कधीकाळी तुझ्यासाठी
मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतु झंकारले होते
अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते
नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते
कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!
अहो जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष सांगा ना!
असे बोलून पाठीवर कुणाचे हो भले होते?
तशी ती भेट शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी कवटाळले होते
किती वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?)
नको दुस्वास दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते सुखाने झोपले होते
कधीकाळी तुझ्यासाठी दिला मी जीवही असता
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
- नचिकेत जोशी
प्रतिसाद
क्रान्ति
गुरु, 20/01/2011 - 11:28
Permalink
केवळ अप्रतिम! कळीचे फूल,
केवळ अप्रतिम! कळीचे फूल, धुके, गूज, दुस्वास एकापेक्षा एक बहारदार!
अफाट आहे गझल!
केदार पाटणकर
गुरु, 20/01/2011 - 13:05
Permalink
आनंदयात्री, क्रांतीशी
आनंदयात्री,
क्रांतीशी सहमत.
वा !
ज्ञानेश.
गुरु, 20/01/2011 - 16:07
Permalink
क्रांतीजी आणि केदार यांच्याशी
क्रांतीजी आणि केदार यांच्याशी सहमत आहे !
सगळेश शेर नेटके आहेत. गझल आवडली.
पुलेशु.
आनंदयात्री
शनि, 22/01/2011 - 17:36
Permalink
क्रांतिजी, केदार आणि
क्रांतिजी, केदार आणि ज्ञानेशराव - आभार! :)
सोनाली जोशी
शनि, 22/01/2011 - 20:44
Permalink
कळीचे फूल होताना तिथे मी
कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!
तुझ्यासाठी दिला असता कदाचित जीवही मी अन्-
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
हे दोन्ही फार सुरेख
आनंदयात्री
बुध, 26/01/2011 - 15:27
Permalink
धन्यवाद सोनालीजी..
धन्यवाद सोनालीजी..
शाम
गुरु, 27/01/2011 - 20:44
Permalink
खूप खूप छान!!!! मनाच्या खोल
खूप खूप छान!!!!
मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने (ऋतु झंकारले) होते... (ऋतुही भाळले होते)...कसे वाटते?..
झंकारण्याचा अर्थ वेगळा होतो..हो , ना?
आनंदयात्री
रवि, 30/01/2011 - 10:13
Permalink
शामजी, हम्म्म... मीही त्या
शामजी, हम्म्म... मीही त्या झंकारणेवर विचार करतो आहे... लिहिताना लिहून गेलो, आणि आता अर्थाला पाय फुटू लागले आहेत...
ऋतूही भाळले होते... विचार करतो यावर...
धन्यवाद! :)
कमलाकर देसले
बुध, 02/02/2011 - 23:09
Permalink
कितीही वाटल्याने का कुणीही
कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते ? आनंदजी ,एकदम सही. आख्खी गझल अप्रतिम.
वैभव देशमुख
गुरु, 03/02/2011 - 16:43
Permalink
सगळ्यांशी सहमत....
सगळ्यांशी सहमत....
चित्तरंजन भट
बुध, 09/02/2011 - 10:03
Permalink
कळीचे फूल होताना तिथे मी
कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!
किती वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?)
कधीकाळी तुझ्यासाठी दिला मी जीवही असता
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वाव्वा. वरील शेष विशेष आवडले. गझल एकंदर चांगली झाली आहे.