रंजकी जब...

मित्रांनो नमस्कार, 
उर्दूमधील
रंजकी जब गुफ्तगू होने लगी
'आप'से 'तुम' 'तुम'से 'तू' होने लगी ...
ही सुपरिचित गझल आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल.  

    ओळख झाल्यावर समवयीन व्यक्तीसुध्दा एकदम एकेरीवर येत नाहीत. हळुहळू परिचय वाढल्यावर आपोआप 'आपण' 'तुम्ही' वरून कधी  अरे तुरे सुरु होतं, कळतही नाही. मैत्रीचं नातं निर्माण होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं जातं. या शेरात तर दु:ख व्यक्त करण्याचा मामला आहे.  एकमेकांच्या व्यथा ऐकण्याचे  ते क्षण गहिरे होत जाऊन आदरार्थी बहुवचन कसं प्रेमळ एकवचनात रूपांतरीत होतं...याचं हा शेर अचूक शब्दांत वर्णन करतो.  
    
एकांत आहे, संध्याकाळ रात्रीकडे कलत चाललेली आहे, एक तरूण आणि एक तरूणी एकमेकांच्या सहवासात काही कारणामुळे आलेले आहेत, त्यांच्यात परिचयाची देवाणघेवाण होत आहे, पर्यायाने काही सुखं-दु:खं वाटली जात आहेत...असं दृष्य माझ्या डोळ्यांसमोर येतं. 
    अर्थात, ही घटना दोन तरूणांबाबतही घडू शकते, दोन तरूणींबाबतही.
    शिवाय, त्या दोन व्यक्ती नवजवानच असल्या पाहिजेत, असंही नाही. 
    शायराने व्यापक क्षितिज कवेत घेतले आहे. 

    मूळ मुद्दा आशयाचा आहे.     
    असाच, अगदी असाच शेर मराठीत लिहिला गेला आहे का, ही माझी जिज्ञासा आहे.
    अभ्यासूंनी ती पूर्ण करावी, ही विनंती.   

                                                                                                                           -केदार पाटणकर

प्रतिसाद

छान. एकमेकांच्या दुःखाबाबत बातचित सुरू झाली आणि हळूहळू साऱ्या औपचारिकत गळून पडल्या, असा एक अर्थ आहे. तर दुसरा अर्थ असाही होऊ शकतो - भांडणाला सुरवात झाली तशी हळूहळू सगळी शालीनता विसरली गेली. ;) चुभूदेघे. मराठीतला  अगदी असाच शेर सध्या आठवत नाही.


चित्तरंजन,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
शायराने पहिल्याच अर्थाने शेर लिहिला असावा, असा माझा प्रामाणिक दृढविश्वास आहे.
आपण म्हणता तो अर्थ असल्यास त्या 'गुफ्तगू' शब्द कसा येऊ शकतो?
भांडणाच्या वेळी आवाज चढतो.

असो. संकेतस्थळ चर्चेसाठीच आहे. मते, मतांतरे होत राहतील.

छोट्याशा लेखाची तातडीने दखल घेतल्याबद्दलही आभारी आहे.
मराठी शेर आठवल्यास जरूर द्यावा.


 

केदार,
असा शेर वाचल्याचे किंवा ऐकल्याचे स्मरत नाही, पण मूळ उर्दू शेर वाचून काही ओळी सुचल्या..(मतला म्हणा हवा तर)..त्या अश्या
               
        व्यथा-वेदना वाटूनी घेता नकळत जवळी आलीस ग.
       आधी ’आपण’, नंतर ’तुम्ही’, तदनंतर ’तू’ झालीस ग.

                        -मानस६

कवीला पहिला अर्थ अभिप्रेत असेलही, असावाच. पण ते एवढे महत्त्वाचे नाही आणि केवळ कवीला त्याला अभिप्रेत असलेला अर्थच खरा अर्थ नाही, असे मला वाटते.



'गुफ्तगू'चा मुद्दा योग्य वाटतो.  पण भांडणाला सुरुवात 'गुफ्तगू' ने झाली असावी.  हळूहळू त्याचे पर्यवसान भांडणात झाले, असेही म्हणता येईल. ;)

चित्त,
रसिकाला दुसरा अर्थ उमगला ही दखलपात्र व चर्चेयोग्य घटना आहे. 
आपणही स्वतःचे आकलन रसिकांसाठी खुले केलेत, हे स्वागतार्हच आहे. 
आपण गुफ्तगूबाबत जे स्पष्टीकरण दिले आहे ते अजिबात पटतच नाही, असे नाही.
दुस-या अर्थाची शक्यता आहे.

 

वा, मानस, वा ! क्या बात है !
खूपच छान.
अगदी नेमक्या ओळी.
जमीन तयार झालीच आहे. पुढील रचनाही आपणच पूर्ण करावी, अशी आपल्याला विनंती .
  

रंज की जब गुफ्तगू होने लगी... ही गजल ऐकली होतीच. आता 'नवे ले़़ख' या सदरातून हा विषय अचानक समोर आला. दोन चार दिवस रंजच डोक्यात होती.. याच अनुरोधाने काही बरे वाईट लिहिले आहे... मनमोकळे अभिप्राय, सुचना, सुधारणा  अपेक्षित...
रंज की जब गुफ्तगू होने लगी.. मराठी अविष्करण.
सरले अंतर, वाढे जवळीक जराजराशी
तुझ्या वेदना जेव्हा धरल्या मीच उराशी
'आपण', 'तुम्ही'’न कळताना झाले 'तू', 'मी'’
दुःखाच्या गुजगोष्टी होता परस्परांशी
उपचाराची हवी कशाला हातमिळवणी
भेटू तेव्हा धरेन तुजला मी हृदयाशी
वणवा होउन अता न जळते दुःख रातीला
तेवत असते दिव्यासारखे मंद उशाशी
ओठांवरती ओठ टेकता क्षणात कळते
कसे बोलते मुक्यामुक्याने सुख सुखाशी
--अविनाश ओगले

मा. ओगले ,
आपण एक चांगली रचना दिलीत. 
दुसरा शेरच रंजकी... ला जास्त जवळचा वाटतो.
उर्वरीत शेर फारसे मतलबाचे नाहीत.
मला एकच शेर अपेक्षित होता. मानस यांनीही छान ओळी दिल्या आहेत. त्यावर व आपल्या दुस-या शेरावर जरूर चर्चा व्हावी.

आपणाचे तुम्ही आणि तुम्हीचे तू जाहले
जवळ येता दु:ख मनचे प्रेम हेतू वाहले
आजवर घेउन खपल्या नी व्रणांनी बांधले
भेट होता जखम ओली होत सेतू वाहले
दुरी होती तोवरी अभिमान होता जो फुका
मीलनाची वेळ येता मी मी तू तू वाहले
पाहुनी भ्रमरास उमले फूल आवेगामधे
त्याच आवेगात त्याचे लाख तंतू वाहले