मा.शंकर वैद्यांची गझल

काव्य संग्रहः दर्शन

मी खिन्न गीत गाता त्या कोण रोधिताहे?
आता मना कळे की आनंद येत आहे

मी व्यर्थ या विराण्या छेडीत,गात आलो
चित्तातल्या झर्‍याचा  उलटा स्वभाव आहे

या कातळामधूनी, गर्भातूनी मनाच्या
आनंद अमृताचा वर्षाव होत आहे

सृष्टीच मोर झाली, उत्फुल्ल हे पिसारे
डोळे मिटून घेणे हे पाप होत आहे

वारा फिरे सुखाचा अन् चांदणे दिगंती
'मी या जगात आहे', हे हेच सौख्य आहे


(जयन्ता५२)

 

प्रतिसाद

वारा फिरे सुखाचा अन् चांदणे दिगंती
'मी या जगात आहे' हे हेच सौख्य आहे

अगदीच बाळबोध, वैद्य ठेवणीतली रचना . नाजूक, हळूवार, अलगद वगैरे वगैरे ... म्हणजे  अगदी स्वरगंगेच्या काठावरची...
ग़ज़ल म्हणवत नाही या गीताला.
कोजागिरी पौर्णिमेला सदाशिवपेठेत एखाद्या लेले, साठे, गोखले,  परांजप्यांच्या गच्चीवर, मसाला दुधाबरोबर चघळायला ठीक आहे.
आपला,
(तौलनिक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वैद्यांची वरील रचना गीत आहे, गझल नाही- काही प्रमाणात मान्य आहे.
रचना बाळबोध आहे- मान्य नाही.

मराठी कवितेचे दुर्भाग्य हेच , की जे जे काही चांगले आहे , ते ते दुर्लक्षित आणि जे काही क्रुत्रिम,  निकस  ते ते अतिप्रसिध्द आणि लोककौतुकपात्र ठरत आले आहे. आणि म्हणूनच,उद्या चालुन सुधीर मोघे , प्रविण दवणे , संदिप खरे, सौमित्र ,नलेश पाटिल , अशोक नायगावकर आणि तत्सम "मान्यवर "  मराठी भाषेतले महान कवी म्हणून गणले गेल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.
बाकी वरील रचनेच्या बाबतीत मी धोंडोपंतांशी मी बर्याच अंशी सहमत आहे.

कविता चांगली-वाईट तसेच कवी महान-सामान्य हे ब-याच प्रमाणात व्यक्तिनिष्ट असून आपण ते लोकांच्या हवाली सोडून द्यावे. येणारा काळच ते ठरवेल. आपण काय करू शकतो तर आपल्या मते ज्या चांगल्या रचना असतील त्या पुढे आणू शकतो. दुर्लक्षित कवींना लोकांपर्यत पोहचवू शकतो. बाकी अनंत म्हणतो त्या प्रमाणे
`मराठी कवितेचे दुर्भाग्य हेच , की जे जे काही चांगले आहे , ते ते दुर्लक्षित आणि जे काही क्रुत्रिम,  निकस  ते ते अतिप्रसिध्द आणि लोककौतुकपात्र ठरत आले आहे.'
ही वस्तुस्थिती आहेच.

प्रिय अनंत,
तुझ्या दृष्टीने मराठीतील सकस कवीं कोण कोण ? त्यांची नावे 
कारणमीमांसेसकट जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.    
काव्याचा तुझा खूपच सखोल अभ्यास दिसतो. त्याला शुभेच्छा.

- केदार पाटणकर

धोंडोपंत,
मताशी ब-याच अंशी सहमत.

- केदार पाटणकर 

आधुनिक युगातील खालील कवी मला महत्वाचे वाटतात्...अभ्यास -मीमांसा वगैरे  काही नाही..
केशवसुत,बी. रघुनाथ,बा. सी .मर्ढेकर,आरती प्रभू,सुरेश भट ,मनोहर ओक आणि तुळ्शी परब..काही प्रमाणात वसंत आबाजी डहाके आणि ग्रेस देखील..
बाकी समीर म्हणतो त्याप्रमाणे हे सर्व सापेक्ष आहे..
 
 

श्री . अनंत ढवळे यांनी दिलेल्या नावात आम्ही  आमच्या आवडीच्या दोन नावांची भर घालतो. एक म्हणजे भा.रा.तांबे आणि दुसरे नामदेव ढसाळ.
नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा'बद्दल  आमचा लेख इथे वाचता येईल.
आपला,
(विद्रोही) धोंडोपंत
 

अनंताच्या दोन्ही मतांशी सहमत आहे..
त्यायोगे धोंडोपंत यांच्याशी सुद्धा..
आणि सर्वात महत्वाचे,
वरील रचनेत काफिया आहे का?
'आहे' हा रदीफ असेल तर तो पहिल्या ओळीत का नाही?
ना बाबा ना... या रचनेला गझल नाही म्हणवत..

अनंताच्या दोन्ही मतांशी सहमत आहे..
त्यायोगे धोंडोपंत यांच्याशी सुद्धा..

अनंताच्या दोन्ही मतांशी सहमत आहे..
त्यायोगे धोंडोपंत यांच्याशी सुद्धा..

काही नम्र मते:

१. तौलनिक व विद्रोही धोंडोपतांचे मत - कोजागिरी पौर्णिमेला सदाशिवपेठेत एखाद्या लेले, साठे, गोखले, परांजप्यांच्या गच्चीवर, मसाला दुधाबरोबर चघळायला ठीक आहे. - गझल कशाबरोबर ऐकायची / आस्वाद घ्यायचा याबाबतची आपली अधिक मते समजल्यास बरे वाटेल. माझ्यामते, केव्हाही कशाबरोबरही गझलेचा आस्वाद घेण्याची मनस्थिती असावी, लेल्यांची गच्ची, कदमांची ओसरी, शेख यांचे टेरेस, डिसुझांचे परस अशा अटी कृपया लावू नयेत. सदाशिवपेठेत अख्खे लहानपण गेल्याने मला व्यक्तिशः आपल्या मतावर हे लिहावेसे वाटले इतकेच! माफ करा, हा प्रतिसाद गझलेवर नाही, पण आस्वादाबाबत नक्कीच आहे.

२.डॉ.अनंतशी २००% सहमत! तसेच, माझे एक वैयक्तिक मत की संदीप खरे ही व्यक्ती नेमकी कवी नसावी. पाडगावकर साहेबांच्या गझल या पुस्तकात बाराखडीच्या नियमांनुसार बर्‍याच त्रुटी आढळल्या. बा सी मर्ढेकरांबरोबरच आपल्या यादीत दिलीप चित्रेही असावेत की काय असे मला वाटले. विशाखापुरते कुसुमाग्रजही असावेत. मर्ढेकर मात्र फारच वर!

३.जनार्दन केशव म्हात्रेसाहेब - रचनेत काफिया असावा असे माझे मत आहे.

४. माझ्या दृष्टीने एक महत्वाचे मत - जे लिहिण्यासाठी मी खरे तर हा प्रतिसाद दिला. या गझलेचा आशय वाचून ही गझल मसाला दूध पीत लेल्यांच्या वगैरे गच्चीवर ऐकण्यासारखी आहे असे मत दिले गेले आहे, याचाच अर्थ, गझलेकडून 'आशयाशी ' संबंधित अशी एक रसिकांची अपेक्षा असते हे सिद्ध होत असावे. तसे असेल तर ती अपेक्षा नेमकी कशी असते यावर जाणकार काही सांगतील काय? कृपया सांगावे असे माझे नम्र आवाहन आहे.

मी उगाचच एक जुनी गझल व काही वाद वर आणण्यासाठी हे लिहिले नाही याची कृपया शाश्वती ठेवावी. माझा यत्न इतकाच आहे की गझलेचा आशय नेमका काय असावा यावर फक्त मतप्रदर्शन व्हावे. धन्यवाद!

'संदीप खरे ही व्यक्ती नेमकी कवी नसावी'
'नेमका कवी' नेमका कसा असतो? आपली याबाबतची मते प्रचंड चिंतनीय असतात म्हणून विचारले.

वरील रचना 'गझल' वाटत नाही, या सर्वमान्य मताशी मीदेखील सहमत आहे.

अर्थात कुसुमाग्रज, विंदा, बालकवी, पाडगावकर, संदीप खरे वगैरे 'गम्य' लिखाण करणारे(ही) मला कवीच वाटतात.

आपण विचारलेला प्रश्न व त्याचे उत्तर या रचनेशी संबंधित नसल्यामुळे मी व्यक्तिगत निरोपातून आपल्याला कळवत आहे. त्यापुर्वी 'नेमका' हा शब्द वगळून तो कवी नाही आहे असे वाचावेत अशी विनंती! बाकी विंदा, कुसुमाग्रज, पाडगावकर यांच्याबद्दल मी तसे काही म्हणू शकतही नाही व म्हणालेलोही नाही. तेव्हा, आपल्याप्रमाणेच मीही त्यांना अर्थातच कवी मानणारच!