अंतरा
शह-प्रतिशह माझ्याच मनाचे, वजीर मी अन् मीच मोहरा
अविरत दिसतो जुन्या दर्पणी मलाच माझा नवा चेहरा
खोल विवर मन, गूढ विलक्षण, अथांग गहिरे, ठाव न लागे
शांत नदीच्या पात्रामधला गहन, अनाकलनीय भोवरा
कुठे अता त्या नात्यांमधला ओलावा जपणार्या भिंती ?
अदृष्टाची काळी छाया थांबविणारा कुठे उंबरा ?
खुणा कालच्या विध्वंसाच्या जपुन आज का शाप भोगणे ?
आज जगा मस्तीत, उद्याचे कोसळणारे स्वप्न सावरा
किती रंग चढवले, उतरले, जशा भूमिका बदलत गेल्या
रोज बदलले किती मुखवटे, कुणास ठाउक कोणता खरा ?
मनात नसता कसे जुळावे लयतालाशी सुरेल नाते ?
स्थायीला ना स्पर्श सुरांचा, सांग कसा गाणार अंतरा ?
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शुक्र, 21/08/2009 - 20:02
Permalink
आशय सगळ्याच द्विपदींचा आशय
आशय
सगळ्याच द्विपदींचा आशय छान वाटला. मतल्याची फ्रेम मात्र बाराखडीनुसार नाही. असे का?
( माझ्या मनात आत्ता एक विचार आला. जो मी आता स्वतः आधी सराव करून पाहायला हवा. सुचलेला विचार लहानात लहान बहरीत मांडायला कितपत जमते हा तो विचार. हे मत म्हणजे आपल्याला सल्ला समजू नयेत. मी स्वतःच पडताळून पाहणार आहे. मात्र हे मत सुचण्याचे कारण आपली ही गझल आहे. का ते पहावेत अशी विनंती! आपला हा शेर!)
खोल विवर मन, गूढ विलक्षण, अथांग गहिरे, ठाव न लागे
शांत नदीच्या पात्रामधला गहन, अनाकलनीय भोवरा
गूढ म्हणजे ठाव न लागणारे, अथांग गहिरे व खोल साधारण तेच!
पुढच्या ओळीत परत 'गहन' जो गूढ व ठाव न लागणारे यांच्याशी साधर्म्य साधणारा!
'खोल विवरासारख्या मनाचा ठाव लागत नाही, वरून शांत दिसणार्या नदीमधील अनाकलनीय भोवरा आहे हे मन' - असा हा विचार! ( अर्थात, विचार छान असला तरी मला तो नुसताच वर्णनात्मक वाटत आहे.)
हा विचार किती लहानात लहान बहरीत बसवता येईल हे मी आता 'माझ्यापुरते'च पाहणार आहे.
मात्र, मतल्यातील जमीन पाळणे आवश्यक आहे, आपण बदल करू शकालच!
आनंदयात्री
शुक्र, 21/08/2009 - 22:51
Permalink
मनात नसता कसे जुळावे लयतालाशी
मनात नसता कसे जुळावे लयतालाशी सुरेल नाते ?
स्थायीला ना स्पर्श सुरांचा, सांग कसा गाणार अंतरा ?
आवडला हा शेर..
सानी मिसर्याचा पहिला शब्द "साथीला" हवाय का?
(मला वाटले एकदम....)
क्रान्ति
शुक्र, 21/08/2009 - 23:15
Permalink
धन्यवाद भूषणजी आणि
धन्यवाद भूषणजी आणि आनंदयात्रीजी.
भूषणजी, मतल्याच्या फ्रेमबद्दल केलेली सुचवणी पटली, मी योग्य ते बदल नक्कीच करीन. तसंच मनाच्या द्विपदीबद्दलही. ती वर्णनात्मकच आहे. आपली या विषयावरची गझल वाचायला आवडेल.
सानी मिसर्याचा पहिला शब्द "साथीला" हवाय का?
आनंदयात्रीजी, तो शब्द "स्थाईला" असाच आहे, टंकताना चुकून "स्थायी" असा झाला आहे. अस्थाई आणि अंतरा असे जे बंदिशीचे किंवा गाण्याचे दोन भाग असतात, त्यातल्या अस्थाईला किंवा स्थाईलाच जर सूर बरोबर लागला नाही, तर अंतर्यापर्यंत जाणार कसं? सुरुवातच जिथे चुकीची, तिथे पुढे काय होणार? अशा अर्थानं ती द्विपदी आलेली आहे, म्हणून तो शब्द "स्थाईला" आहे.