शे(अ)रो-शायरी, भाग-९ : टूटी है मेरी नींद मगर तुमको इससे क्या

===मित्रांनो,
परवीन शाकिर म्हणजे पुरुष-प्रधान संस्कृतीच्या विरोधात आपला आवाज नेहमीच बुलंद करणारी एक बंडखोर,आणि प्रखर स्त्री-मुक्तिवादी पाकिस्तानी कवियत्री! सगळी बंधने, मर्यादा, नीती-नियम फक्त स्त्रियांसाठीच का?- हा प्रश्न परवीन भोवतालच्या पुरुष-प्रधान समाजाला नेहमीच ठणकावून विचारायची. स्त्रियांवरील अन्यायाची परिसीमा गाठणाऱ्या पुरूष-प्रधान रुढी, आणि तितक्याच सडक्या व गळक्या परंपरा ह्यांचा परवीनने नेहमीच कडाडून विरोध केला. ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला; पाकिस्तानी समाजाच्या प्रखर टीकेचे ती लक्ष्य बनली, पण तरीही निडर परवीनने कधीही शरणागती पत्करली नाही.
ह्याच परवीनच्या एका वैशिष्ठ्यपूर्ण गझलेचा शे(अ)रो-शायरी ह्या लेख-मालेच्या ह्या ९व्या भागात आपण आस्वाद घेणार आहोत.
मित्रांनो, स्त्री-पुरुषातील नाते निभावत असताना, आपण ह्या नात्यातील अर्धा भाग आहोत हे बरेचदा सोयीस्करपणे विसरणाऱ्या 'टिपीकल' पुरुषी वृत्तीचे अनेक पैलू नित्य-नेमाने आपल्याला सर्वदूर नजरेस पडतात. जसे; मनाप्रमाणे झाले नाही तर स्त्रीचे उणे-दुणे काढणे, कठीण प्रसंगात सोयीस्कररीत्या पलायनवादी भूमिका घेणे,(अनेक कठीण प्रसंगात, जिथे मानसिक क्षमतेचा, लवचिकपणाचा कस लागतो, तिथे स्त्रीच शेवटी निभावून नेते, असे अनेकदा दिसते), नात्याची इमोशनल कमिटमेंट न पाळणे, एका प्रसंगी एक तर दुसऱ्या प्रसंगी त्याच्या अगदी विरुद्ध अश्या दांभिक पद्धतीने वागणे, जिथे पुरुषाने हिमंत दाखवावी अशी अपेक्षा असते अश्याच वेळी कच खाणे- (जसे-"तू मला आवडतेस, पण आई-बाबा नाही म्हणताहेत"), पोकळ बढाया मारणे, बरेचदा घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजणे! अश्याच संवेदनाहीन, बेफिकीर अश्या पुरूषी मनोवृत्तीला, परवीनने ह्या गझलेच्या प्रत्येक शेरातून, "तुमको इससे क्या" असे म्हणत चांगलेच सुनावले आहे, आणि हेच प्रस्तुत गझलेचे वैशिष्ठ्य आहे.गझल समजायला अगदी सोपी आहे;

टूटी है मेरी नींद मगर तुमको इससे क्या
बजते रहे हवाओ से दर तुमको इससे क्या

[ दर=दरवाजा ]

स्त्री आपल्या जोडीदाराची आतुरतेने वाट बघते आहे, रात्र सरते आहे, थकल्यामुळे कदाचित तिचा डोळा सुद्धा लागतो आहे, पण दार वाजल्याच्या आवाजाने ती वारंवार जागी होते आहे, बहुदा तोच आला आहे,ह्या भासाने ती जागी होतेय, पण दारावर कुणीच नाहीय, ते फक्त हवेने वाजते आहे! ज्याच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली आहे, त्याला मात्र तिच्या भावनांची मुळीच कदर नाहीय.इथे मला असाही अर्थ जाणवला की "टूटी है मेरी निंद" मधून परवीन असे म्हणते आहे की तू निघून गेल्यामुळे माझ्या जीवनात एक मानसिक अशांती निर्माण झालीय, तू येशील ह्या वेड्या आशेवर( ... म्हणून "बजते रहे हवाओसे दर" ) मी जगते आहे, पण तुला माझ्या ह्या भावावस्थेची अजिबात कल्पना नाहीय, आणि जरी कल्पना असली, तरी पर्वा नाहीय.

तुम मौज-मौज मिस्ले-सबा घूमते रहो
कट जाये मेरे सोच के पर, तुमको इससे क्या

[ १) मिस्ले-सबा=वाऱ्यासारखा ]

ह्या शेरात मला तीन भावार्थ लागलेत. पहिला म्हणजे स्त्री ,तिचा जोडीदर कुठे गेला असेल, कुठे वाट चुकला असेल ह्याचा विचार करुन करुन थकली आहे, पण हा मात्र वारा जसा लाटांवर स्वार होऊन हुंदडत असतो तसा अत्यंत बेफिकिरपणे कुठेतरी उंडरत फिरतो आहे. दुसरा म्हणजे पुरुषाच्या वाऱ्यासारख्या दिशा बदलणाऱ्या स्वभावाला उद्देशूनदेखील ती बोलते आहे.ह्याच्या विचारांची दिशा अशी नेहमी का बदलते, ह्याचे खरे रुप, खरा स्वभाव काय म्हणायचा, हा विचार करुन तिच्या डोक्याचा भुगा झाला आहे. तिसरा अर्थ हा की विचार-स्वातंत्र्य फक्त पुरुषालाच आहे, तिला नाहीय- म्हणून ती "कट जाये मेरी सोच के पर" असे म्हणतेय,पण "माझ्या विचार-शक्तीचे पंख जरी कापल्या गेले तरी..तुला काय त्याचे?"

औरों का हाथ थामो, उन्हे रास्ता दिखाओ
मै भूल जाऊँ अपना ही घर तुमको इससे क्या

ज्याच्याशी आपली भावनिक बांधिलकी आहे, त्याच्याप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याकडे डोळेझाक करून तिऱ्हाईत माणसासाठी झटणे,आणि हे कशासाठी तर तिथे आपली 'कॉलर टाइट' होते म्हणून, असाही "पुरुषी पैलू" असतो! ह्या लष्कराच्या भाकरी भाजण्याच्या टिपीकल पुरुषी स्वभाव-वैशिष्ठ्याबद्दल परवीन टिप्पणी करतेय.( "गैरो पे करम, अपनो पे सितम, ए जान-ए-वफा ये जुल्म न कर" ह्या ओळी आठवून गेल्यात, एका हिंदी सिनेगीतातील). खरे तर "तुमको इससे क्या" हे समाजात जिथे-जिथे gender bias मुळे असलेला indifferent attitude आहे, तिथे सगळीकडे लागू पडते.

अब्रे-गुरेज़-पा को बरसने से क्या ग़रज़
सीपी मे बन न पाये गुहर, तुमको इससे क्या

[ १)अब्र=ढग, २)सीपी=शिंपला, ३)गुरेज़-पा=पलायनवादी, ४)ग़रज़= उद्देश, प्रयोजन ५) गुहर=मोती ]

पुरुषाच्या पलायनवादी वृत्तीवर हा शेर आहे. असे समजले जाते की स्वाती नक्षत्राच्या पावसाच्या थेंबाने शिंपल्यात मोती तयार होतात. तशीच प्रतिमा इथे वापरली आहे. परवीन इथे पुरुषाला फक्त गरजणारा पण बरसायची वेळ येताच पळून जाणारा ढग म्हणतेय. ती म्हणते की, ज्या ढगाला नुसते मोठ्याने गडगडाट करणेच येते, त्याचे प्रत्यक्ष बरसण्याशी काय घेणे-देणे? शिंपला, जो बिचारा गडगडाट ऐकून पावसाच्या थेंबाची आस लावून बसलेला आहे, त्याच्यात मोती बनला काय किंवा नाही बनला काय, (अश्या) ढगाला त्याचे काय सोयर-सुतक? नुसत्या मोठ्या-मोठ्या गप्पा मारणे, बडेजाव मिरवणे, पण स्वत:ला सिद्ध करण्याची वेळ आली की आपल्या कर्तृत्वाचा 'योग्य' तो अंदाज येताच पळ काढणे, आपल्या वल्गनांवर भाबडा विश्वास ठेवून आपल्याकडे आशेने बघणाऱ्या व्यक्तिला नंतर काय वाटत असेल,ह्याचा नंतर यत्किंचितही विचार न करणाऱ्या पुरुषी वृत्तीवर परवीनने चांगलाच ताशेरा ओढलाय.

ले जाएँ मुझको माले-ग़नीमत के साथ उदू
तुमने तो डाल दी है सीपर, तुमको इससे क्या

[ १)माल-ए-ग़नीमत=लुटीचा माल, २) उदू=शत्रू ३) सीपर=ढाल ]

पुरुषाच्या कचखाऊ मनोवृत्तीवर हा शेर आहे. परवीन म्हणते की शत्रू मला बहुदा लुटीच्या मालासहित घेऊन जाईल! आणि ते साहजिकच आहे, कारण तू, ज्याने माझ्यासाठी लढायला हवे, त्याने तर आता ढाल टाकून हारच पत्करली आहे! त्यामुळे मला कोणी पळवून नेले , तरी तुला त्याचे काय? कथा-सिनेमातून नेहमी दिसणारा, आणि बरेचदा वास्तवात सुद्धा घडणारा प्रसंगच घ्या ना! "मै मजबूर हूँ, तुमसे शादी नही कर सकता" असे शेवटी हतबलपणे म्हणणारा नायक, आणि त्याच्या हतबलतेवर आणि कचखाऊपणावर फक्त चडफडण्यापलिकडे काहीच न करु शकणारी, आणि नाइलाजाने शेवटी दुसऱ्याचा हात धरुन निघून जाणारी नायिका, ह्या परिस्थितीला अगदी तंतोतंत लागू पडणारा हा शेर आहे!

तुमने तो थकके दश्त में ख़ीमे लगा दिये
तन्हा कटे किसी का सफर तुमको इससे क्या

[ १)दश्त=जंगल, २) ख़ीमे=खेमे= खेमाचे अनेकवचन,खेमा=तंबू, पडाव ]

इथे परत पुरुषाच्या indifferent attitude बद्दल परवीन बोलतेय. ध्येय-पूर्तीच्या म्हणा किंवा जीवनाच्या प्रवासात म्हणा, जिद्दीने मार्ग-क्रमण करायचे असताना, वाटेवरच अंगातील सगळे बळच हरवल्यासारखे खाली बसून जायचे, आपल्या जोडीदाराची आपण शेवटपर्यंत साथ निभवायला हवी, आपल्याशिवाय आपला सहचर एकटाच प्रवास कसा करु शकेल ह्या जाणिवेचा पुरुषाच्या मनाला अश्या वेळी स्पर्शही होत नाही! "तुमको इससे क्या" ही खरे तर साऱ्या जगातील स्त्रियांची चिरंतन व्यथा आहे, हे मात्र नक्की!
आता आपला निरोप घेतो, पुढील भागात भेटूच!
-मानस६
(टीप- काही अडचणींमुळे लेखनाला हवा तसा अवधी मिळत नाही, त्यामुळे लेख पोस्ट करायला वेळ लागतो, क्षमस्व! पुढचा लेख १५ एप्रिलला पोस्ट करायचा मानस आहे.)

प्रतिसाद

आणखी एक अप्रतिम लेख.
नुसती गझल वाचून बरेच डोक्याव रुन गेले होते.... तुमच्या विवेचनानंतर गझल समजली.

तुम मौज-मौज मिस्ले-सबा घूमते रहो
कट जाये मेरे सोच के पर, तुमको इससे क्या

ह्या शेराचा तुम्ही सांगीतलेला पहिला अर्थच छान आहे. बहुधा तोच अभिप्रेत असावा.

१५ एप्रिलच्या प्रतीक्षेत.

धन्यवाद कैलास, तुमच्या प्रतिसादाबद्दल! पहिला अर्थच अभिप्रेत असावा खरेय, पण शब्दांच्या पलिकडे काही दिसते का ते बघायचा प्रयत्न करतोय
-मानस६

संग्राह्य लेख.
धन्यवाद.

धन्यवाद अनिल, ..खरे तर, ह्या गझलेतील परवीनचा, " मी अडोसे घेत नाही... रोख माझा थेट आहे" हा attitude आवडला, म्हणून सगळ्यांशी शेअर केलीय!

खुप सुंदर रित्या विश्लेषण केले आहे गझलेचे.

- मनस्विनी

क्या बात है.. सुंदर गजलेचा तितकाच सुंदर अर्थ !!

क्या बात है.. सुंदर गजलेचा तितकाच सुंदर अर्थ !!

खूपच सुन्दर लेख लिहिला आहे... मनापासून धन्यवाद!!!

मानसजी खरंच खुप अप्रतिम लेख.

ऐक शंका

तुम्ही हे उर्दू शब्दांचे अर्थ कसे शोधता.

कृपया सांगावे मला पण समजून घ्यायच्या आहेत उर्दू गझला पण शब्दांची अडचण आहे.