मोगरा

रंगलास तू खुडून मोगरा
लपविलास तू म्हणून मोगरा

भाळले गुलाब शेकड्यावरी
माळला तुला बघून मोगरा

रंग उधळलेस तू कितीतरी
पांढरा असे अजून मोगरा

घेतला गुलाब, बोचलाच तो
नेमका तिथे हसून मोगरा

पाहतो नभात रंग केवढे
एकटाच सावरून मोगरा

काळजात प्रश्न एवढाच की,
बोचला कसा... असून मोगरा ?

वाट वाकडी किती पहायचा
जायचा किती सुकून मोगरा

गझल: 

प्रतिसाद

खुप. छान. नभात रंग, वाट वाकडी आवडले.

काळजात प्रश्न एवढाच की,
बोचला कसा... असून मोगरा ?

वा! सुरेख गझल.

बोचला कसा .... असून मोगरा

छान शेर आहे.

काळजात प्रश्न एवढाच की,
बोचला कसा... असून मोगरा ?

अप्रतिम !

डॉ.कैलास

मोगरा आवडतोच :)
बोचला कसा. .... असून मोगरा !! मस्तच !!
बहर खूपच छान आहे.

प्रताप, क्रान्ती, बेफिकीर, कैलास, जयश्रीताई धन्यवाद!

काळजात प्रश्न एवढाच की,
बोचला कसा... असून मोगरा ?
खास.

घेतला गुलाब, बोचलाच तो
नेमका तिथे हसून मोगरा
अप्रतिम.

बोललाच हसरा मोगरा गाली छान लाजून
काटे गुलाबाचे बसले खाली मान घालून

काळजात प्रश्न एवढाच की,
बोचला कसा... असून मोगरा ?

वा वा.. सुरेख

गंगाधर, अनिल, प्रसाद धन्यवाद!
मोगरा घेऊन लिहावे कि नाही असा विचार नव्हता, तर प्रकाशित करावे कि नाही असा प्रश्न होता. गझल तिहाईच्या पूर्वीच ही गझल तयार होती. ती आत्ता प्रकाशित केली. तुम्ही सर्वांनी वाचून त्याबद्दल आपले मत लिहिल्याबद्दल धन्यवाद!