पालखी

'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी
डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी?

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)

आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी!

दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी!
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?

आयुष्या, जगलो, तुला भोगले - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८.

गझल: 

प्रतिसाद

चक्रपाणि,

गझल आवडली.

खोळंबली ना सखी>>या शेरातला सहजपणा फार आवडला
दुर्दैव..आणि पालखी हे पण शेर खूप आवडले

आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! .... हा हा हा. मस्त.
मनासारखी, आणखी ... आवडले.
छान.
मतल्यात लगक्रम बदलला आहे असे वाटते.

सुरेख गझल. आषाढ अगदीच अप्रतिम!!!!

'विस्मरणे' आणि 'सखी' हे दोन शेर सुरेख वाटले !

आषाढ, विस्मरणे.....जबरी !!
मक्ता पण खासच !!

खुप आवडली. आषाढ, पालखी आवडले.

आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?

दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी!
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?

वा:! मस्तच!

सगळेच शेर उत्तम आहेत,..काही ठिकाणी किंचीत अडखळल्यासारखे वाटले... उत्तम गझल
दुर्दैवा..खास
-मानस६

तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी
फारच छान तोड्च नाहि......

मस्त गझल...
वा....