बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'
गाठायचे असते स्वतःला..... गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर... थांबले की जाहले
तू ये, नको येऊस तू..... मी आपला असतो इथे
कोणीतरी ठरल्याप्रमाणे वागले की जाहले
सध्या कशी आहेस तू ही काळजी नाही मला
तेव्हा कशी होतीस तू हे चाळले की जाहले
दारूत पाणी घालण्याची सोय नाही राहिली
पाणी हवे होते जरासे... वाटले की जाहले
मृद्गंध आला, नाहिली असणार बहुधा आज ती
डोके गरम... ओले जरासे जाहले... की जाहले
नाकी नऊ येतात तेव्हा वाटते की..... जाउदे
तालाप्रमाणे या जगाच्या नाचले की जाहले
बांधून झाला पूल! का जाईचना वरुनी कुणी?
खालून जाणे बंद करणे साधले.... की जाहले
कोणाप्रमाणे व्हायची इच्छा कशाला पाहिजे?
'माझ्याप्रमाणे मीच आहे' वाटले की जाहले
तू नेसली नाहीस ती साडी गुलाबी... त्यापुढे
तू ते बरे केलेस हे मी गिरवले की जाहले
बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'
जितके दिवस असतात तितके काढले की जाहले
प्रतिसाद
कैलास
मंगळ, 01/06/2010 - 09:54
Permalink
परत एक '' बेफिकिर '' स्टाईल
परत एक '' बेफिकिर '' स्टाईल मस्त गझल.
नाविन्यपूर्ण रदीफ....
दारूत पाणी घालण्याची सोय नाही राहिली
पाणी हवे होते जरासे... वाटले की जाहले
बांधून झाला पूल! का जाईचना वरुनी कुणी?
खालून जाणे बंद करणे साधले.... की जाहले
बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'
जितके दिवस असतात तितके काढले की जाहले
हे शेर अतिशय आवडले.......
डॉ.कैलास
ह बा
मंगळ, 01/06/2010 - 10:06
Permalink
आवडलेले शेर : गाठायचे असते
आवडलेले शेर :
गाठायचे असते स्वतःला..... गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर... थांबले की जाहले
सध्या कशी आहेस तू ही काळजी नाही मला
तेव्हा कशी होतीस तू हे चाळले की जाहले
दारूत पाणी घालण्याची सोय नाही राहिली
पाणी हवे होते जरासे... वाटले की जाहले
अप्रतिम गझल!!!
ज्ञानेश.
मंगळ, 01/06/2010 - 13:13
Permalink
सध्या कशी आहेस तू ही काळजी
सध्या कशी आहेस तू ही काळजी नाही मला
तेव्हा कशी होतीस तू हे चाळले की जाहले..
छान वाटला हा शेर.
अनेक शेरांमधे "..केले की झाले" ऐवजी "पुरेसे" सारखा एखादा शब्द रदीफात शोभला असता, असे मला वाटते.
उदा.
'कोणाप्रमाणे व्हायची इच्छा कशाला?
"माझ्याप्रमाणे मीच!" हे आहे पुरेसे .. असे काहीतरी.
('पूल' शेर समजला नाही. नक्की काय म्हणायचे आहे?)
अनंत ढवळे
मंगळ, 01/06/2010 - 23:44
Permalink
गाठायचे असते स्वतःला.....
गाठायचे असते स्वतःला..... गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर... थांबले की जाहले
व्वा !
बेफिकीर
गुरु, 03/06/2010 - 09:27
Permalink
सर्वांचे आभार! पर्यायी रस्ता
सर्वांचे आभार!
पर्यायी रस्ता असेल तर लोक कष्ट घेणार नाहीत असे म्हणायचे होते. फुरसुंगीचा रेल्वेलाईनवरील पूल डोक्यात होता, नदीवरील नाही. :)
धन्यवाद!
चित्तरंजन भट
गुरु, 03/06/2010 - 10:01
Permalink
गझल छान झाली आहे. सध्या कशी,
गझल छान झाली आहे. सध्या कशी, माझ्याप्रमाणे मीच आणि मक्ता विशेष आवडला.
केदार पाटणकर
गुरु, 03/06/2010 - 13:18
Permalink
नाकी नऊ... शेर चांगला झाला
नाकी नऊ...
शेर चांगला झाला आहे.
अजय अनंत जोशी
शुक्र, 04/06/2010 - 12:16
Permalink
कोणीतरी ठरल्याप्रमाणे वागले
कोणीतरी ठरल्याप्रमाणे वागले की जाहले
तुमच्या स्टाईलला शोभेलशी ओळ.
एकंदर छान गझल.
(बाकी पूर्वी जाहले आणि झाले बद्दल चर्चा झाल्याच आहेत.)
कैलास गांधी
गुरु, 22/07/2010 - 12:45
Permalink
बाकी तसा कैदेत काही त्रास
बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'
जितके दिवस असतात तितके काढले की जाहले
जास्त आवडला!!
बहर
गुरु, 22/07/2010 - 19:10
Permalink
बेफिकीर... सगळेच शेर भयंकर
बेफिकीर... सगळेच शेर भयंकर आवडले!!! वा... अप्रतीमच! मक्ता तर जामच आवडला! खूब!
अनिल रत्नाकर
शुक्र, 23/07/2010 - 01:40
Permalink
मस्तच.
मस्तच.