सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य

'कविता ही बहुरुपिणी आहे' हे वाक्य 'कुसुमाकर' सारख्या कवितांना प्राधान्य देणा-या मासिकाच्या वाचकांना, सांगण्याची गरज नाही; तरी सुद्धा लिहिले आहे. कविता, गीत, लावणी, पोवाडा, अभंग, ओवी (अगदी आरती सुद्धा) कवितेचीच रूपे आहेत. त्यातलेच एक रूप, एक आकृतिबंध (फॉर्म) म्हणजे गझल.

महाराष्ट्रात तरी गझलचा 'वाचक' कमी आणि श्रोता जास्त असावा, असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यात 'मराठी गझल' हा प्रकार अलीकडचा म्हणजे ४०/५० वर्षातला. (माधव जूलियन प्रणित 'गझल' वगळली आहे, कारण ती तशीही लुप्तच झाली होती.) त्यामुळे गझलचा जो मराठी 'श्रोता' आहे तो मुख्यत्वे उर्दू गझला (चित्रपटातल्या किंवा आल्बम मधल्या) 'ऐकून' तयार झाला आहे; आणि त्याच प्रकारच्या 'कलात्मक/साहित्यिक' आनंदाची अपेक्षा तो मराठी गझलकडून करतो.
'भावगीत' हा प्रकार केवळ मराठीतच आहे. हिंदीमध्ये 'गीत' आहे, उर्दूमध्ये 'नग्मा' भावगीताचा पगडा मराठी संस्कृतीवर एवढा आहे की मराठी गझल लिहिताना किंवा गाताना पटकन केव्हा भावगीताकडे झुकेल ते सांगता येत नाही ! खरंतर उर्दूमध्येही 'मुसलसल' गझल (म्हणजे एकाच विषयावरची) - गीताच्या/कवितेच्या जवळ गेल्यासारखी वाटते. किंबहुना मुसलसल गझलला 'नज्म का म्हणू नये? असाही एक विचार प्रवाह उर्दूत विद्यमान आहे. पण ते असो. ह्या लेखाचा विषय तरल कविता-आणि गझल असा आहे, तेव्हा तूर्त आपण 'गीत' बाजूला ठेवू.
आधुनिक उर्दू गझलमध्ये अनेक 'तरल' शेर, जे कवितेच्या अंगाने जातात- असे लिहिले गेले आहेत उदा. महम्मद अल्वींचा हा शेर बघा-

'दूर तक बेकारसी इक दोपहर
इक परिंदा बेसबब उडता हुआ'

एक कंटाळवाणी दुपार आणि अकारण (फडफड करून) उडणारा एक पक्षी फक्त हे शब्दचित्रच ह्या शेरात आहे. तरीही हा शेर वाचकांच्या मनात रेंगाळत राहतो. एका तरल कवितेचा आनंद देतो. ह्यात प्रतिकं/प्रतिमा आहेत का? असल्यास कोणत्या? त्यांचे अर्थ काय? हे प्रश्नही न पडता - हे शब्दचित्र आपल्या मनाचा ठाव घेते. ह्यात 'नाट्यमयता' नाही की विरोधाभास ( parodox)नाही. तरीही हा 'चांगला शेर' आहे -ह्याबद्दल दुमत होणार नाही असे वाटते.
मराठीत गझल संदर्भात काही कल्पना रूढ झाल्या आहेत. शेराची पहिली ओळ म्हणजे 'प्रस्तावना' - दुसरी ओळ म्हणजे 'उत्कट शेवट' - शिवाय दोन ओळींमध्ये एक संबंध (राब्ता) असणे... पुन्हा त्यात नाट्यमयता हवी, किंवा एखादी 'हुलकावणी' हवी. शैलीमध्ये 'कलंदरपणा' हवा-वगैरे वगैरे. ह्या रूढ कल्पना चूक आहेत असे नाही;पण केवळ गोष्टींची झापडं बांधून घ्यावीत असेही नाही. ह्या गोष्टी कमी अधिक झाल्या तरी उत्तम शेर होऊ शकतो - अर्थातच जर 'काव्य' उत्तम असेल तर, 'खयाल' अनोखा असेल तर ! वर उल्लेखलेले निकष जर म. अल्वींच्या प्रस्तुत शेराला लावले तर काय दिसते?
कै. सुरेश भटांच्या ज्या गझला जनसामान्यांपर्यंत संगीताच्या माध्यमातून पोहचल्या (उदा 'केव्हातरी पहाटे'' सारख्या) त्यांची जातकुळी भावकवितांची होती. (अर्थात त्या गझलाच आहेत.) त्यांच्या सामाजिक विषयांवरच्या गझला फारशा गायल्या गेल्या नाहीत त्या, त्यांच्या कार्यक्रमांतून ('एल्गार' सारख्या) - 'श्रोत्यापर्यंत पोहचल्या-आणि अर्थातच काही प्रमाणात संग्रहातून 'वाचकापर्यंत पोहचल्या'.
मात्र ह्या सर्वमाध्यमांतून जनतेपर्यंत (श्रोते व वाचक) पोहचूनही, भटांचे, तरल कवितेच्या अंगाने जाणारे अनेक शेर आहेत की ज्यांची हवी तेवढी दखल घेतली गेली नाही, असे काही निवडक शेर आपण ह्या लेखात बघणार आहोत.
'प्रसाद गुण' किंवा 'सोपेपणा' पटकन् 'संप्रेषित' होण्याचा गुणधर्म - हे गझलचे एक वैशिष्ट्य आहे. हे खरे परंतु 'तरल सौंदर्य' हेही एक अंग आहेच की ! कुठलाही 'एकच एक' - ठोस अर्थ न सांगता - काहीतरी 'गूढ सौंदर्य' शब्दांमध्ये 'हलतं' ठेवणं - असाही 'शेर' असू शकतो. (जसा वर दिलेला म. अल्वींचा आहे.) - ही गोष्ट मराठी गझल लिहिणा-या कवींनी, वाचकांनी, श्रोत्यांनी ध्यानात घ्यायला हवी असे मला वाटते.
मराठी गझल संख्येने वाढते आहे - ही बाब स्वागतार्हच आहे, पण ती आपली 'तरलता' हरवते आहे का? -शेरातली कविता हरवते आहे का? तसे होत असेल तर नुसती संख्या वाढून उपयोग नाही. तसे होऊ नये म्हणूनच कै. भटांनी लिहून ठेवले आहे की 'गझलकार मुळात चांगला/प्रतिभावंत कवी असायलाच हवा आणि त्याला वृत्ता/छंदात निर्दोषपणे लिहिता यायला हवे - ही प्राथमिक अट आहे'
खुद्द कविवर्य सुरेश भटांनी तरलतेचा हा धागा जपला आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी - की 'तरलता' - म्हणजे 'नाजूक-मुलायम शब्दकळा' ज्याला भटसाहेब 'शब्दखोरपणा' - म्हणायचे ते अपेक्षित नाहीय. कवितेसारखी गझलही 'बहुरूपिणी' आहे-सामाजिक गझलांमध्ये 'मुलायम' शब्द येणारही नाहीत. - मग 'तरल' म्हणजे काय? - तर असे सौंदर्य/काव्यमयता, जी जाणवते पण 'दाखवता' येत नाही- 'दिसते' - 'पकडता'येत नाही? असो-थोडक्यात गझलेतलं 'कवितापण!'
भटांचा पहिला संग्रह 'रूपगंधा' ते त्यांच्या हयातीतला शेवटचा संग्रह 'सप्तरंग'- ह्या प्रत्येक संग्रहात तरल व काव्यमय शेर जागोजागी आढळतात. सांप्रत गझल विश्वात असे आढळते की, एखाद्या कवीने जरा 'तरल' 'काव्यमय' शेर लिहिले की अन्य गझलकार तत्परतेने त्यांची संभावना 'ही कविता आहे; गझल नाही-अशा शब्दात करतात. तो शेर लिहिणारा कवी जर आपल्या अंत:प्रेरणेशी प्रामाणिक नसेल किंवा त्याला पुरेसा आत्मविश्वास नसेल तर तो आपला शेर बदलतो किंवा पुढे तसे लिहायचे टाळू लागतो. असे होऊ नये.
आता कै. सुरेश भटांचे काही शेर-

१.

'कोवळ्या लावण्यगंगेच्या मिठीमाजी बुडालो
बावरे पाते जिवाचे काप-या श्वासात हाले'

(रूपगंधा पृ. १३)

कोवळ्या शृंगाराचा अनुभव इथे तितक्याच तरल व काव्यमय शब्दात आला आहे. 'कोवळ्या लावण्यगंगेच्या' हे शब्द पहा, कोवळेपणा तर आहेच, पण 'गंगा' ह्या शब्दाने त्याला पावित्र्य दिले आहे. 'सोज्वळ' सौंदर्य दाखवले आहे. 'तिच्या' कोवळ्या किंवा रेशमी मिठीत हरवलो असे उघड म्हटलेले नाही. ती लावण्यगंगा आहे- 'गंगा' - म्हणून 'बुडालो' म्हटले आहे. विचार करावा तसे ह्या शेराचे सौंदर्य उलगडते. जशी कविता पुन्हा पुन्हा वाचतानाही आनंद देत राहते. तसेच-

२.
'एक रान श्वासांचे एक रान भासांचे
भिरभिरे कुण्या रानी विद्ध पाखरू माझे'

(एल्गार पृ. ९४)

हा शेर वाचकांना कदाचित पटकन आठवणार नाही, पण ह्या गझलचा मतला अतिशय प्रसिद्ध आहे-

'का म्हणून मी आता शब्द आवरू माझे?
त्या विराट सत्याशी बोलणे सुरू माझे'.

हा शेर तरल तर आहेच पण 'व्यामिश्र' आहे. 'एक रान श्वासांचे'-'एक रान भासाचे' ह्या प्रतिमा कळल्यासारख्या तर वाटतात पण निश्चित अर्थबोध पटकन होत नाही. 'श्वासांचे रान' म्हणजे काय? नाही सांगता येत, ते अनुभवावे लागते. कळल्यासारखे वाटते- आवडतेही पण निश्चित काय? हे सांगू म्हटले तर सांगता येत नाही. 'ग्रेस' ची कविता कसे 'गारुड' करते (कळली नाही तरी) - तसे होते. 'श्वास' ही व्यक्तीशी संबंधित आहे. तर 'भासांचे रान'म्हणजे हे 'मायावी जगत' असे म्हणता येईल. आणि 'विद्ध पाखरु' म्हणजे मुक्तीसाठी भिरभिरणारा (दु:खाने जायबंदी झालेला) 'मी' किंवा माझे 'अस्तित्व' (कारण 'आत्मा' ह्या संकल्पनेवर भटसाहेबांचा विश्वास नव्हता) - असा अर्थाचा एक पदर झाला. वाचक आपापल्यापरीने वेगवेगळे अर्थ काढू शकतील-म्हणून तर ही गझलच्या शेरामधली 'कविता' आहे!

३.
'व्यर्थ हा रसरूपगंधांचा तुझा अभिसार
वेच तू वा-यावरी माझे अभागी 'श्वास'
(रंग माझा वेगळा - पृ. १६)

ह्या शेरात 'तू' कोण आहे? प्रेयसी, निसर्ग, परमेश्वर-नक्की कोण? आणि माझे श्वास 'अभागी' का आहेत? पुन्हा ते वा-यावर 'वेचायचे' कसे?- हे प्रश्नच गैरलागू ठरावेत इतका हा तरल सुंदर शेर आहे. अर्थ तुम्ही हवा तसा घ्या. 'मी' अभागी का? ह्याचे उत्तर वाचकाने आपल्या अनुभवाने शोधावे. कवी काहीच सांगत नाही. ह्या शेरातले सौंदर्य त्याच्या 'संदिग्धतेत' दडलेले आहे- आणि संदिग्धता हे कवितेचं लक्षण आहे. गझलमध्ये अर्थ त्वरित संप्रेषित व्हायला हवा- तरीही वरील ओळी गझलच आहेत- आणि हा चांगला शेर आहे. फक्त गझलच्या संदर्भात आपण ज्या संकल्पनांची झापडं लावली आहेत-ती बाजूला ठेवायला हवीत.

४.
'नाही म्हणावयाला आता असे करू या
प्राणात चंद्र ठेवू-हाती उन्हे धरू या'
(एल्गार, पृ. ४९)
हा शेर सुद्धा भावकवितेच्या अंगाने जाणारा आहे. बरेच गायक ही गझल गातातही. एका गायकानेच मला ह्या शेराचा निश्चित अर्थ काय आहे? असे विचारले होते. मी सांगण्याचा प्रयत्न केला पण ना मला सांगता आला ना त्या गायकाला अर्थ कळला. पण हा शेर मला 'कळला' नाही का? - तर तसेही नाही. 'कळला' हे नक्की - पण सांगू लागलो तर अर्थ निसटला. दवाचा थेंब फुलाच्या पाकळीवरच मोती असतो. उचलू गेलो तर - हाती येत नाही. (फक्त बोट ओले होते!) - म्हणून तर ही कविता!

५.
'या दुपारी मी कुणाला हाक मारू
ओळखीचे चेहरे वितळून गेले'
(झंझावात पृ. ३७)

हा तसा शेर तसा सोपा आहे. अर्थ सांगायची आवश्यकता नाही. पण ह्यातले एक Expression महत्वाचे आणि काव्यमय आहे. 'चेहरे'-हरवून गेले/विसरून गेले/फसवून गेले अशी नेहमीची भाषा न वापरता कवी 'वितळून' हा शब्द वापरतो. त्या क्षणी हा शेर वेगळा होतो. उन्हात वितळतं-ते 'मेण' म्हणजे 'ओळखीची माणसे' - मेणाची होती, हे सूचित होते. 'शेणामेणाचा' - असा एक शब्द बोलीभाषेत रूढ आहे, त्यामुळे हा शेर आपल्या मराठी संस्कृतीशी नातं जोडतो. - आपली प्रतिकं वापरतो. (मराठी गझल-मराठी मातीशी नाते सांगणारी असावी- असा भट साहेबांचा कटाक्ष होता. त्यासाठी ते 'मंबाजी' 'विठू' ह्या प्रतिकात्मक शब्दांचे उदाहरण द्यायचे.)
ह्या गझलच्या मतल्यात 'जवळून'आणि 'मिसळून' हे शब्द आले आहेत, केवळ त्याचमुळे 'वितळून'शब्द आला असावा- असे कोणी म्हणेल, पण 'चेहरे वितळून जाणे'ही कल्पना - (हा शब्दप्रयोग) - भटांच्या प्रतिभेचे सामर्थ्यच अधोरेखित करते; आणि या शेराला तरल काव्यात्मकता देते. आणि गझलियतही!

६.
'फसवून मी स्वत:ला फसवायचे किती?
नुसतेच सावल्यांना बिलगायचे किती?'
(सप्तरंग पृ. १०१)
ह्या शेरातली पहिली ओळ साधी - सरळ आहे. 'प्रस्तावना', म्हणा. मात्र दुसरी ओळ मनाला चटका लावणारी आहे. 'सावली' म्हणजे `Nothing Substantial'- 'काहीही 'ठोस' नाही - पण 'आहे हे खरे!' आपल्या म्हणजे मानवी जगण्याचेच वर्णन कवी करतो आहे- ही ओळ वाचल्यावर, पहिल्या ओळीतली. 'फसवणूक' अधिकच गडद/गहिरी होते-आणि शेर काळजात रुतून बसतो. 'सावल्यांना बिलगणे' ही कल्पना अमूर्त (abstract) असली तरीही!
आता सुरेश भटांचे काही शेर टिप्पणी न करता देतो.
(अधोरेखित शब्द आणि कंस बघा.)

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले. (गाण्याने शिंपडणे!)

आताच रक्तात आठवांनी शहारुनी किलबिलाट केला
गडे पुन्हा आज डोळियांची तुझ्याकडे पालखी निघाली (आठवांचा किलबिलाट)

तू उन्हाची कोवळी भोळी कळी (उन्हाची कळी!)

का तुला अंधार माझा सापडे (अंधाराचे 'सापडणे')

- तरल भावकवितेजळ जाणारी काव्यात्मकता - हेही गझलचे एक रूप आहे. ह्याचा विसर पडू नये हे सांगण्यासाठीच हा लेखन प्रपंच केला. जाणकारांच्या अनुकुल वा प्रतिकूलही प्रतिक्रियांचे स्वागतच आहे.

( 'कुसुमाकर'मधे ह्याआधी प्रकाशित)

प्रतिसाद

सुंदर लेख आहे. अनेक शंकांचे निरसन झाले.
धन्यवाद!

सांप्रत गझल विश्वात असे आढळते की, एखाद्या कवीने जरा 'तरल' 'काव्यमय' शेर लिहिले की अन्य गझलकार तत्परतेने त्यांची संभावना 'ही कविता आहे; गझल नाही-अशा शब्दात करतात. तो शेर लिहिणारा कवी जर आपल्या अंत:प्रेरणेशी प्रामाणिक नसेल किंवा त्याला पुरेसा आत्मविश्वास नसेल तर तो आपला शेर बदलतो किंवा पुढे तसे लिहायचे टाळू लागतो. असे होऊ नये.

अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे!

डबिरांनी कविवर्य सुरेश भट ह्यांचे काही शेर चांगले उलगडवून दाखवले आहेत. धन्यवाद.

सांप्रत गझल विश्वात असे आढळते की, एखाद्या कवीने जरा 'तरल' 'काव्यमय' शेर लिहिले की अन्य गझलकार तत्परतेने त्यांची संभावना 'ही कविता आहे; गझल नाही-अशा शब्दात करतात. तो शेर लिहिणारा कवी जर आपल्या अंत:प्रेरणेशी प्रामाणिक नसेल किंवा त्याला पुरेसा आत्मविश्वास नसेल तर तो आपला शेर बदलतो किंवा पुढे तसे लिहायचे टाळू लागतो. असे होऊ नये.

हे सगळे ठीक आहे. माझ्यामते, एखादी रचना म्हणून एखाद्या कवितेला तांत्रिकदृष्ट्या गझल म्हणता येईल. पण तिचा आत्माही गझलेचा हवा. अभंगाच्या नावे (अंभंगाच्या फॉर्ममध्ये) शृंगारगीते (लावणीछाप) कुणी चालवून घेईल काय? गझल ह्या काव्यप्रकाराच्या नावे भावगीते खपविण्याचा, उजविण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि हा सोपा मार्ग आहे. ह्या अश्या ट्रॅन्सवेस्टाइट गझलांना (गझलकारांना नव्हे) नाकारले पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे.

सांप्रत गझल विश्वात असे आढळते की, एखाद्या कवीने जरा 'तरल' 'काव्यमय' शेर लिहिले की अन्य गझलकार तत्परतेने त्यांची संभावना 'ही कविता आहे; गझल नाही-अशा शब्दात करतात.

ज्ञानेश,

'अशी गोड तू' याबाबत आपल्या शंकेचे निरसन श्री. चित्तरंजन यांच्या (इथल्या ) प्रतिसादाद्वारे झाले असेल अशी आशा!

सांप्रत गझल विश्वात असे आढळते की, एखाद्या कवीने जरा 'तरल' 'काव्यमय' शेर लिहिले की अन्य गझलकार तत्परतेने त्यांची संभावना 'ही कविता आहे; गझल नाही-अशा शब्दात करतात. तो शेर लिहिणारा कवी जर आपल्या अंत:प्रेरणेशी प्रामाणिक नसेल किंवा त्याला पुरेसा आत्मविश्वास नसेल तर तो आपला शेर बदलतो किंवा पुढे तसे लिहायचे टाळू लागतो. असे होऊ नये. - डबीर
डबीर साहेब,
संभावना हा शब्दच मुळात चुकीचा आहे. आपापले मत प्रत्येक मांडत असतो. तरीही...

प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे, हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते. - बाराखडी

नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते - हे तर भटांचेच म्हणणे. परंतु नुसत्या आकृतिबंधालाही लोक उत्कृष्ठ गझल म्हणताना माझ्याबरोबरच अनेकांनी पाहिले आहेत. आपण म्हणता तशी संभावना किंवा वाहवा बर्‍याचवेळा गझल बघून नव्हे तर गझलकार बघून केली जाते. मात्र याचे पुरावे मी (असूनही) देणार नाही. सर्वांना माहीत आहेत.
यापेक्षा मी अधिक काय सांगू?
तरीही....
आपल्या लेखाने अनेक विचारांना पुन्हा प्रेरणा मिळाली. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद!
चुभुद्याघ्या.