नाते
सारे बिघडल्यासारखे !
मोडून पडल्यासारखे !
ओठांवरी येई हसू -
आतून ऱडल्यासारखे !
दाही दिशा म्हणतात या -
`झाले जखडल्यासारखे !!`सोडू नको गाणे़, जरी -
जगणे भरडल्यासारखे !बघणे तुझे माझ्याकडे
चोरी पकडल्यासाऱखे !का वाटले वळणावरी
पाऊल अडल्यासारखे !आयुष्य संपू लागले...
वाया दवडल्यासारखे !बरसायच्या आधीच का
वाटे उघडल्यासारखे ?देहावरी या बंधने...
मनही मुरडल्यासारखे !स्मित गूढ आहे का तुझे
अर्थात दडल्यासारखे !वागून वागावे कसे...?
काही न घडल्यासाऱखे !लिहिलेस माझे नाव तू
तेही घुसडल्यासारखे !होऊन मी बोलू किती ?
माझेच नडल्यासारखे !आठ्या कपाळी़... ओठही -
होते दुमडल्यासारखे !माझे-तुझे नाते जणू
दुखणे रखडल्यासाऱखे !
गझल:
प्रतिसाद
नितीन
रवि, 13/05/2007 - 12:18
Permalink
आयुष्य संपू लागले...
प्रदीप,
छान जमलीय... फक्त एक शेर जरा खटकतोय-
आयुष्य संपू लागले...
वाया दवडल्यासारखे !
अर्थाची पुनरुक्ती झाल्यासारखी वाटते... वाया घालणे आणि दवडणे...?
-नितीन
प्रदीप कुलकर्णी
रवि, 13/05/2007 - 16:47
Permalink
धन्यवाद नितीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद नितीन...
दवडणे याचा अर्थ घालवणे. त्याच अर्थाने हा शब्द इथे वापरला आहे. उदाहरणार्थ - संधी दव़डू नकोस....वेळ दव़डू नकोस म्हणजेच संधी घालवू नकोस....वेळ घालवू नकोस....त्याच अर्थाने येथे म्हणता येईल...आयुष्य संपू लागले... कसे संपू लागले...? तर वाया घालवल्या(दवडल्या) सारखे....! (जसे पाहिजे होते, तसे घालवता आले नाही ) ..त्यामुळे पुनरुक्ती वाटत असली तरी तशी ती नाही.
- तुझा आरशाचा शेर मला खूपच आवडला होता. अगदी साधा, सोपा नि सरळ...
पुन्हा एकदा धन्यवाद...
...................
याच गझलेतील एका शेरात मला बदल सुचला आहे...गझल संकेतस्थळावर पाठवल्यानंतर हा बदल मला सुचला...हा बदल सध्या आहे त्यापेक्षा अधिक समर्पक वाटतो...
आधीचा शेर -
लिहिलेस माझे नाव तू
का हे घुसडल्यासारखे ?
.....
केलेला बदल -
लिहिलेस माझे नाव तू
तेही घुसडल्यासारखे !
पुलस्ति
रवि, 13/05/2007 - 17:22
Permalink
वा!
गझल आवडली.
आतून रडणे, चोरी पकडणे, पाऊल अडणे, माझेच नडणे, ओठ दुमडणे - मस्तच!!
--- पुलस्ति.
चित्तरंजन भट
रवि, 13/05/2007 - 22:23
Permalink
बघणे तुझे च
बघणे तुझे माझ्याकडे
चोरी पकडल्यासाऱखे !
वाव्वा!
लिहिलेस माझे नाव तू
तेही घुसडल्यासारखे !
व्वा!
छोट्या वृत्तातली मस्त गझल.
प्रणव सदाशिव काळे
मंगळ, 15/05/2007 - 09:06
Permalink
बघणे तुझे माझ्याकडे चोरी पकडल्यासाऱखे !
वा प्रदीपराव. छोट्या वृत्तातील सुंदर ग़ज़ल.
ओठांवरी येई हसू -
आतून ऱडल्यासारखे !
छान.
दाही दिशा म्हणतात या -
`झाले जखडल्यासारखे !!`
वा!
बघणे तुझे माझ्याकडे
चोरी पकडल्यासाऱखे !
वा वा. हासिल ए ग़ज़ल.
का वाटले वळणावरी
पाऊल अडल्यासारखे !
सुंदर.
आयुष्य संपू लागले...
वाया दवडल्यासारखे !
दवडणे मध्ये वायाचा समावेश होतो - सहमत.
स्मित गूढ आहे का तुझे
अर्थात दडल्यासारखे !
छान.
वागून वागावे कसे...?
काही न घडल्यासाऱखे !
अहाहा.
लिहिलेस माझे नाव तू
तेही घुसडल्यासारखे !
:-)
माझे-तुझे नाते जणू
दुखणे रखडल्यासारखे
छानच. 'राहिले माझेतुझे नाते घसार्यासारखे - चित्तरंजन' हा शेर आठवला.
काही ठिकाणी ऱ ला नुक़्ता का बरे असावा?
नितीन
मंगळ, 15/05/2007 - 18:46
Permalink
- तुझा आरशाचा शेर
"- तुझा आरशाचा शेर मला खूपच आवडला होता. अगदी साधा, सोपा नि सरळ..."!!!
पण त्या शेरावर बरीच चर्चा झाली येथे...
लिहिलेस माझे नाव तू
तेही घुसडल्यासारखे !
केलेला बदल छान आहे... मला वाटते हाच शेर ठेवावा...
कुमार जावडेकर
मंगळ, 15/05/2007 - 22:02
Permalink
वा!
वा प्रदीप,
सुंदर गझल..
दाही दिशा म्हणतात या -
`झाले जखडल्यासारखे !!`
- वा! वा!! वा!!!
'चोरी पकडल्यासारखे'ही अप्रतिम!
- कुमार
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 15/05/2007 - 22:45
Permalink
धन्यवाद कुमार...!
धन्यवाद कुमार....
तुझी एखादी नवी गझल येऊ दे...! खूप दिवसात आली नाही...