टाळीबाज

काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?


शब्द असतातच दिखाऊ, नाटकी
अर्थही झालेत टाळीबाज का?


बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी
वाचताना वाटते मग लाज का?


पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?


दूर व्हावे अन दिसावी संगती -
रे मना, तू ईश्वरी कोलाज का?


प्राण जोवर, कर्ज उरते तोवरी
कोठवर नुसतेच फेडू व्याज? का?


आग, पडझड, धूळ, भीती, आसवे...
आजही कानात ते आवाज का?

गझल: 

प्रतिसाद

काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?
वा. पहिली ओळ अगदी मस्त, बोलल्यासारखी आली आहे.

शब्द असतातच दिखाऊ, नाटकी
अर्थी झालेत टाळीबाज का?
वाव्वा!
बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी
वाचताना वाटते मग लाज का?
वा!
पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?
वा!
'ईश्वरी' कोलाज थोडे ओढून ताणू आल्यासारखे वाटले. पण छान कल्पना. कोलाज हे यमक आवडले. अशी यमके यायला हवीत. जवळपास तीच गोष्ट इतर द्विपदींची, असे मला वाटते. एकंदर गझल आवडली.

पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?
दूर व्हावे अन दिसावी संगती -
रे मना, तू ईश्वरी कोलाज का?
हे दोन शेर जास्त आवडले.
हा प्रतिसाद आधी गेला नाही, कॉपी पेस्ट करायला गेले की साईट एरर देते:)
सोनाली

शीर्षकाचा शेर वगळता सगळी गझल आवडली. शुभेच्छा.

पूर्ण गझलच आवडली.