..उशीर
(भुषण कटककर यांनी दिलेल्या मिसर्यावर केलेली ही गझल. वृत्ताच्या सोयीसाठी मिसर्यात थोडासा बदल केला आहे.)
========================
उशीर झाल्याक्षणी कळाले, 'उशीर झालेला आहे'
उशीर हा नेहमी असा 'वक्तशीर' झालेला आहे..!
कधी तुझे पावसाप्रमाणे निघून येणे घडायचे?
इथे कुणी चातकाप्रमाणे अधीर झालेला आहे...
"मिळेचना नोंद कोणतीही" म्हणे तुझी आमच्याकडे,
किती पहा देव आमचा बेफिकीर झालेला आहे !
उगाच का प्राक्तना मला तू, चुकार प्यादेच मानले?
पहा नव्याने जिवंत माझा वजीर झालेला आहे !
विसावल्या वेदना मनाच्या तुझ्याच छायेमधे 'गझल'
तुझ्यामुळे आमचा उन्हाळा शिशीर झालेला आहे...
-ज्ञानेश.
==========================
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
बुध, 19/11/2008 - 20:51
Permalink
छान
छान रचना.
देवाच्या शेरात आशय स्पष्ट होत नाही.
भूषण कटककर
सोम, 24/11/2008 - 11:41
Permalink
चांगली गझल.
ज्ञानेश,
गझल चांगली केलीत. मतला, बेफिकीर अन शिशिर चांगले शेर आहेत. मी असे म्हणण्याचा मला अधिकार नाही पण केदार मित्र आहे म्हणुन केदारसाठी देव या शेराचा मला समजलेला अर्थ लिहीत आहे.
देवाने नशीबाची वाटणी अशी कशी केली विचारण्यासाठी देवाकडे जावे तर देव म्हणतो की तू आमच्या रजिस्टरमधे नाहीच्चेस! अत्यंत सावळा गोंधळ आहे देवाच्या दारी. असा अर्थ असावा!
धन्यवाद!
ज्ञानेश.
मंगळ, 25/11/2008 - 11:25
Permalink
अर्थ..!
केदार, भुषणजी प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
देवाच्या शेराचा आशय भुषण यांनी बराचसा स्पष्ट केला आहे. "माझे आयुष्य असे (अनियंत्रित, भरकटलेले इत्यादि) का असावे? असे देवाला विचारल्यावर तो म्हणाला की बाबा रे तुझी कुठली नोंदच आमच्या रजिस्टर मधे नाही." थोडक्यात, देवाचे आमच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
वजीरच्या शेराचा अर्थ बुद्धिबळ न खेळणार्यांना बहुधा समजणार नाही. बुद्धिबळात प्याद्याला कमी महत्त्व असते. वजीर मात्र सर्वाधिक महत्वाचा मानला जातो. मात्र मजल-दरमजल करत एखादे प्यादे प्रतिस्पर्ध्याच्या शेवटच्या घरात पोहोचले, तर त्या प्याद्याचे रुपांतर वजीरात होते. हा संदर्भ येथे वापरला आहे.
मिसर्याच्या बंदिस्तपणामुळे शेर फारसे रंगवता आलेले नाहीत. (अर्थात, या साईटवरील इतर काही शायर या ओळीवर अधिक चांगले शेर रचू शकतात.)
जमीर इब्राहिम
बुध, 26/11/2008 - 01:15
Permalink
वा रे वा....
उशीर झाल्याक्षणी कळाले, 'उशीर झालेला आहे'
उशीर हा नेहमी असा 'वक्तशीर' झालेला आहे..!
ज्ञानेश......
अगदी परफेक्ट विरोधभास असुनसुद्धा कित्ती समर्पक आहे ह शेर... कम्प्लीट सर्कल....
याची धुन्दी सुद्धा अगदी तुमच्या "भळभळताना......" शेरच्या जवळ पास जाणारी आहे..! :-)
"मिळेचना नोंद कोणतीही" म्हणे तुझी आमच्याकडे,
किती पहा देव आमचा बेफिकीर झालेला आहे !
भाऊसाहेब पाट्णकर आठवले लगेच....! मस्त शेर....
....जमीर..
कौतुक शिरोडकर
बुध, 26/11/2008 - 15:03
Permalink
नोंद
"मिळेचना नोंद कोणतीही" म्हणे तुझी आमच्याकडे,
किती पहा देव आमचा बेफिकीर झालेला आहे !
नोंद घेण्याजोगाच आहे.
केदार पाटणकर
गुरु, 27/11/2008 - 00:09
Permalink
भूषण,अर्थ
भूषण,
अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद.
हाच अर्थ मला जाणवला होता. पण मी थोडा किंचित् खोल विचार करीत होतो व साशंक होतो की, तो खोल विचारच कवीला मांडायचा आहे की नाही.
तो विचार असाः प्रथम देवाने जन्माला घातले. जन्माला घालताना नोंद होती. नंतर जेव्हा सुखदुःखांची कारणे तपासायला आम्ही त्याच्याकडे गेलो तेव्हा त्याने सांगितले की, आता नोंद नाही. आधी नोंद ठेवणारा तो, नंतर मात्र कानावर हात ठेवतो. एक तर जन्माला घालताना आमची परवानगी घेतली नाही. नंतर हिशेबाच्या वह्या गहाळ झाल्या. दैवाचा किती गलथान कारभार, किती ही बेफिकिरी,किती हलगर्जीपणा...!
अवांतरः कवी शेरात देवाला, दैवाला मानवी पातळीवर आणतो. इथे निराळेच सौंदर्य दिसते.
चित्तरंजन भट
शुक्र, 28/11/2008 - 16:27
Permalink
एकंदर छान
एकंदर छान गझल आहे. शेर आणखी तासायला हवे. गझल आणखी उत्तम होईल.
ज्ञानेश.
शनि, 29/11/2008 - 16:29
Permalink
आभार.
केदार, भूषणजी, जमीर साहेब, कौतुक आणि चित्त दा..
प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार.
@चित्तदा- "शेर आणखी तासायला हवे."मान्य आहे. नक्की प्रयत्न करेन.
योगेश वैद्य
सोम, 18/05/2009 - 22:54
Permalink
एकूण
गझल छान वाटली.
वक्तशीर झालेला उशीर ही कल्पना आवडली ज्ञानेश.
क्रान्ति
रवि, 19/07/2009 - 17:12
Permalink
वा!
विसावल्या वेदना मनाच्या तुझ्याच छायेमधे 'गझल'
तुझ्यामुळे आमचा उन्हाळा शिशीर झालेला आहे...
सही!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
सोनाली जोशी
रवि, 26/07/2009 - 18:09
Permalink
वा
मक्ता आवडला. मस्त गझल
मनिश
रवि, 26/07/2009 - 21:23
Permalink
उगाच का
उगाच का प्राक्तना मला तू, चुकार प्यादेच मानले?
पहा नव्याने जिवंत माझा वजीर झालेला आहे !
फार छान! वीर-रस ओतप्रोत भरला आहे:)