..चर्चा

====================


नाही  अजून  झाली, माझ्या-तुझ्यात  चर्चा..
माझ्या-तुझ्यातल्याची .. सार्‍या  जगात  चर्चा


आता  कुठे  जरासे  संकेत  मोडले  तू
आता  कुठे  जराशी  आली  भरात  चर्चा..


येणार ती  पुन्हा रे.. ठोका चुकेल  ना रे..?
छातीत  स्पंदनांची  आपापसात  चर्चा !


भेटूनही  न  वाटे  मित्रास  भेटल्याचे
पेल्यात  व्हायच्या  त्या, झाल्या  कपात  चर्चा


"आधी  असा  न होता.. हातामधून  गेला.."
हल्ली  अशीच  चाले  माझ्या  घरात  चर्चा


चर्चेमधून  सार्‍या  निष्कर्ष  काढला  मी-
करणार  ना  कधी  मी, या  जीवनात  चर्चा !


खच्चून दे  शिवी  तू, भांडून  घे  जरासे
घोळायच्या  कशाला  आता  तुपात  चर्चा ?*


उल्लेख  झुंजण्याचा  झाला  न  कोणताही,
माझ्या  पराभवाची  दाही  दिशात  चर्चा..


चुकले  कसे  कुणाचे?.. बोलू  निवांत  वेळी
हातात  हात  दे  तू, का  वादळात  चर्चा ?


संवाद  मूक  झाले... स्पर्शात  शब्द  आले..
गेल्या  फिटून शंका.. गेल्या  ढगात  चर्चा !!


 


 


-ज्ञानेश.
=====================


(* हा शेर चित्तरंजन यांच्या  एका शेरावरून प्रेरीत आहे- "हातघाईने पुन्हा  भांडून घेऊ, काय चर्चेने गड्या साधेल आता?")

गझल: 

प्रतिसाद

नाही  अजून  झाली, माझ्या-तुझ्यात  चर्चा..
माझ्या-तुझ्यातल्याची .. सार्‍या  जगात  चर्चा
मतला अतिशय आवडला. स्पंदनात अन घरात हे शेरही आवडले.

दाही दिशात - हा शेर अप्रतिम आहे.
आपण खरीखुरी 'गझल' करता असे माझे मत आहे.

उल्लेख  झुंजण्याचा  झाला  न  कोणताही,
माझ्या  पराभवाची  दाही  दिशात  चर्चा..
वा वा, फडाड रे मित्रा

मतला आणि घरात हे शेर फार आवडले!

मऊपणा वाटत नाहीये. खरंच, उगाचच केल्यासरख वाटतय.

सगळे शेर आवडले,
येणार ती  पुन्हा रे.. ठोका चुकेल  ना रे..?
छातीत  स्पंदनांची, ही  आपसात  चर्चा !
"आधी  असा  न होता.. हातामधून  गेला.."
हल्ली  अशीच  चाले  माझ्या  घरात  चर्चा
संवाद  मूक  झाले... स्पर्शात  शब्द  आले..
गेल्या  फिटून शंका.. गेल्या  ढगात  चर्चा !!
पण तरिही या शेरांची  चर्चा काही  औरच!!!!

भूषणजी, प्रसाद (फडाड- भावना पोचली.), पुलस्ति, अर्चना लाळे, चांदणी (निशा)
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

आता  कुठे  जरासे  संकेत  मोडले  तू
आता  कुठे  जराशी  आली  भरात  चर्चा..


येणार ती  पुन्हा रे.. ठोका चुकेल  ना रे..?
छातीत  स्पंदनांची, ही  आपसात  चर्चा !


भेटूनही  न  वाटे  मित्रास  भेटल्याचे
पेल्यात  व्हायच्या  त्या, झाल्या  कपात  चर्चा
आवडलेले  शेर.

मतला सुरेख. तरी आणखी वाव आहे असे वाटते.
उल्लेख  झुंजण्याचा  झाला  न  कोणताही,
माझ्या  पराभवाची  दाही  दिशात  चर्चा..

हे वाचून मला माझ्या ओळी आठवल्या...
जागलो मी शब्द तेंव्हा राहिले का आंधळे ?
बोल जे नव्हते मुखीचे त्याचसाठी भोगले

कलोअ चूभूद्याघ्या

उल्लेख  झुंजण्याचा  झाला  न  कोणताही,
माझ्या  पराभवाची  दाही  दिशात  चर्चा..


मस्त आहे गझल..
मतला, स्पंदने, घरात आणि दाहीदिशात हे शेर आवडले...
छातीत  स्पंदनांची, ही  आपसात  चर्चा ! >>> 'ही आपसात' च्या ऐवजी 'आपापसात' केले तर?

आता  कुठे  जरासे  संकेत  मोडले  तू
आता  कुठे  जराशी  आली  भरात  चर्चा..

येणार ती  पुन्हा रे.. ठोका चुकेल  ना रे..?
छातीत  स्पंदनांची, ही  आपसात  चर्चा !.. बहोत बढिया
चुकले  कसे  कुणाचे?.. बोलू  निवांत  वेळी
हातात  हात  दे  तू, का  वादळात  चर्चा ?.. सही
 उत्तम गझल
-मानस६

सुनेत्राजी, अजय जोशी, समीर आणि  मिल्या व मानस... प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
@मिल्या- तुम्ही   सुचवलेला  बदल  केला  आहे. असेच मार्गदर्शन  करावे ही  अपेक्षा.
@गंभीर समीक्षक- कुठे आहात? वाट बघतोय...

 
चर्चा...छानच  चाललीय  बरका...
भेटूनही  न  वाटे  मित्रास  भेटल्याचे
पेल्यात  व्हायच्या  त्या, झाल्या  कपात  चर्चा
"आधी  असा  न होता.. हातामधून  गेला.."
हल्ली  अशीच  चाले  माझ्या  घरात  चर्चा

नाही  अजून  झाली, माझ्या-तुझ्यात  चर्चा..
माझ्या-तुझ्यातल्याची .. सार्‍या  जगात  चर्चा
सुंदर सुरुवात! शेवटच्या २५ टक्क्यात शेर फिरवला आहे. चांगली सुरुवात!


आता  कुठे  जरासे  संकेत  मोडले  तू
आता  कुठे  जराशी  आली  भरात  चर्चा..
अशुद्ध मराठी वापरू नये. मुद्दा मतल्यातील विषयाला जरा पुढे सरकवत आहे.


येणार ती  पुन्हा रे.. ठोका चुकेल  ना रे..?
छातीत  स्पंदनांची  आपापसात  चर्चा !
हा शेर मतल्याला अन दुसर्‍या शेराला परत मागे खेचत आहे. चांगला शेर!


भेटूनही  न  वाटे  मित्रास  भेटल्याचे
पेल्यात  व्हायच्या  त्या, झाल्या  कपात  चर्चा
अतिशय चांगला शेर! 'काळ' या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. 'वाटे' मधे 'वाटत नाही' असा वर्तमान काळ तर 'झाल्या' मधे भूतकाळ येत आहे.


"आधी  असा  न होता.. हातामधून  गेला.."
हल्ली  अशीच  चाले  माझ्या  घरात  चर्चा
चांगला शेर!


चर्चेमधून  सार्‍या  निष्कर्ष  काढला  मी-
करणार  ना  कधी  मी, या  जीवनात  चर्चा !
अनावश्यक शेर!


खच्चून दे  शिवी  तू, भांडून  घे  जरासे
घोळायच्या  कशाला  आता  तुपात  चर्चा ?*
'खच्चून' ने जो भाव निर्माण होत आहे तो 'जरासे'मुळे नष्ट होत आहे. तसेच पहिल्या ओळीत कर्ता 'मी' असता तर नवीन लज्जत आली असती. याचे कारण म्हणजे दुसर्‍या ओळीत इच्छा व्यक्त करणारा 'मी' आहे.


उल्लेख  झुंजण्याचा  झाला  न  कोणताही,
माझ्या  पराभवाची  दाही  दिशात  चर्चा..
कवी तिलकधारींची गझलियत या शेरात दिसली.


चुकले  कसे  कुणाचे?.. बोलू  निवांत  वेळी
हातात  हात  दे  तू, का  वादळात  चर्चा ?
इथे पण दिसली.


संवाद  मूक  झाले... स्पर्शात  शब्द  आले..
गेल्या  फिटून शंका.. गेल्या  ढगात  चर्चा !!
सुंदर!
आमच्यामते ही गझल अतिशय सुंदर गझल आहे. कवी ज्ञानेशला मनापासून शुभेच्छा!

सहमत आहे. उत्तम रचना.

जयन्ता५२

मला मतला आणि पराभवाचा शेर फार आवडला.  पुढील लेखनास मन: पूर्वक शुभेच्छा.

नाही  अजून  झाली, माझ्या-तुझ्यात  चर्चा..
माझ्या-तुझ्यातल्याची .. सार्‍या  जगात  चर्चा
मतला सुरेख आहे हे मत माझ्याप्रमाणेच अनेकांचे आहे. पण मतल्यातल्या गृहितकाबाबत काय?
नाही  अजून  झाली, माझ्या-तुझ्यात  चर्चा..      ही पहिली ओळ स्वच्छ.
माझ्या-तुझ्यातल्याची .. सार्‍या  जगात  चर्चा      या ओळीत
(तरीही) माझ्या-तुझ्यातल्याची चर्चा सार्‍या जगात (चालली आहे) असे वाटते.
यात कंसातील शब्द गृहीतच धरावे लागतात. असेही होऊ शकेल...
माझ्या-तुझ्यात अजून चर्चा झाली नाही आणि तुझ्या-माझ्यातल्याची चर्चाही सार्‍या जगात अजून झाली नाही. म्हणजे कुठेच चर्चा झाली नाही. (कारण, दुसर्‍या ओळीत क्रियापद वापरले नाही जे पहिल्या ओळीत वापरले आहे. तसेच, नाही अजून झाली नंतर स्वल्पविराम दिलेला आहे. स्वल्पविरामाच्या आधीचे शब्द दुसर्‍या ओळीसाठीही (सार्‍या जगात चर्चा साठीही) घेता येतील.)
माझ्यामते दुसरी ओळ स्पष्ट नाही. तरी समजून घेतल्यास सुरेखच.
एरवी स्पष्टतेबाबत बोलणार्‍यांनी या गृहीतकांबद्दल अजून चर्चा केलेली नाही. म्हणून न राहवून मीच सांगितले.
कलोअ चूभूद्याघ्या

अजय,
आपला मुद्दा मान्य होण्यासारख आहे. पण बहुधा त्यावर काही म्हंटले गेले नसल्याचे एक कारण असे असावे की:
गझलेचा शेर वाचताना मुळातच रसिकाची एक मनस्थिती असते, ज्यामधे 'दुसर्‍या ओळीत' काहीतरी कलाटणीयुक्त ऐकायला मिळणार असे गृहीत धरले जाते. त्यामुळे पहिल्या ओळीतील स्वल्पविराम रसिक दुसर्‍या ओळीसाठी गृहीत न धरता, दुसरी ओळ ही एक स्वतंत्र ओळ व शेराला कलाटणी देणारी ओळ म्हणुन बघेल.

कलाटणी गृहीत धरणारा रसिक ग्रेटच म्हटला पाहिजे. म्हणजे हे रसिकावर अवलंबून आहे - गझलकारावर नाही असे म्हणायचे आहे की काय?
स्वल्पविराम हा लिहिताना महत्वाचा आहे. इथे ऑडियो सादरीकरण होत नाही. लिहूनच होते. स्वल्पविराम नसता तरी चालले असते असे मला वाटते.
नाही अजून झाली माझ्या-तुझ्यात चर्चा           असेही चालले असते.
कलाटणीची अपेक्षा बाळगणे आणि कलाटणी आहे असे गृहीत धरून चालणे यात फरक आहे. अर्थात, हा प्रश्न गझलकाराचा आहे, इतरांचा नाही.
दुसरी ओळ पहिल्या ओळीइतकी स्पष्ट नाही हे खरे. त्यात योग्य बदल करून काव्याची उंची वाढवता येईल. (गझलकार उंच आहेच.)
नाही अजून झाली माझ्या-तुझ्यात चर्चा
झाली कुठून त्याची सार्‍या जगात चर्चा ?
किंवा
माझ्या-तुझ्यातल्याची झाली जगात चर्चा
असे काहीतरी करता येईल का?
कलोअ चूभूद्याघ्या

येणार ती  पुन्हा रे.. ठोका चुकेल  ना रे..?
दोन रे मला खटकले. पण छान शेर. आपापसात हा बदल चांगलाच.

"आधी  असा  न होता.. हातामधून  गेला.."
हल्ली  अशीच  चाले  माझ्या  घरात  चर्चा
हाहा. फार छान. तुपात चर्चाही छान बरं का. वाक्प्रचारी भाषेचा वापर करण्याचे प्रयत्न गझलकारांनी करायला हवेत.

उल्लेख  झुंजण्याचा  झाला  न  कोणताही,
माझ्या  पराभवाची  दाही  दिशात  चर्चा..
वाव्वा.

शेवटच्या दोन द्विपदी मात्र अजून वाव देत आहेत असे वाटते.


उल्लेख  झुंजण्याचा  झाला  न  कोणताही,
माझ्या  पराभवाची  दाही  दिशात  चर्चा.. मस्त!

जयन्ता५२, दशरथ यादव, गंभीर समीक्षक, सोनाली, चित्तरंजन आणि ओंकार... प्रतिसादाबद्दल  मन:पूर्वक आभार.
@अजयभाऊ- तुम्ही म्हणता ते योग्य आहे. (अर्थात, हे तुम्ही म्हटल्यावरच माझ्या लक्षात आले, हे मानलेच पाहिजे. ) गझल सादर करतांना  तुम्ही  म्हणता तसा दुसरा अर्थ निघणार नाही, याची खबरदारी घेता येईल (आवाजातील  चढ-उतार, हातवारे इत्यादि) पण लिखित स्वरूपात हा दोष  आहे, हे  मान्य!
("चर्चा" या गझलेवर इतकी चर्चा होईल, असे वाटले नव्हते. प्रतिसाद वाचायला विलंब झाल्यामुळे  उत्तर  वेळेवर देता आले नाही. क्षमस्व.)

जयन्ता५२, दशरथ यादव, गंभीर समीक्षक, सोनाली, चित्तरंजन आणि ओंकार... प्रतिसादाबद्दल  मन:पूर्वक आभार.
@अजयभाऊ- तुम्ही म्हणता ते योग्य आहे. (अर्थात, हे तुम्ही म्हटल्यावरच माझ्या लक्षात आले, हे मानलेच पाहिजे. ) गझल सादर करतांना  तुम्ही  म्हणता तसा दुसरा अर्थ निघणार नाही, याची खबरदारी घेता येईल (आवाजातील  चढ-उतार, हातवारे इत्यादि) पण लिखित स्वरूपात हा दोष  आहे, हे  मान्य!
("चर्चा" या गझलेवर इतकी चर्चा होईल, असे वाटले नव्हते. प्रतिसाद वाचायला विलंब झाल्यामुळे  उत्तर  वेळेवर देता आले नाही. क्षमस्व.)

प्रश्नच नाही...
सुंदरच गझल आहे....
सगळे शेर आवदले... काही अर्थांसाठी, काही शब्दयोजनेसाठी!
ज्ञानेश, मनापासून शुभेच्छा!!
 - नचिकेत

Speechless ! यावर काही बोलायला शब्द्च नाही.. कळत नाही असं कसं सहजपणे सूंदर लिहीता तुम्ही...

हे दोनही शेर म्हणजे दोन टोकच्या दोन अव्यक्त अभिव्यक्ती पण तेवढेच समर्थ अन सशक्त !

येणार ती पुन्हा रे.. ठोका चुकेल ना रे..?
छातीत स्पंदनांची आपापसात चर्चा !

भेटूनही न वाटे मित्रास भेटल्याचे
पेल्यात व्हायच्या त्या, झाल्या कपात चर्चा

"आधी असा न होता.. हातामधून गेला.."
हल्ली अशीच चाले माझ्या घरात चर्चा .........मस्त गझल आहे....

आधी असाच होता, अजुनी असाच आहे
हल्ली अशीच चाले, माझ्या मनात चर्चा!

:-))

ज्ञानेश,

खुप छान गझल आणि खुप छान चर्चा! अभिनंदन!

सुन्दर गझल.....

मनापासून शुभेच्छा.....