माझा भाऊ सुरेश १


`जीवना तू तसा मी असा`  हे सुरेशच्या संकल्पित आत्मकथनाचे नाव.

आचार्य अत्रे यांच्या `दैनिक मराठा`च्या पहिल्या अंकाच्या (१५ -११-१९५६) `मराठ्या उचल तुझी तलवार` ही कविता छापण्यात आली होती. `दैनिक मराठा` हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुखपत्र होते. सर्वाधिक खपाचा विक्रम या दैनिकाच्या नावावर होता. महाराष्ट्राच्या निर्मितीत `दैनिक मराठा`चा फार मोठा सहभाग होता. `कऱहेचे पाणी` या आपल्या आत्मचरित्रात वर या कवितेची तीन कडवी प्रकाशित झालेली आहेत. आचार्य अत्र्यांनी, उदयोन्मुख तरुण, प्रतिभावान कवी, असे सुरेशचे वर्णन केले आहे.


`जीवना तू तसा मी असा`  हे सुरेशच्या संकल्पित आत्मकथनाचे नाव. यासाठी तो मला भट वंशवृक्ष (इ. १६५० पासून) जन्म, शिक्षण, प्रवास, अपघात, आजार, मृत्यू इत्यादींचे संदर्भ मला मागत असे. ते मी त्याला लिहून पाठवत होतो. त्याने मला, तू पण लिही, तुझी भाषा साधी, सहज व ओघवती आहे, असे सांगितले. पण हे सांगणे मोठ्या भावाने लहान्याचे केलेले कौतुक समजून मी सोडून दिले. पण जेव्हा त्याने आत्मकथनाचे एक अक्षरही लिहिले नाही, असे मला समजले, तेव्हा मी माझ्या आठवणी लिहिण्यास सुरुवात केली.
सुरेशचा जन्म १५ एप्रिल १९३२ चा. स्थळ ः अमरावती, तिथी रामनवमी, वेळ दुपारी १२ ची). सुरेश अडीच वर्षांचा असताना त्याला पोलिओ झाला. त्यामुळे माझी आई व डॉक्टर असलेले वडील हादरले, पण त्यावर शास्त्रोक्त उपचार व्हावेत म्हणून मुंबईच्या कात्रक यांच्याकडे त्याला नियमितपणे घेऊन जात असत. त्याचा फायदा पुढे सुरेशला झाला. त्याच्या अधू पायात इतकी शक्ती आली की, त्याला तेव्हा चालण्यासाठी
काठीचा पण आधार घ्यावा लागत नसे. माझ्या वडिलांनी Psychoanalysis of physically disable chileld and a person हे व यासारखी अनेक पुस्तके मुंबईहून आणून वाचली. तो मनाने अधू होऊ नये म्हणून सतत प्रयत्न चालू ठेवले. त्याच्यासाठी क्रिकेटचा संच व व्हॉलीबॉल आणून दिला. घरी दंड-बैठका मारावयाला लावल्या. दंड अधिक मजबूत व्हावेत म्हणून हत्ते, मुद्गल, आणले. तो डबलबारही चांगल्याप्रकारे मारत असे. त्या काळात त्याच्यासाठी ग्रामोफोन आणला.दर आठवड्याला एक रेकॉर्ड त्याच्यासाठी आणली जायची. तो लहान असताना त्याची लायब्ररी होती. त्याला आई वाचून दाखवीत असे. त्याला संगीत आवडे म्हणून `विश्वास` कंपनीची बाजाची पेटीही घेतली होती. श्रीप्रल्हादबुवा हे संगीत शिक्षक घरी येत असत. त्याला तबला, पेटी, बासरी चांगली वाजवता येत असे.
डॉ. श्रीधर रंगनाथ भट हे आमचे वडील. ते १९२६ साली मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज
मधून एमबीबीएस झाले. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात लॅटिन भाषेचे प्राथमिक धडे शिकविण्यात येत असत. त्यामुळे त्यांचे इंग्रजी उत्तम होते. पुढे ते ऑस्ट्रिया, जर्मनी, व्हिएन्ना येथून `डीएलओ` झाले.
शांताबाई श्रीधर भट ही आमची आई. ती १९३१ सालची जी. ए. पास होती. तिचे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत उत्तम होते. याचे कारण इंग्रजीला प्रा. लागू, मराठीला प्रा. वामन मल्हार जोशी, संस्कृतचे प्रकांडपंडित महामहोपाध्या श्रीहरी रामचंद्र दिवेकर होते. दिवेकर हे पुढे अलाहाबादच्या विदिशा विश्वविद्यालयाचे कुलगुरू झाले.
आईने सुरेशचे व्याकरण व वृत्त पक्के केले. सुरेशला `वृत्तदर्पण` पाठ होते. सुरुवातीला सुरेशच्या अनेक कवितांची ती प्रथम श्रोती व समीक्षक होती. तिने महिलाप्रधान दोन नाटकेही लिहिली होती. ती १९५१ च्या सुमारास दादरच्या वनिता समाजाने मंचावर आणली होती. आईचे माहेरचे आडनाव होते ओक.
आम्ही अमरावतीत जवाहर रोडवर राहत होतो. हा विभाग म्हणजे अमरावतीची मुख्य बाजारपेठ. घर व दवाखाना एकाच इमारतीत होता. या घराला एकूण २७ खोल्या होत्या. शेजारी पोलिस कोतवाली होती. आजूबाजूला खाली दुकाने व त्यांवर राहण्यासाठी खोल्या अशा चाळी होत्या. यात मारवाडी, गुजराथी, उत्तर प्रदेशातील पुरभय्ये, दातांचे चिनी डॉक्टर राहत असत. या मंडळींबरोबरच पारशी, बोहरी इत्यादींचीही दुकाने होती. या भागात भांडणे, मारामाऱ्या महिन्या-दोन महिन्यांनी होतच असत. एकदा एक मोठा दंगाही झाला होता. हे सर्व सुरेश बघायला जात असे. असे धाडस त्याच्यात उपजत होते. या वातावरणाचा परिणाम त्याच्या मनोवृत्तीत निश्चितपणे घडला होता.
आमचे आई-वडील उत्तम वाचक, पुस्तकप्रेमी व ग्रंथसंग्राहक होते. आमचे येथे टाइम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दैनिक महाराष्ट्र (नागपूर) , दैनिक लोकसत्ता, दैनिक मराठा, शिक्षणपत्रिका (मुंबई), अभिरुची, बडोदा, स्त्री, किर्लोस्कर, पॉप्युलर सायन्स,
ब्रिटिश मेडिकल जनरल, पंच, शंकर्क वीकली, समाजप्रबोधन पत्रिका इत्यादी नियतकालिके नियमितपणे येत असत. नगर वाचनालयाचे ग्रंथपाल वडिलांचे पेशंट असल्यामुळे अनेक नवी पुस्तके, मासिके घरपोही मिळत. या सगळ्यांचा लाभ सुरेशला झाला. तेव्हापासून त्याला वाचनाची आवड लागली. हातात आवडलेला ग्रंथ, पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. नगर वाचनालयाच्या ग्रंथसंग्रहाचा त्यान भरपूर लाभ घेतला. वाचनालय बंद असतानाही तो आत पुस्तक वाचीत बसलेला असायचा. तो वाचन करताना नेहमी टेबल-खुर्चीवर बसे. टेबल लँप लावून तो वाचत असे. मधूनमधून पाणी पिण्यासाठी लोटा-भांडं, चुना-तंबाखू, इत्यादीही असे. गहन विषयांवरील ग्रंथ, ग्रंथांचे वाचन या प्रकारे तो करीत असे. हलक्याफुलक्या विषयांच वाचन गादीवर लोळत करायची त्याची पद्धत होती. या वाचनवेडातूनच त्याला चष्मा लागला. कारण, तो दिवसाचे१५-१५, १६-१६ तास वाचीत असे. या वाचनामुळेच त्याला पुस्तके विकत घेण्याचाही नाद लागला. त्याच्या संग्रहात अनेक दुर्मिळ ग्रंथ होते. अशा ग्रंथांचा फार मोठा साठा त्याने केलेला होता. तो नेहमी पोटावर झोपायचा व त्याला उंच उशी लागायची. त्याची झोप सावध असे.
सुरेश हजरजबाबी होता. नागपूरच्या मातृसेवा संघाला मदतीसाठी सुरेशने त्याचा `एल्गार` हा कार्यक्रम केला होता. तेव्हा संस्थेच्या अध्यक्षा प्रमिलाताई दाणी होत्या. हा कार्यक्रम मातृसेवा संघात १९८२ च्या सुरुवातीला झाला होता. विदर्भ साहित्य संघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. राम शेवाळकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते. कार्यक्रम रंगात आला असताना शेजारच्या रस्त्यावरून लग्नाची वरात बँड वाजवीत गेली. तेव्हा प्रा. शेवाळकर सुरेशला उद्देशून म्हणाले, `बँडच्या तालावर तू काही गा !` सुरेशने त्यावर तत्काळ उत्तर दिले, `बँडच्या तालावर गायला हा काही विदर्भ साहित्य संघाचा परिसर नाही.` हा त्याचा मूंहतोड जबाब ऐकून प्रा. शेवाळकरांसह सगळेच जण मोठ्याने हसले व त्याला दाद दिली.
अमरावती प्रा. के. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन झाले होते. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर `डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व्हावे,` असा ठराव संमत व्हावा, असा सुरेशचा प्रयत्न होता. पण या ठरावाला होणार विरोध पाहून त्याने मिरवणूक काढली. निदर्शने केली. घोषणा दिल्या. नेतृत्व केले. शेवटी ठराव मांडायला परवानगी मिळाली व ठराव संमतही झाला. याच संमेलनात सुरेशची मुलाखत डॉ. गं. ना. जोगळेकर यांनी घेतली होती. ती प्रकट मुलाखत चांगलीच गाजली होती. त्याने त्याच्या गझला बुलंद आवाजात म्हटल्या. तो प्रश्नाला त्वरित उत्तरे देत होता. त्याला उपस्थित चांगलीच दाद देत होते. सभामंडप पूर्णपणे भरला होता व शेकडो लोक उभ्याने ऐकत होते. त्याचे संपूर्ण ध्वनिमुद्रण दुसऱ्या दिवशी  आकाशवाणी नागपूरने प्रक्षेपित केले होते. ते श्रोत्यांना इतके आवडले की, ते काही महिन्यांच्या अंतराने परत प्रक्षेपित केले. या कार्यक्रमात सुरेश हा डॉ. जोगळेकरांना साहेब, जोगळेकरसाहेब, असे संबोधीत होता, तर ते सुरेश `भट` असे म्हणत होते. मुंबई-पुण्याच्या आणि विदर्भाच्या भाषा-संस्कृतीमधील फरक स्पष्ट होत होता. या कार्यक्रमाला मी सहपरिवार उपस्थित होतो.
`आसवांवाचुनी काय आपुल्या हाती` ही सुरेशची गाजलेली कविता. त्याचे मराठीचे प्राध्यापक दिवाणजी यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्याने ती लिहिली व ती विदर्भ साहित्य संघाच्या `युगवाणी`च्या मासिकात १९५० साली प्रकाशित झाली होती. यानंतर अनेक मासिकांत, वृत्तपत्रांत त्याच्या कविता प्रकाशित होत गेल्या. आचार्य अत्रे यांच्या `दैनिक मराठा`च्या पहिल्या अंकाच्या (१५ -११-१९५६) `मराठ्या उचल तुझी तलवार` ही कविता छापण्यात आली होती. `दैनिक मराठा` हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुखपत्र होते. सर्वाधिक खपाचा विक्रम या दैनिकाच्या नावावर होता. महाराष्ट्राच्या निर्मितीत `दैनिक मराठा`चा फार मोठा सहभाग होता. `कऱहेचे पाणी` या आपल्या आत्मचरित्राच्या पाचव्या खंडात (पान क्रमांक ३२०-३२१) वर या कवितेची तीन कडवी प्रकाशित झालेली आहेत. (संपूर्ण कविता माझ्याजवळ आहे) आचार्य अत्र्यांनी, उदयोन्मुख तरुण, प्रतिभावान कवी, असे सुरेशचे वर्णन केले आहे.