भळभळतांना जाणवले की..

(माफ करा, आता अगदी राहवतच नाहीये, म्हणून गेल्या १३ दिवसांचा गझललेखनाचा उपवास सोडतो आहे.)

=============================

भळभळतांना  जाणवले  की  रुतले  होते  टोक  किती
जगण्याच्या  माथ्यावर  पडली  'तू  नसल्याची ' खोक  किती..!

सुखा, तुझ्यापाठी  पळतांना  जाणवले  नाहीच  कधी,
अस्तित्वाच्या  ताठ  कण्याला  सुटले  माझ्या  पोक  किती !

परस्परांशी  सौहार्दाचे  प्रयोग  रंगत गेले  अन्
पडद्यामागे जाता  जाता  बदलत गेले  लोक  किती..

यंदाच्या  जनगणनेमध्ये  हे पण  मोजून  टाका  की--
किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती?

किती  उपेक्षा  केली  त्याची, सदैव  जे  माझे  होते..
कधीच  माझे  झाले  नाही, त्याच्यासाठी  शोक  किती !

शिकून  घ्या रे  सगळे  ओझे  अपुले  आपण  पेलाया
खुशाल  टाका  मान, असे  उरले  खांदे  निर्धोक  किती??

-ज्ञानेश.
===========================

गझल: 

प्रतिसाद

यंदाच्या  जनगणनेमध्ये  हे पण  मोजून  टाका  की--
किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती?
ज्ञानेशराव, उपास शरीराला हानीकारक असतात. जास्त करू नका. आमचं नुकसान होते.

ज्ञानेश,
फारच जोरदार पुनरागमन केलेत.
फार सुंदर गझल आहे. पोक अन खोक उत्तम! लोक आणि शोक त्याहुन उत्तम!
शुभेच्छा!

छान गझल. आवडली!

यंदाच्या  जनगणनेमध्ये  हे पण  मोजून  टाका  की--
किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती? >> हा खासच!

ज्ञानेश, गझल फार आवडली!
पोक आणि बिनडोक हे शेर तर खासच!!

सगळ्यांच शेरांचा आशय आवडला
-मानस६

प्रिय मित्र ज्ञानेश, असे का ?इतकी उत्कृष्ट गझल केल्यावर तो 'बिनडोक' चा शेर कशाला समाविष्ट केलास?
त्याने एकदम धुंदी खाडकन उतरते.

ज्ञानेश,
बहारदार गझल.

भळभळतांना  जाणवले  की  रुतले  होते  टोक  किती
जगण्याच्या  माथ्यावर  पडली  'तू  नसल्याची ' खोक  किती..!

भटांच्या
मी बसलो जन्माच्या पारावर
दुजसाठी भिरभिरते नजर दूर...
या शेराशी आपला मतला नाते सांगतो. प्रेयसीचे नास्तित्व आणि त्याचा जगण्याशी असलेला संबंध भटांनी ज्या पठडीत मांडलेला आहे त्याच पठडीत आपण मांडलेला आहे. जन्माचा पार आणि जगण्याचे माथे हे दोन्ही जीवनकोन एकाच मुशीतील आहेत.
हा बदल कसा वाटतो, पहावे.
शिकून  घ्यावे  सगळे  ओझे  अपुले  आपण  पेलाया
खुशाल  टाका  मान, असे  उरले  खांदे  निर्धोक  किती??

रे शब्दात इतरेजनांना आवाहन आहे. समाजाभिमुखता आहे. वे मध्ये अंतर्मुख चिंतन आहे व पर्यायाने येणारे आत्मसूचन आहे.
कोणताही शब्द घेतला तरी अर्थ समजतो. केवळ दिशा विरुध्द आहेत. 

शुभेच्छा.

प्रतिसादाबद्दल  सर्वांचे  आभार.
@केदार- तुम्ही  सुचवलेला  बदल  योग्य  आहे. "शिकून  घ्यावे" हेच  चांगले  (वाटते)!

यंदाच्या  जनगणनेमध्ये  हे पण  मोजून  टाका  की--
किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती?
वाव्वा.. मस्त.. एकंदर चांगली गझल आहे ज्ञानेशराव. सगळेच शेर आवडले.

ज्ञानेश.....
भळभळतांना  जाणवले  की  रुतले  होते  टोक  किती
जगण्याच्या  माथ्यावर  पडली  'तू  नसल्याची ' खोक  किती..!
दण्डवत..........!!!
हा शेर वाचल्यापासुन त्याची धुन्दी उतरतच नाहिये......
 
क्या बात है!

चित्त दा, जमीर साहेब, समीर... सर्वांचे मनापासून आभार मानतो.

भळभळतांना  जाणवले  की  रुतले  होते  टोक  किती
जगण्याच्या  माथ्यावर  पडली  'तू  नसल्याची ' खोक  किती..!
उपमा व किंचित धक्कातंत्र! जगण्याचे माथे, त्याच्यावर खोक पडणे, तीही तू नसल्याची. यशस्वी शेर.
सुखा, तुझ्यापाठी  पळतांना  जाणवले  नाहीच  कधी,
अस्तित्वाच्या  ताठ  कण्याला  सुटले  माझ्या  पोक  किती !
चांगला शेर! दुसर्‍या ओळीतील 'माझ्या' या शब्दाला किंवा एकंदर शब्दरचनेला रीऑर्गनाईझ केल्यास कानावाटे किंवा डोळ्यावाटे जाताना फार टोलनाके लागणार नाहीत. पोक सुटणे हा शब्दप्रयोग कमी प्रचलित असून पोक येणे हा शब्दप्रयोग प्रचलित आहे. या शेरातील खयाल नावीन्ययुक्त करावा अशी एक आमची इच्छा!
परस्परांशी  सौहार्दाचे  प्रयोग  रंगत गेले  अन्
पडद्यामागे जाता  जाता  बदलत गेले  लोक  किती..
परस्परांशी सौहार्दाचे प्रयोग रंगत गेले ही फार सुंदर कल्पना आहे. मुळात सौहार्द आहे हेच त्यातील नाट्य असावे असा भास होतो. खरे आहे. जगत असताना आपण कित्येक वेळा मनाविरुद्ध अनेक गोष्टी करतो. लाईफ पार्टनर, बॉस, मित्र, शेजारी, सहकारी, नातेवाईक कुणीतरी समधानी व्हावा म्हणुन बर्‍याचवेळा आपण आपल्याकडे थोडेसे असमाधान घेतो. तसेच त्यांचेही असतेच. हे सगळे सौहार्दाचे प्रयोग असतात. मुळात आपल्याला काय किंवा इतरांना काय थोडासा मनस्ताप होतच असणार. पण चेहर्‍यावरचे भाव मात्र वेगळे. मात्र पहिल्या ओळीत अत्यंत उंचीवर नेलेला मुद्दा फारच वेगात दुसर्‍या ओळीत खाली यऊन आपटतो. म्हणजे 'लोक नाटकी वागत गेले' असे म्हंटल्यावर मग 'ते लोक पडद्यामगे जाता जाता बदलत गेले' इतकेच सांगीतले जाते. येथे विधानात्मकता येते. संन्यस्त माणसाच्या तत्वज्ञानाप्रमाणे हा विचार होतो. 'अचानक एका दिवशी सगळ्यांचे मुखवटे गळुन पडले' किंवा 'बाप पण मुलाशी नाटकी वागयला लागले' किंवा 'माणसे स्वतःच स्वतःशी नाटकी वागायला लागली' असे काहीतरी किंवा याहून उंचीवरचे काहीतरी घेउन पुनःप्रकाशित केल्यास आम्हाला आनंद होईल.
यंदाच्या  जनगणनेमध्ये  हे पण  मोजून  टाका  की--
किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती?
सगळ्यांना हा शेर आवडला. हा शेर आवडण्यासारखा आहेच. पण या ओळी गझलेच्या नाहीत. अडाणीच खरे शहाणे असतात वगैरे अशी ती एक भावना आहे. किंवा एखाद्या विनोदी कवितेच्या ओळी वाटतात. किंवा बंडखोर कवितेच्या!  मतल्याचा अन या द्विपदीचा दर्जा यांची तुलना करून बघा. वादळातील होडीमध्ये जसे वरखाली होते तसे शेर वाचून होणे चांगले नाही.
किती  उपेक्षा  केली  त्याची, सदैव  जे  माझे  होते..
कधीच  माझे  झाले  नाही, त्याच्यासाठी  शोक  किती !
उत्तम शेर. यशस्वी शेर!
शिकून  घ्या रे  सगळे  ओझे  अपुले  आपण  पेलाया
खुशाल  टाका  मान, असे  उरले  खांदे  निर्धोक  किती??
हा पण बरा शेर आहे, पण सुधारणेचा प्रचड वाव आहे. म्हणजे मुळात त्यातली विधानात्मकता जायला पाहिजे. ते पद्य वाटायला पाहिजे. सरळसोट अर्थ नसायला पाहिजे. काहीतरी ट्विस्ट आवश्यक आहे.
मतला व शोक या शेरांचा विचार करता व नवीन वृत्ताचा प्रयोग या निकषांवर एकंदर गझल चांगली व खूप चांगलीच्या सीमारेषेवर आहे.
१०० पैकी ६०

किती  उपेक्षा  केली  त्याची, सदैव  जे  माझे  होते..
कधीच  माझे  झाले  नाही, त्याच्यासाठी  शोक  किती !
शिकून  घ्या रे  सगळे  ओझे  अपुले  आपण  पेलाया
खुशाल  टाका  मान, असे  उरले  खांदे  निर्धोक  किती??
कलोअ चूभूद्याघ्या

भाषेतून अभिव्यक्ती.
यंदाच्या  जनगणनेमध्ये  हे पण  मोजून  टाका  की--
किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती?

शहाणे आणि बिनडोकांची जनगणना ही कल्पना चांगलीच आहे. पहिल्या ओळीत 'हे पण मोजून टाका की' यातील अगतिकता किंवा उपहास व्यवस्थित प्रकट होतो. अतिशय अडाणी असलेली एखादी दुर्गम खेड्यातील स्त्री गृहीत धरली तर अगतिकता आणि निरागसता वाटते. मी एकदा तामिळनाडूतून सोलपूरला परत येत असताना तेथील खेड्यातील एका स्त्रीने असेच सांगितले होते की आमच्या राजूला खुशाली सांगा की. त्यांना ना पत्ता माहित होता न काही. कारण सोलापूर किती मोठे आहे त्यांना काय माहित? त्यांना फक्त आपले छोटेसे गाव माहित. असो. उपहासाने आपण काही कामे सांगत असतो. तसेच हे ही वाटते. दोनही अर्थाने छान. किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती? प्रत्येक शहराची जवळपास हीच स्थिती आहे.
तसा मी फारसा बोलत नाही.

यंदाच्या  जनगणनेमध्ये  हे पण  मोजून  टाका  की--
किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती?
खूपच छान शेर!

वाह!!!
हर एक शेर...वजनदार........
परस्परांशी  सौहार्दाचे  प्रयोग  रंगत गेले  अन्
पडद्यामागे जाता  जाता  बदलत गेले  लोक  किती..
किती  उपेक्षा  केली  त्याची, सदैव  जे  माझे  होते..
कधीच  माझे  झाले  नाही, त्याच्यासाठी  शोक  किती !