..मी कुठे काही म्हणालो ?

...गझल...


त्याच रीती , त्याच चाली , मी कुठे काही म्हणालो ?
तेच ओझे , ती हमाली , मी कुठे काही म्हणालो ?


वाढते वय धावते माझ्यापुढे , टाकीत धापा ,
सांगती ह्या हालचाली , मी कुठे काही म्हणालो ?


मजवरी होत्या परजल्या आज तलवारी, तरी तू 
ठेविल्या लपवून ढाली , मी कुठे काही म्हणालो ?


शुभ्र खादीचे कवच अन कुंडले धारण करोनी ,
भाषणे देती मवाली , मी कुठे काही म्हणालो ?


"आपुली ही प्रीत ,सजणा, जन्मजन्माचेच नाते",
तीच हे सारे म्हणाली , मी कुठे काही म्हणालो ?


...शॅलेश कुलकर्णी.


 

गझल: 

प्रतिसाद


त्याच रीती , त्याच चाली , मी कुठे काही म्हणालो ?
तेच ओझे , ती हमाली , मी कुठे काही म्हणालो ?
वा...वा...
वाढते वय धावते माझ्यापुढे , टाकीत धापा ,
सांगती ह्या हालचाली , मी कुठे काही म्हणालो ?
उत्तम...

छान लिहीत आहात तुम्ही शैलेशराव.     तंत्रदृष्ट्या आणि मंत्रदृष्ट्याही. लिहीत राहा.
शुद्धलेखनाची ओढाताण (आधीच्या गझलेतील तपासुन हा शब्द), जुन्या धाटणीची भाषा टाळता आल्यास अधिक बरे... (या गझलेतील करोनी हा शब्द).      [आग्रह नाही. :) ]
असे केल्याने बिघडत काहीच नाही, पण रचनासौंदर्य उणावू शकते. असो.
 

प्रदीपजींशी सहमत आहे.गझल आवडली.मतला सगळ्यात जास्त आवडला.वाढते वयही आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

प्रदीपजी/ चक्रपाणिजी,
मार्गदर्शनासाठी धन्यवाद.
आजवरचे संपूर्ण शिक्षण हिन्दी व उर्दू माध्यमात झाल्यामुळे मराठी भाषेवर मर्यादित प्रभुत्च मिळवूशकलो आहे.  मनापासुन प्रयत्न करीत आहे. आपले असेच मार्गदर्शन लाभल्यास माझी वाटचाल योग्य दिशेनं होईल.   पुनश्च आभार.
-शॅलेश कुलकर्णी.
हिन्दीतल्या दोन स्वरचित ओळी प्रस्तुत करतो-
"अपने स्पर्श का इक छूटा कण बन, मेरे तन झूल गई हो ,
   तुम कल रात मेरे हाथों में अपना यॉवन भूल गई हो "

गझल आणि या हिंदी ओळीही आवडल्या,शैलेशराव.
शुभेच्छा!

स्वागत शैलेश! गझल आवडली.
धापा हा शेर तर फार फार मस्त आहे.

शैलेशजी,
गजल आवडली. विशेषतः हा शेर खूपच !
मजवरी होत्या परजल्या आज तलवारी, तरी तू 
ठेविल्या लपवून ढाली , मी कुठे काही म्हणालो ?
वा!
-सतीश