कल्लोळ
संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला
एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला
आज साक्षात्कार झाला; जग असे का वागते?
आज जवळून पाहिला, मीही पशू माझ्यातला
बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला
काल आयुष्यात पहिल्यांदा पराभव चाखला
चक्क छातीवर जगाने घाव की हो घातला!
एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला
शेवटी कंटाळुनी तो खालती आला पुन्हा
थाट सारा बेगडी होता म्हणे स्वर्गातला
लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमध्ये
दूर ना झाला तरी अंधार ह्या देशातला
काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभाऱ्यातला
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
गुरु, 28/01/2010 - 14:47
Permalink
छान गझल! उसाचा शेर खूप सुरेख
छान गझल! उसाचा शेर खूप सुरेख आहे. तसाच कैदेचाही.
साईट्सवरील सॉफ्ट्वेअरमुळे अनेकदा काही लघू, गुरू बिनसतात.
आज जवळून पाहिला, मीही पशू माझ्यातला - जवळुन
लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमध्ये - गावांमधे
सर्वात सुरेख शेर मात्र हा:
एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला
श्रीवत्स
गुरु, 28/01/2010 - 18:38
Permalink
अत्यंत डीप ! क्लासच ! ऊसाचा
अत्यंत डीप ! क्लासच ! ऊसाचा शेर तर बाण आहे ! अभिनंदन !
कैलास
गुरु, 28/01/2010 - 19:29
Permalink
पूर्ण गझल भन्नाट
पूर्ण गझल भन्नाट आवडली....
बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
हा शेर खासच...
डॉ.कैलास
ज्ञानेश.
गुरु, 28/01/2010 - 21:35
Permalink
जय हो ! मिल्या, सगळी गझल
जय हो !
मिल्या, सगळी गझल आवडली. सगळीच्या सगळी !
तीन- चार वेळा वाचून काढली ! उत्तरोत्तर रंगत गेली आहे गझल.
बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला
अप्रतिम!
एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला
लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमध्ये
दूर ना झाला तरी अंधार ह्या देशातला
काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभाऱ्यातला
नतमस्तक !
चित्तरंजन भट
शुक्र, 29/01/2010 - 10:03
Permalink
एकंदर गझल चांगली झाली आहे.
एकंदर गझल चांगली झाली आहे. नेहमीच्या वाटणाऱ्या कल्पनाही (आतला आवाज ऐकणे, कंटाळून स्वर्गातून खाली येणे, जन्माची कैद-कैदी वगैरे) चांगल्या आल्या आहेत.
एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला
वा! अगदी थेट आवडली.
आज साक्षात्कार झाला; जग असे का वागते?
आज जवळून पाहिला, मीही पशू माझ्यातला
वा!
अजय अनंत जोशी
शुक्र, 29/01/2010 - 15:30
Permalink
एकदा केली मनावर मात मेंदूने
एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला = सुंदर!
लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमध्ये
दूर ना झाला तरी अंधार ह्या देशातला = छानच.
हे आधी कोठेतरी वाचल्यासारखे वाटते आहे.
पण आठवत नाही.
केदार पाटणकर
शनि, 30/01/2010 - 13:03
Permalink
साक्षात्कार, शल्य व कैदी हे
साक्षात्कार, शल्य व कैदी हे शेर तर कमाल आहेत.
एकदम खणखणीत.
मिल्या
रवि, 31/01/2010 - 21:32
Permalink
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार...
अजय : कुठेतरी वाचल्यासारखे म्हणजे कुठे? मनोगत वर हीच गझल टाकलीय तिथे का? :) कृपया पुराव्याशिवाय असे आरोप करू नयेत ही विनंती...
वैभव जोशी
गुरु, 04/02/2010 - 10:27
Permalink
एकदा मागे जरासा गोड त्यांना
एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला
वा !
(खाल"ती " टाळता आले असते का? जमिनीवरी वगैरे? )
शुभेच्छा
अजय अनंत जोशी
गुरु, 04/02/2010 - 22:23
Permalink
अजय : कुठेतरी वाचल्यासारखे
अजय : कुठेतरी वाचल्यासारखे म्हणजे कुठे? मनोगत वर हीच गझल टाकलीय तिथे का? :)
मनोगतावरील तुमची ही गझल तुम्ही लिहिलेत म्हणून मी आत्ता वाचली.
कृपया पुराव्याशिवाय असे आरोप करू नयेत ही विनंती...
http://www.manogat.com/node/16317
ही लिंक पहा.....
'गावात' तुझिया पेटले सारे दिवे
अन दाटला अंधार हा शहरातुनी
असे आहे तिथे...
असो. मी कॉपी केल्याचा आरोप केलेला नाही. परंतु या अर्थाचे आणखी काहितरी वाचल्यासारखे वाटले म्हणून लिहिले. एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या लोकांना सुचू शकते असे मला नक्की वाटते. आणि मी तसे पूर्वी म्हटलेही आहे.
गैरसमज नसावा...
प्रताप
शुक्र, 19/02/2010 - 08:25
Permalink
खुप छान. गावामधे आवडले.
खुप छान. गावामधे आवडले.