अदृश्यच असतो क्रूस कधी
अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी
काही जखमा भरतात कुठे
खातात मुळासह ऊस कधी
मी तळमळतो, मी हरमळतो
ही कूस कधी, ती कूस कधी
आहेसच की माझ्यातच तू
अजिबात नको भेटूस कधी
फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी
इच्छा इतक्या सवती सगळ्या
संपेल बरे धुसफूस कधी
कोठून अचानक मन उडते
कारण घडते फडतूस कधी
रेखीव तरी आहेस किती
मोडून पहा ना मूस कधी
सोडू अवघे लालित्य जरा
घालू बरवा धुडगूस कधी
भेगाळत जाते शेत कुठे
फिरतो वणवण पाऊस कधी
तो दिवस दिवसभर वणवणतो
होईल दिवस तांबूस कधी
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
मंगळ, 21/12/2010 - 13:14
Permalink
गझल आवडली. लयही मस्तच आहे.
गझल आवडली. लयही मस्तच आहे. बहरूस, फडतूस आणि धुडगूस हे शेर अधिक आवडले. काही शेर नीटसे लक्षात आले नाहीत.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
कैलास
बुध, 22/12/2010 - 09:48
Permalink
वा वा .... छान गझल... सगळेच
वा वा .... छान गझल... सगळेच शेर उत्तम
ऊसाचा शेर बाउन्सर..... :(
चित्तरंजन भट
बुध, 22/12/2010 - 11:39
Permalink
धन्यवाद. काही शेर नीटसे
धन्यवाद.
:) काही हरकत नाही. प्रश्नचिन्हांसकट किंवा उद्गारवाचकचिन्हांसकट वाचून पहा.
बेफिकीर
बुध, 22/12/2010 - 14:30
Permalink
मला 'मूस' हा शब्द माहीत
मला 'मूस' हा शब्द माहीत नसल्याने तो शेर लक्षात आला नाही आणि जखमांचा शेर खरच समजला नाही. वाचून पाहतो एकदा पुन्हा!
क्रान्ति
बुध, 22/12/2010 - 21:55
Permalink
जबरदस्त! सगळेच शेर एकापेक्षा
जबरदस्त! सगळेच शेर एकापेक्षा एक, त्यातल्या त्यात भेटूस, मूस, धुसफूस आणि पाऊस खूप खूप आवडले.
कैलास
बुध, 22/12/2010 - 22:00
Permalink
भूषणजी,मूस म्हणजे
भूषणजी,मूस म्हणजे ''साचा''.....
चित्तजी.... ,
काही जखमा भरतात कुठे?
खातात मुळासह, ऊस कधी?
मी असाही वाचून पाहिला.. पण तरीही कळला नाही..... :(
वैभव देशमुख
शनि, 25/12/2010 - 13:57
Permalink
कोठून अचानक मन उडते कारण घडते
कोठून अचानक मन उडते
कारण घडते फडतूस कधी
गझल आवडली
मानस६
शनि, 25/12/2010 - 16:35
Permalink
अदृश्यच असतो क्रूस
अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी..
आशय तर मस्तच आहे शेराचा..देवदूत नसलेले अनेक जण अनेकदा क्रूसावर जातात हे अगदी खरेय....
(गागाललगागा गाललगा..असे वृत्त दिसतेय.. पण मग दुसऱ्या ओळीत यतीभंग म्हणा अथवा लय खंडल्यासारखी असे झालेय..मी येशू शब्द टाकून बघितला प्रेषिताच्या जागी)
काही जखमा भरतात कुठे
खातात मुळासह ऊस कधी..
वा वा.. मला तरी असा अर्थ लागला की जखमांना मी इतका गोड लागलो, आवडलो की त्या मलाच मुळासह खाताहेत, (अरे पण म्हणून काय झाले, असा टोन असावा)
मी तळमळतो, मी हरमळतो
ही कूस कधी, ती कूस कधी
वा.. हरमळलोचा अर्थ लहानपणी मुका मार बसणे अश्या अर्थाने ऐकल्याचे स्मरते, शब्द-कोशात नाही दिसला.
फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी.. बढिया.. let creativity take its own course and time.. अगदी खरेय
इच्छा इतक्या सवती सगळ्या
संपेल बरे धुसफूस कधी..
वा वा तुफान शेर आहे.. गालीबचा ’हजारो ख्वाईशे ऐसी’ स्मरले.. आणि हे सदा न कदा चालू असते
कोठून अचानक मन उडते
कारण घडते फडतूस कधी... (कधी कधी वाटते..every relationship comes with an expiry date)
रेखीव तरी आहेस किती
मोडून पहा ना मूस कधी..
हा शेर तर इतका आवडला की फेसबुकावर टाकलाय.. रेखीवपणाची कल्पना यायला मूस मोडून बघणे, किंबहुना तोच एक पर्याय आहे..वा वा.. ही कल्पनाच भन्नाट आहे...बहोत बढिया
सोडू अवघे लालित्य जरा
घालू बरवा धुडगूस कधी...
असे अधून-मधून वागायलाच हवे.. नको ते परीट-घडीचे कपडे
तुझा-
ना छचोर हळव्या शब्दांसाठी अदलो
पाहिला चंद्र भर चांदण्यात ओरडलो.. हा शेर स्मरला
भेगाळत जाते शेत कुठे
फिरतो वणवण पाऊस कधी
अररररर... हा शेर इतका आत-आत गेला.. खूप.. भेगाळत जाणाऱ्या जमिनीपेक्षा, त्याला शोधणाऱ्या पावसाची वेदनाच जास्त चटका लावून जाते ..बहुदा असेच होते..ह्या देशात, ..आयुष्यात, ...मनात..(इथे जमीन शब्द होता ना?)
तो दिवस दिवसभर वणवणतो
होईल दिवस तांबूस कधी...सुंदर
एक क्लासिक गझल
-मानस६
धोंडोपंत
रवि, 26/12/2010 - 10:22
Permalink
क्या बात है! अप्रतिम
क्या बात है! अप्रतिम गझल!
सर्व शेर आवडले. एखाद्याचा उल्लेख म्हणजे इतरांवर अन्याय.
आस्वाद आणि समीक्षा ही तर दोन विरुद्ध टोके. आम्ही आस्वाद घेतो, समीक्षा हे तज्ज्ञांचे काम.
म्हणून त्यापासून दूर राहतो.
खूप चांगली सकस गझल वाचायला मिळाल्याचा आनंद झाला.
आपला,
(रममाण) धोंडोपंत
आनंदयात्री
बुध, 29/12/2010 - 18:16
Permalink
वाह!! पाऊस आणि धुसफूस सर्वात
वाह!! पाऊस आणि धुसफूस सर्वात आवडले... :)
विसुनाना
बुध, 29/12/2010 - 18:26
Permalink
गझल आवडली हे वे. सां. न.
गझल आवडली हे वे. सां. न. ल.
उल्लेख न केलेले सर्व शेर आवडलेले आहेत.
अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी
-वेगवेगळे अर्थ लागत आहेत.
काही जखमा भरतात कुठे
खातात मुळासह ऊस कधी
-मला हा शेर कळला नाही.
आहेसच की माझ्यातच तू
अजिबात नको भेटूस कधी
-सर्वात जास्त आवडला.
सोडू अवघे लालित्य जरा
घालू बरवा धुडगूस कधी
-'बरवा' कशाला? (त्या शब्दाची छटा, 'दंगा' का नको? इ.)
मधुघट
बुध, 29/12/2010 - 19:28
Permalink
सुंदर गझल चित्तजी.....जाम
सुंदर गझल चित्तजी.....जाम आवडली!
अनिल रत्नाकर
बुध, 29/12/2010 - 23:34
Permalink
अप्रतिम गझल
अप्रतिम गझल
बहर
शुक्र, 31/12/2010 - 08:13
Permalink
अप्रतीम गझल चित्तरंजन... सगळे
अप्रतीम गझल चित्तरंजन... सगळे शेर सुंदर आहेत... मला विशेष आवडलेला 'फडतूस' हा. अतिशय सहज आला आहे.. वा...बाकी शेरही उत्तमच.
ज्ञानेश.
शुक्र, 31/12/2010 - 09:37
Permalink
मी धोंडोपंतांशी सहमत आहे-
मी धोंडोपंतांशी सहमत आहे- अतिशय आनंददायी गझल.
मला (चढत्या क्रमाने) आवडलेले शेर -
"फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी
कोठून अचानक मन उडते
कारण घडते फडतूस कधी
आहेसच की माझ्यातच तू
अजिबात नको भेटूस कधी
रेखीव तरी आहेस किती
मोडून पहा ना मूस कधी
भेगाळत जाते शेत कुठे
फिरतो वणवण पाऊस कधी
तो दिवस दिवसभर वणवणतो
होईल दिवस तांबूस कधी"
कमलाकर देसले
शनि, 15/01/2011 - 22:24
Permalink
आहेसच की माझ्यातच तू अजिबात
आहेसच की माझ्यातच तू
अजिबात नको भेटूस कधी
फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी
चित्तरंजनजी ,संपूर्ण गझल अप्रतिम आहे .हे दोन शेर खूप आवडले .अगदी मनातले .मनासारखे
कैलास गांधी
बुध, 26/01/2011 - 11:58
Permalink
जबरदस्त!
जबरदस्त!
शाम
गुरु, 27/01/2011 - 20:46
Permalink
इतरांहुन वेगळ काय लिहू....लई
इतरांहुन वेगळ काय लिहू....लई भारी!!!!
अमोल क्षिरसागर
बुध, 02/11/2011 - 17:04
Permalink
आहेसच की माझ्यातच तू अजिबात
आहेसच की माझ्यातच तू
अजिबात नको भेटूस कधी ---- सुंदर
फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी ----- सुंदर
तो दिवस दिवसभर वणवणतो
होईल दिवस तांबूस कधी --या ओळी वाचल्यानंतर ,डोळ्यासमोर सूर्यास्त उभा राहिला.