...कोठे जाऊ?
...कोठे जाऊ?
मज नको नको झाला शब्दच्छल... कोठे जाऊ ?
अर्थ शोधतो मी माझा चपखल...कोठे जाऊ ?
नेमके कुणाचे ऐकावे, समजेना काही...
मज दिशा दहाही म्हणती `चल, चल...`कोठे जाऊ ?
चेहरे नवे हे...नाही ओळख कोणाशीही...
राहिली न ती तेव्हाची मैफल...कोठे जाऊ ?
आठवे न काही केल्या वळण मलाही माझे...
मी उभाच एका जागी हतबल...कोठे जाऊ ?
आटपून आटोपेना...आग कशी अश्रूंची...
आवरू कसा मी हा वडवानल...कोठे जाऊ ?
जायचे मलाही येथून परत त्या काठाला...
ऐकतो, अता तेथेही दलदल...कोठे जाऊ ?
टोकदार काटे येथे...धगधग ज्वाळा तेथे...
घेउनी फुले मी माझी कोमल...कोठे जाऊ ?
ऐकवे न एकांता, आकांत तुझा एकाकी...
सोसवे न मौनाचा कोलाहल...कोठे जाऊ ?
एकटाच मी कोठे...? आहे कविता सांगाती...
भोवती खुळ्या शब्दांची दंगल...कोठे जाऊ ?
शेवटी उतारा आहे वत्सल त्या मृत्यूचा...
मज पचे न जन्माचे हालाहल...कोठे जाऊ?
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
जयन्ता५२
मंगळ, 28/08/2007 - 09:14
Permalink
तुम लिखते रहो
प्रदीप!
तुम लिखते रहो, हम पढते रहे
तो मजा जीने का और भी आता है
ऐकवे न एकांता, आकांत तुझा एकाकी...
सोसवे न मौनाचा कोलाहल...कोठे जाऊ ?
एकटाच मी कोठे...? आहे कविता सांगाती...
भोवती खुळ्या शब्दांची दंगल...कोठे जाऊ ?
---- गझल व खास करून हे शेर अप्रतिम!
जयन्ता५२
चित्तरंजन भट
मंगळ, 28/08/2007 - 12:14
Permalink
सुरेख गझल
सुरेख गझल. कोलाहल, दंगल अतिशय आवडले. जयंतरावांशी सहमत.
पुलस्ति
मंगळ, 28/08/2007 - 18:35
Permalink
वा!
दलदल आणि शेवटचे ३ शेर हे विशेष आवडले प्रदीपजी!
-- पुलस्ति.
अनिरुद्ध अभ्यंकर
मंगळ, 28/08/2007 - 22:30
Permalink
हेच
म्हणतो.
प्रदिप, अप्रतिम गझल... सगळेच शेर आवडले.
विश्वास
कुमार जावडेकर
गुरु, 30/08/2007 - 22:39
Permalink
सुंदर
प्रदीप,
सुंदर गझल.. काफिये आणि रदीफ दोन्ही अतिशय वेगळे असूनही गझल अगदी सहज जुळून आली आहे.
आवरू कसा मी हा वडवानल...कोठे जाऊ ?
हा मिसरा, तसेच मक्ता, मौनाचा कोलाहल - सगळेच चपखल...
- कुमार
संतोष कुलकर्णी
शुक्र, 31/08/2007 - 15:51
Permalink
बहोत अच्छे !
बहोत बहोत बहोत अच्छे !
यासाठीच तर आपली गझल हवी असते.
मज नको नको झाला शब्दच्छल... कोठे जाऊ ?
अर्थ शोधतो मी माझा चपखल...कोठे जाऊ ?
टोकदार काटे येथे...धगधग ज्वाळा तेथे...
घेउनी फुले मी माझी कोमल...कोठे जाऊ ?
ऐकवे न एकांता, आकांत तुझा एकाकी...
सोसवे न मौनाचा कोलाहल...कोठे जाऊ ? ...शिवाय दंगल हे आवडले...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०