलायचीला नाही म्हणते;
कधी दुपारी पान सुपारी प्रेम मागते.

 

शेजेवरती सांगे ताबा घरी रुक्मिणी;
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते.

 

(असंग्रहित/प्रसिद्धी: कविता-रती/दिवाळी अंक २००४)        

पहारा : डॉ. श्रीकृष्ण राऊत



तुला पाहिजे तसे वाग तू ;
भल्या बुऱ्याला लाव आग तू.


उगाच खोटी भीड कशाला ;
हक्क आपला तिला माग तू.


कुठे अचानक गायब झाले ;
त्या सत्याचा काढ माग तू.


जमेल जेथे मैत्र जिवाचे ;
तिथे फुलांची लाव बाग तू.


मनात नाही त्याच्या काही ;
नकोस त्याचा धरू राग तू.


अजून नाही रात्र संपली ;
सक्त पहारा देत जाग तू. 


(प्रसिद्धी: 'कविता-रती' दिवाळी अंक २००६)

Pages