...दिवेलागणीच्या वेळी !

...दिवेलागणीच्या वेळी !

नको तेच ते का स्मरते...दिवेलागणीच्या वेळी !
तुझ्या आठवांना भरते...दिवेलागणीच्या वेळी !

जणू होत आहे चकवा...फिरे काळ एका जागी...
पुढे वेळ कोठे सरते...दिवेलागणीच्या वेळी ?

- पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !

मला एकट्याला बघुनी म्हणे चांदणी एकाकी...
तुझा हात मीही धरते...दिवेलागणीच्या वेळी ! !

तुला आठवे का पहिली तिची भेट एकाएकी...?
मनी काय हे मोहरते...दिवेलागणीच्या वेळी ?

कुणी येत नाही...मन हे तरीही प्रतीक्षा वेडी -
- कशाला कुणाची करते...दिवेलागणीच्या वेळी ?

सुचेनाच काही अगदी...सुचेनाच काही काही...
कशाचे न काही ठरते...दिवेलागणीच्या वेळी !

क्षणी या रिकाम्या, परक्या कुठे मी मनाला नेऊ ?
उदासी  घरी वावरते...दिवेलागणीच्या वेळी !

कुणी दूर का आळवते तिथे मारव्याच्या ताना...?
इथे दुःख माझे झरते...दिवेलागणीच्या वेळी !

अशी आर्तता, कातरता कळावी कुणाला माझी ?
...मुकी वेदना हंबरते...दिवेलागणीच्या वेळी !

हसू आण ओठांवरती, जरी पापण्या या ओल्या...
तुझे तूच घे आवरते...दिवेलागणीच्या वेळी !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

अतिश्शय सुंदर... लाजवाब!!!!! 

फारच सुंदर गझल!! अगदी वेगळ्या विश्वात घेवून जाणारी...दिवेलागणीच्या वेळी!!! सुरुवातीला थोडी  लय शोधायला लावते. पण नंतर मात्र मनात उतरत जाते ती जादू करत, अंतर्नुख करतच!! खरं सांगू मला अशा गझला फार आवडतात... आणि गझलांचे 'असे' आवडणेही....
 पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !

तुला आठवे का पहिली तिची भेट एकाएकी...?
मनी काय हे मोहरते...दिवेलागणीच्या वेळी ?

सुचेनाच काही अगदी...सुचेनाच काही काही...
कशाचे न काही ठरते...दिवेलागणीच्या वेळी !
क्षणी या रिकाम्या, परक्या कुठे मी मनाला नेऊ ?
उदासी  घरी वावरते...दिवेलागणीच्या वेळी !
अशी आर्तता, कातरता कळावी कुणाला माझी ?
...मुकी वेदना हंबरते...दिवेलागणीच्या वेळी !
हसू आण ओठांवरती, जरी पापण्या या ओल्या...
तुझे तूच घे आवरते...दिवेलागणीच्या वेळी !
- हे शेर फार आवडले !!! सुरेख !!!!
- संतोष

प्रदीप,
सुंदर गझल.. प्रत्येक शेर वाचताना आधीच्या शेरापेक्षाही अधिक आवडत गेला.
जणू होत आहे चकवा...फिरे काळ एका जागी...
पुढे वेळ कोठे सरते...दिवेलागणीच्या वेळी ?
- पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी ! -- सुंदर
हसू आण ओठांवरती, जरी पापण्या या ओल्या...
तुझे तूच घे आवरते...दिवेलागणीच्या वेळी ! - वा!
- कुमार

नेहमीप्रमाणेच सुंदर गझल.

सुचेनाच काही अगदी...सुचेनाच काही काही...
कशाचे न काही ठरते...दिवेलागणीच्या वेळी !
वाव्वा!

मला एकट्याला बघुनी म्हणे चांदणी एकाकी...
तुझा हात मीही धरते...दिवेलागणीच्या वेळी ! !
वाव्वा!!

- पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !
वाव्वा!

हे शेर फारफार आवडले.

गजल आवडली.
कुणी येत नाही...मन हे तरीही प्रतीक्षा वेडी -
- कशाला कुणाची करते...दिवेलागणीच्या वेळी ?
हसू आण ओठांवरती, जरी पापण्या या ओल्या...
तुझे तूच घे आवरते...दिवेलागणीच्या वेळी !
हे दोन शेर फार आवडले.
अजब

वा प्रदीपराव,
अतिशय सुंदर ग़ज़ल. क्या बात है. रदीफ़ फारच छान आहे. वेगळा आहे. आणि प्रत्येक शेर त्याच्या चौकटीतून सहजपणे, कुठेही न अडखळता निभावला आहे. सुंदर.
आपला,
(रत्नपारखी) धोंडोपंत
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

 पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !

वा! प्रदीप! कायम लक्षात रहील असा शेर!उत्तम गझल!
जयन्ता५२

आणखी एक सुंदर गझल! पोर आणि शेवटचे २ शेर विशेष आवडले..
कुणी येत नाही...मन हे तरीही प्रतीक्षा वेडी -
- कशाला कुणाची करते...दिवेलागणीच्या वेळी ?
तुमच्या इतर सर्व सहज ओघवत्या शेरांच्या तुलनेत या वरील शेरात शब्दरचना थोडी अडखळणारी झाली आहे असे वाटले.. चु.भू.दे.घे.
-- पुलस्ति.

भकास वर्णन एकदम झकास...!!