लागली आहे समाधी स्तब्ध पानन् पान माझे



लागली आहे समाधी स्तब्ध पानन् पान माझे
लागले आहे दिसू माझ्यात आता रान माझे

मिळकतीच्या वंचनेतुन जीव माझा मुक्त झाला
फायद्याचे वाटते आहे मला नुकसान माझे

ठीक झाले मी उलट उत्तर दिले नाही कुणाला
जाउनी नडतील दुनियेला अता अपमान माझे

देव माझ्याहून मजला वाटतो जर भिन्न, म्हणजे
लाभले नाही मला अद्यापही वरदान माझे

तू नदी आहेस पण येशील तर ये पूर होउन
मी कधीचे ठेविले आहे खुले मैदान माझे

कोण जाणे काय शोधे टाळुनी संसार अपुला
हिंडते वाऱ्याबरोबर एक हिरवे पान माझे

ती समजली की तिला देईन मी शोधून वाटा
मी समजलो की तिला ठाऊक आहे रान माझे

एकदा मी देव झालो आणि या कैदेत पडलो
हे हजारो जीव आता रोज खाती कान माझे

-- चंद्रशेखर सानेकर


प्रतिसाद

सुंदर गझल आहे. काही काही शेर तर फारच छान आहेत. धन्यवाद!

छान गझल.
देव माझ्याहून भिन्न आहे या शेरात 'म्हणजे'च्या ऐवजी कारण शब्द वापरला तर बरे वाटेल असे वाटते. आग्रह नाही.

ठीक झाले मी उलट उत्तर दिले नाही कुणाला
जाउनी नडतील दुनियेला अता अपमान माझे

कलोअ चूभूद्याघ्या

सानेकरांच्या अक्षरगणवृत्तातील गझला वाचण्याचा आनंद वेगळाच.
ही गझल तो आनंद पुरेपूर देते...
लागली आहे समाधी स्तब्ध पानन् पान माझे
लागले आहे दिसू माझ्यात आता रान माझे
सुंदर...
ठीक झाले मी उलट उत्तर दिले नाही कुणाला
जाउनी नडतील दुनियेला अता अपमान माझे
मस्त...
तू नदी आहेस पण येशील तर ये पूर होउन
मी कधीचे ठेविले आहे खुले मैदान माझे
वा...वा...वा...
एकदा मी देव झालो आणि या कैदेत पडलो
हे हजारो जीव आता रोज खाती कान माझे
सुरेख...