भेट चोरटी...

=====================


आज  तू  खुशाल  गाल  लाल  होत  जाउदे,
भेट  चोरटी  जरा  'जहाल'  होत  जाउदे...


रोज  मंद  गंध  होत  अंतरंग  व्यापतो,
आज  अंग माखण्या  गुलाल  होत  जाउदे


ठेवणीतला  नकोस  दागिना  करू  मला,
वापरातला  तुझा  रुमाल  होत  जाउदे !!


देह  लोळतो  किती  सुखात  साजणे  तुझा,
हे  न फार  चांगले, तु  'हाल'  होत  जाउदे...


स्वप्न्-बिप्न  सोड, आज  थेट भेट नेटकी..
सारखी  पुढेच  वाटचाल  होत जाउदे..


रोज  रोज  काय  तेच  गोड गोड  बोलणे?
तू  कधी  कधी  अशी  धमाल  होत  जाउ  दे..!


तोलतात  शब्द शब्द खोल, बोलतात की-
"गालगाल  गालगा"त  चाल  होत  जाउदे..!!


=====================

गझल: 

प्रतिसाद

ठेवणीतला  नकोस  दागिना  करू  मला,
वापरातला  तुझा  रुमाल  होत  जाउदे !!

वा ;)


तोलतात  शब्द शब्द खोल, बोलतात की-
"गालगाल  गालगा"त  चाल  होत  जाउदे..!!
:)
 
रोम्यांटिक आणि किंचित हझलिश (किंवा मिष्किल) गझल आहे एकंदर

चांगली जायची नोंद केली होती! तुमच्या या गझलेमुळे परत यावे लागले. अप्रतिम! रुमाल, हाल अन धमाल सॉलीड! 'गालगाल गालगा' उच्च!

मतला पण बेस्ट. एकदम जहाल. मला असे वाटते की आपण 'तू गाल' च्या ऐवजी 'हे गाल' किंवा 'ते गाल' करावेत. एनी वे. गझल अशी आहे की असले काही सुचवायलाच नको वाटते.

कोजगिरीच्या चा॑दण्यात हेच शब्ध येतील.

ठेवणीतला  नकोस  दागिना  करू  मला,
वापरातला  तुझा  रुमाल  होत  जाउदे !!
कलोअ चूभूद्याघ्या

ही गझल नाही.
मी गप्प आहे.

मस्तच शेर आहे हा ज्ञानेश! अभिनंदन...

@चित्तरंजन सर, भुषण, अजय, पुलस्ति... सर्वांचे  आभार मानतो.

ठेवणीतला  नकोस  दागिना  करू  मला,
वापरातला  तुझा  रुमाल  होत  जाउदे !!हा शेर आवडला.
बाकी शेरांना वाखाणतायेईल असे काही कारण सापडत नाही.

रोज  रोज  काय  तेच  गोड गोड  बोलणे?
तू  कधी  कधी  अशी  धमाल  होत  जाउ  दे..!
तोलतात  शब्द शब्द खोल, बोलतात की-
"गालगाल  गालगा"त  चाल  होत  जाउदे..!!
हे शेर आवडले...

आज  तू  खुशाल  गाल  लाल  होत  जाउदे,
भेट  चोरटी  जरा  'जहाल'  होत  जाउदे... वा  सही
-मानस६