बाहुली
पाखराला हीच चिंता मामुली...!
का नसे मैत्री नभाशी आपुली ?
जाळ येथे जास्त; तर तेथे कमी...
शेवटी साऱ्याच मातीच्या चुली !
नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, मान्यता...
ठेव बाजूला जराशा या झुली !
भासही आता खरे होती कुठे ?
भास हे नाहीत; त्यांच्या चाहुली !
पाहिले जेव्हा मला त्याने सुखी....
दुःख गेले दूर...आल्यापाउली !
फार मी सांभाळतो; जपतो तिला -
वेदना अद्याप माझी तान्हुली !
वाकलेली जख्ख म्हातारी कुणी...
शोधते का बालपणची बाहुली ?
-- प्रदीप कुलकर्णी
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 03/11/2008 - 05:30
Permalink
बाहुली शेर.
बाहुली शेर वाचून वाईट वाटले. खूप अर्थपूर्ण शेर आहे.
वेगळ्याच ओळी आठवल्या ( त्यांचा या गझलेशी संबंध नाही हे माहितीय पण आठवल्या ).
मुहल्लेकी सबसे पुरानी निशानी
वो बुढिया जिसे बच्चे कहते थे नानी
ज्ञानेश.
सोम, 03/11/2008 - 12:20
Permalink
सुरेख..
अप्रतिम शेर-
पाहिले जेव्हा मला त्याने सुखी....
दुःख गेले दूर...आल्यापाउली !
'बाहुली' पण छान.
ज्ञानेश.
सोम, 03/11/2008 - 12:21
Permalink
आजानुकर्ण
मंगळ, 04/11/2008 - 04:51
Permalink
वा
वाकलेली जख्ख म्हातारी कुणी...
शोधते का बालपणची बाहुली ?
खल्लास! क्या बात है प्रदीपराव, काळजाचा ठोका चुकला हो शेर वाचताना.
जयानन्द
मंगळ, 04/11/2008 - 10:19
Permalink
अप्रतिम गझल
तसे सर्वच शेर अप्रतिम आहेत, पन मला हे शेर आवदले
पाखराला हीच चिंता मामुली...!
का नसे मैत्री नभाशी आपुली ?
पाहिले जेव्हा मला त्याने सुखी....
दुःख गेले दूर...आल्यापाउली !
पुलस्ति
गुरु, 06/11/2008 - 17:24
Permalink
वा!
चुली आणि बाहुली हे शेर फार आवडले!!