बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'

गाठायचे असते स्वतःला..... गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर... थांबले की जाहले

तू ये, नको येऊस तू..... मी आपला असतो इथे
कोणीतरी ठरल्याप्रमाणे वागले की जाहले

सध्या कशी आहेस तू ही काळजी नाही मला
तेव्हा कशी होतीस तू हे चाळले की जाहले

दारूत पाणी घालण्याची सोय नाही राहिली
पाणी हवे होते जरासे... वाटले की जाहले

मृद्गंध आला, नाहिली असणार बहुधा आज ती
डोके गरम... ओले जरासे जाहले... की जाहले

नाकी नऊ येतात तेव्हा वाटते की..... जाउदे
तालाप्रमाणे या जगाच्या नाचले की जाहले

बांधून झाला पूल! का जाईचना वरुनी कुणी?
खालून जाणे बंद करणे साधले.... की जाहले

कोणाप्रमाणे व्हायची इच्छा कशाला पाहिजे?
'माझ्याप्रमाणे मीच आहे' वाटले की जाहले

तू नेसली नाहीस ती साडी गुलाबी... त्यापुढे
तू ते बरे केलेस हे मी गिरवले की जाहले

बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'
जितके दिवस असतात तितके काढले की जाहले

गझल: 

प्रतिसाद

परत एक '' बेफिकिर '' स्टाईल मस्त गझल.
नाविन्यपूर्ण रदीफ....

दारूत पाणी घालण्याची सोय नाही राहिली
पाणी हवे होते जरासे... वाटले की जाहले

बांधून झाला पूल! का जाईचना वरुनी कुणी?
खालून जाणे बंद करणे साधले.... की जाहले

बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'
जितके दिवस असतात तितके काढले की जाहले

हे शेर अतिशय आवडले.......

डॉ.कैलास

आवडलेले शेर :

गाठायचे असते स्वतःला..... गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर... थांबले की जाहले

सध्या कशी आहेस तू ही काळजी नाही मला
तेव्हा कशी होतीस तू हे चाळले की जाहले

दारूत पाणी घालण्याची सोय नाही राहिली
पाणी हवे होते जरासे... वाटले की जाहले

अप्रतिम गझल!!!

सध्या कशी आहेस तू ही काळजी नाही मला
तेव्हा कशी होतीस तू हे चाळले की जाहले..

छान वाटला हा शेर.

अनेक शेरांमधे "..केले की झाले" ऐवजी "पुरेसे" सारखा एखादा शब्द रदीफात शोभला असता, असे मला वाटते.

उदा.
'कोणाप्रमाणे व्हायची इच्छा कशाला?
"माझ्याप्रमाणे मीच!" हे आहे पुरेसे ..
असे काहीतरी.

('पूल' शेर समजला नाही. नक्की काय म्हणायचे आहे?)

गाठायचे असते स्वतःला..... गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर... थांबले की जाहले

व्वा !

सर्वांचे आभार!

पर्यायी रस्ता असेल तर लोक कष्ट घेणार नाहीत असे म्हणायचे होते. फुरसुंगीचा रेल्वेलाईनवरील पूल डोक्यात होता, नदीवरील नाही. :)

धन्यवाद!

गझल छान झाली आहे. सध्या कशी, माझ्याप्रमाणे मीच आणि मक्ता विशेष आवडला.

नाकी नऊ...
शेर चांगला झाला आहे.

कोणीतरी ठरल्याप्रमाणे वागले की जाहले
तुमच्या स्टाईलला शोभेलशी ओळ.

एकंदर छान गझल.

(बाकी पूर्वी जाहले आणि झाले बद्दल चर्चा झाल्याच आहेत.)

बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'
जितके दिवस असतात तितके काढले की जाहले

जास्त आवडला!!

बेफिकीर... सगळेच शेर भयंकर आवडले!!! वा... अप्रतीमच! मक्ता तर जामच आवडला! खूब!

मस्तच.