माझा भाऊ सुरेश २
प्रा. हबीब-उर्-रहमान सिद्दिकी हे उर्दू-फारशी, अरबीचे प्रकांडपंडित होते. ते मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठचे. नोकरीनिमित्त ते अमरावतीत आले होते. त्यांची सगळी मुले उच्चशिक्षित. त्यांचा मोठा मुलगा अलहाज वलीभाई हा सुरेशच्या मुंजीला आला होता. त्याला मराठी चांगले येत होते. त्यानेच सुरेशला, तो गझल मराठीत लिहीत आहे, हे समजावून सांगितले. उर्दू गझल कशी असते, हे जाणण्यासाठी त्याने उर्दूची शिकवणी लावली. उर्दू शिक्षक घरी येत असे. गझलेचे मर्म, आत्मा इत्यादी जाणून घेण्यासाठी सिद्दिकी यांच्या घरी सुरेशचा मध्यरात्रीपर्यंत मुक्काम असे. याचे सविस्तर वर्णन अलहाज जकां-उर्-रहमान सिद्दिकी यांनी `अजीब मर्द था - सुरेश ट` या लेखात केले आहे. हा अकरा पानांचा लेख उर्दू साहित्यास वाहिलेल्या व मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या `नया वर्क ` या अर्धवार्षिकाच्या (मार्च-ऑगस्ट २००३) अंकात सुरेशच्या छायाचित्रांसह प्रकाशित झालेला आहे. सुरेशला उर्दू भाषा, साहित्य, काव्य आणि संस्कृतीचा संपूर्ण परिचय सिद्दिकी परिवारानेच करून दिला, यात शंका नाही. ते सर्वचजण त्याचे खरेखुरे उस्ताद होते. सुरेशने विशेष परिश्रम घेऊन उर्दू आत्मसात केली. पुढे त्याला उर्दू मुशायऱ्याचा सद्र म्हणून आमंत्रित केले जात असे, एवढा अधिकार, प्रभुत्व त्याने उर्दूवर जिद्दीने, परिश्रमांनी मिळविले होते.
वली सिद्दीकी ह्यांच्यासोबत
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
या सुरेशच्या कवितेमधील चार ओळींची मोठमोठी पोस्टर, होर्डिंग मुबंई, पुणे, नाशिक इत्यादी शहरांतील चौकाचौकांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषा दिनी (२७ फेब्रुवारी २००८) लावली होती. सुरेशची ही कविता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळातील गाजलेली कविता आहे. `जर तुम्ही प्रभु राम तर मग रावणी दरबार का` ही त्याची कविताही लोकप्रिय झाली होती.
घरातील आणि घराबाहेरील वातावरण सुरेशच्या प्रतिभेला पूरक असल्याने ती प्रगल्भ होत गेली. कवितालेखनाबरोबरच तो गद्य लेखनही करीत असे. `काकूचे समाजकार्य` आणि `वधूपरीक्षा` (१९५२-१९५५) ही दोन प्रहसनेही त्याने लिहिली होती. रंगमंचावर या प्रहसनांचे अनेक यशस्वी प्रयोग झाले होते.
`डंका` या साप्ताहिकाचे संपादकपदही त्याने भूषविले होते. नंतर त्याने साप्ताहिक आझाद,साप्ताहिक जागृत विदर्भ, साप्ताहिक बहुमत इत्यादी वृत्तपत्रेही काढली होती. `नागपूर पत्रिके`चा मुख्य कार्यकारी संपादक म्हणूनही त्याने काही वर्षे काम केले होते.
नंतर तो नागपूर लोकमतसाठी लिहू लागला. रोखठोक, लेखाजोखा अशी सदरे तो लिहीत असे. गझलेविषयी तो साप्ताहिक लोकप्रभा, लोकमतची मंथन पुरवणी, मेनका मासिक इत्यादी नियतकालिकांत लिहीत असे. गझलांची सदरे चालवीत असे. या सदरांत नवोदित गझला तो प्रसिद्ध करी. याच दरम्यान त्याने केव्हातरी `गझलेची बाराखडी` लिहिली आणि छापून घेतली. ही बाराखडी तो शेकडो नवगझलकारांना सप्रेम भेट म्हणून स्वखर्चाने पाठवीत असे. हीच बाराखडी `रंग माझा वेगळा`मध्ये पुरवणी म्हणून शेवटी छापण्यात आलेली आहे.
सुरेश अमरावतीत असताना दैनिक `लोकसत्ता`चा जिल्हा वार्ताहर होता. पुढे तो `तरुण भारत`चाही जिल्हा वार्ताहर बनला. त्याच्याच कारकीर्दीत अमरावतीत जिल्हा कार्यालय सुरू झाले होते. `तरुण भारत`चे हिंदी भावंड `युगधर्म`चाही तो जिल्हा प्रतिनिधी होता.
सुरेशने जाहिरातींसाठी कॉपी रायटिंगही केले होते. ही कॉपी आकर्षक असे. १९६५ च्या सुमाराला खाण्याच्या तेलात बिनदिक्कत भेसळ होत असे. तेव्हा त्याने खाद्यतेलाच्या भांडाराच्या जाहिरातीत `शुद्धता, हीच आमची प्रतिष्ठा` असे घोषवाक्य लिहिले. हेच वाक्य अनेक तेलविक्रेत्यांनी उचलले व दुकानाच्या पाटीवर लिहिले !
सुरेश १९५३-५४ च्या सुमाराला कॉ. शाहीर अमर शेख यांच्या घरी मुंबईत राहायला होता. सुरेश पहिल्यापासूनच डाव्या विचारसरणीचा व `स्टुडंट फेडरेशन`चा सक्रिय कार्य़कर्ता होता. त्याने संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचारकार्याला वाहून घेतलेले होते. त्यासाठी त्याने `गीत तुझे मी आई गाइन` हे प्रचारगीत लिहिले होते. त्याची रेकॉर्ड निघाली होती. गायक होते बुलंद आवाजाचे शाहीर अमर शेख. ही रेकॉर्ड प्रचारकार्यात खूपच वाजली आणि गाजली.
त्या नंतर`चल ऊठ रे मुकुंदा झाली पहाट झाली` (गायिका - सुमन कल्याणपूर, संगीत - दशरथ पुजारी) हेही गाणे आकाशवाणीवर अनेकदा वाजत असे. अमरावतीत १९६६ च्या जुलै-ऑगस्ट महिन्यात सुप्रसिद्ध गायिका (कै.) निर्मलादेवी (अभिनेता गोविंदा याची आई) यांचे गायन झाले होते. त्या मैफलीत सुरेशने मनमुराद दाद दिली. उभयतांचे स्नेहसंबंध जुळले. सुरेशला त्यांनी त्यांच्या विरारच्या घरी बोलावले. त्या सुरेशच्या गझला गाणार होत्या. इतकी बोलणी झाली होती, तसे घडले. त्यांनी गाइलेल्या `मी एकटीच माझी असते कधी कधी` ही गझल गाजली. या गझलेला संगीत दिले होते संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी. (राज ठाकरे यांचे वडील).
`मलमली तारुण्य माझे`ची पहिली रेकॉर्ड गाजली. हे गाणे `घरकुल` या चित्रपटात आहे. चित्रपटाचे निर्माते, संगीतकार सी. रामचंद्र (अण्णा) यांना, अस्ताई, अंतरा, वृत्त, छंद, कोणते हे ध्यानात येत नव्हते. म्हणू त्यांनी त्या वेळी ते शांताबाई शेळके यांना विचारले. त्या मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात गेल्या. शोध घेतला व सर्व माहिती
अण्णांना दिली. ही माहिती पं. हृदयनाथ मंगेशकरांनी १९७२ साली सुरेशला अमरावतीत पोलिस वेलफेअर असोसिएशनच्या कार्यक्रमाकरिता ते आले असता सांगितली. यानंतर `उषःकाल होता होता...` , `सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...` अशी सुरेशची अनेक चित्रपटगीते गाजली. त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली ती लता मंगेशकर यांनी लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये गाइलेल्या `मेंदीच्या पानावर` या गीतामुळे. या काळात हे गीत महाराष्ट्रात सर्वत्र वाजत-गाजत होते.
- दिलीप श्रीधर भट
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 03/11/2008 - 04:22
Permalink
चांगली माहिती.
आपल्या या लेखामधून त्यांच्याबाबतची काही इतरही माहिती मिळाली. छायाचित्रे बघून आनंद झाला.