कधी वाटते मी भिडावे जगाशी

कधी वाटते मी भिडावे जगाशी

कधी वाटते मी भिडावे जगाशी, '' कशाला फुकाचेच ''? वाटे कधी
कधी मी निवडतो सरळसोट रस्ता,उगा फोडतो कैक फाटे कधी

कसेही जरी फेकले तेच नाणे,कधी छाप्,काटा कधी लाभतो
कशाला बसावे हिशेबास की,फायदे केवढे आणि घाटे कधी

कसे वाटते आज पाहूनि त्यांना,जिथे श्वान सामीष लाथाडतो
उभा जन्म ज्यांचा उपासात गेला,मिळावीत सुग्रास ताटे कधी

अभीयान जे गाडगे 'बा'च नामी,बरे जाहले लाभले अन्यथा,
जया वाम हस्तांस लागे न पाणी,तया हात घेई खराटे कधी?

जरी आज '' कैलास'' सुमनांत लोळे,तरी त्यास सुमनांत ही भाजते
जया तीक्ष्ण भालाही कापूस वाटे,तयाला रुतावेत काटे कधी?

डॉ.कैलास गायकवाड.

गझल: 

प्रतिसाद

सर्वप्रथम हे वृत्त वापरल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद!

मतला छान आहे...दुसरा आणि चौथा शेर आशय आणि रचनेच्या दृष्टीने जरा कमकुवत वाटला.
कसे वाटते आज पाहूनि त्यांना,जिथे श्वान सामीष लाथाडतो चा अर्थबोध झाला नाही..

या गझलेला आपण अजून थोडा वेळ द्यायला हवा होता असे वाटले.

धन्यवाद ऋत्विक,
दुसर्‍या शेराचा मतितार्थ असा आहे......
नाणे वर फेकले की... छाप किंवा काटा ह्या दोनपैकी एक निश्चितपणे पडणारच आहे.........तद्वत धंदा सुरु केला की,नफा अथवा नुकसान होणारच आहे.......त्यासाठी हिशेबास.... बसावयाची आवश्यकता नाही.

कसे वाटते आज पाहूनि त्यांना जिथे श्वान सामीष लाथाडतो...... याचा अर्थ असा आहे.... की काही ठिकाणी इतकी सुबत्ता असते की तिथल्या श्वानासही मांसाहार मिळतो..आणि तोही इतका मग्रुर ..की त्यालाही तो लाथाडतो... आणि ते पाहून आयुष्यभर उपाशीपोटी रहाणार्‍या माणसांना काय वाटत असावे....?

..... मलाही थोडा कमी वेळ खर्च केला असे वाटते.....

डॉ.कैलास गायकवाड.

यावेळी वेगळे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
एखाद्या शेरावर रेंगाळून तो लिहावा वगैरे मते पूर्वीही मी ऐकली आहेत. मात्र, रेंगाळणारे इतके रेंगाळतात की वर्षानुवर्षे फक्त गझल पूर्ण होण्याची वाटच पहावी लागते. असो. तुमचा प्रयत्न चांगला आहे. लवकरच पुढील मुशायरा मी ठरवीत आहे. तयारीत रहा. शुभेच्छा.

अभीयान = हे जरा विचित्र वाटले. पाहूनि ऐवजी पाहून असेही चालले असते.

पाहूनि ऐवजी ''पाहून'' हे खरेच मझ्या डोक्यात अजिबातच आले नाही........

अभीयान.... हे विचित्र निश्चित आहे.....परंतु इस्लाह करताना डॉ.राम पंडीत म्हणाले.....लघुचा गुरु करणे क्षम्य आहे....परंतु गुरुचा लघु करु नका..... तद्वत ही सूट घेण्याची आगळिक केली आहे.
आपल्या मुशायर्‍याची मी वाट पहातोय.

धन्यवाद.

डॉ.कैलास गायकवाड.

छान गझल. आवडली.

धन्यवाद गंगाधरजी...

डॉ.कैलास

उत्साह आवडला व गाडगेबाबा, सामीष या विषयांचा उल्लेख गझलेत आणणे आवडले.

पाहूनि ऐवजी ''पाहून'' हे खरेच मझ्या डोक्यात अजिबातच आले नाही........

यात 'डोक्यात येण्याइतके' काहीही महत्वाचे नाही. रचनेत इतर अनेक त्रुटी आहेत, ज्या अधिक महत्वाच्या आहेत.

अभीयान.... हे विचित्र निश्चित आहे.....परंतु इस्लाह करताना डॉ.राम पंडीत म्हणाले.....लघुचा गुरु करणे क्षम्य आहे....परंतु गुरुचा लघु करु नका..... तद्वत ही सूट घेण्याची आगळिक केली आहे.

राम पंडीत रचनेच्या आशयाबद्दल काय म्हणाले ते माहीत व्हावे असे वाटते. आणि ते तसे म्हणाले म्हणून आपण शेवटच्या मिसर्‍यात 'तया तीक्ष्ण भालाही' मधील 'ही' दीर्घ घेतला आहेत काय? माझ्यामते तो र्‍हस्व असायला हवा हे तेही सांगतील.

-'बेफिकीर'!

मतला,गाडगेबाबा व मक्ता चांगला झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.....
आपण म्हणाल्याप्रमाणे......भालाहि मधील हि.. र्‍हस्वच आहे........ मुद्रा-राक्षसामुळे झालेला तो घोळ आहे.... ( अर्थात मुद्रित मीच केले आहे. )

प्रतिसादाबद्दल धन्यवाद..... ( आपला प्रतिसाद हेच वाढलेल्या उत्साहाचे कारण आहे. )

डॉ.कैलास

कैलास,
लघुचा गुरु करणे क्षम्य आहे....परंतु गुरुचा लघु करु नका..... = डॉ. राम पंडित
हं. हे वाचून लघु-गुरूची चर्चा करावी कि न करावी असे वाटले. असो.

तुमचा प्रयत्न चांगला आहे. गझलेत तृटी राहणारच. स्वतःला ग्रेट म्हणवणार्‍यांच्याही राहतात. प्रयत्नांती या तृटी कमीही होतात. धन्यवाद.

खरे तर पंडित सरांशी या विषयी सविस्तर बोलावे असे राहून राहून वाटत होते..... परंतु आधी वाचून काय ते जाणून घ्यावे अन नंतर बोलावे या विचाराअंती काही बोललो नाही. असो...

त्रूटी तर रहाणारच...... हे आपले म्हणणे दिलासादायक वाटले.... त्रुटी कमी करून चांगली गझल सादर करण्याचा पुन्हा यत्न करेन.
धन्यवाद.

डॉ.कैलास

अशातल्या बर्‍याच गझलांवरील प्रतिक्रियांची संख्या लक्षणीय आहे...गझला लक्षणीय झाल्यास बरे होईल असे वाटते..

लक्षणीय नसलेल्या गझलेवरील आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

डॉ.कैलास

गझल पंडिती काव्याची आठवण करून देणारी वाटली.
वेगळ्या वाटेची!
अभिनंदन!
गझलेत आता कहितरी नवं यायलाच हवं.त्याच त्या प्रकारच्या गझला फार झाल्यात.
बरं ज्याला दमदार गझल म्हटल्या जाते,त्याही सारावाने पाडल्यासारख्या असतात.
तुम्ही नक्किच गझलेला नवा साज देऊ शकता.

तुम्ही नक्किच गझलेला नवा साज देऊ शकता.

धन्यवाद मनीषा जी....

डॉ.कैलास

कधी वाटते मी भिडावे जगाशी, '' कशाला फुकाचेच ''? वाटे कधी
कधी मी निवडतो सरळसोट रस्ता,उगा फोडतो कैक फाटे कधी

सगळी गझल आवडली.

*अनंत ढवळे [08 मे 2010] नवीन
अशातल्या बर्‍याच गझलांवरील प्रतिक्रियांची संख्या लक्षणीय आहे...गझला लक्षणीय झाल्यास बरे होईल असे वाटते..*
या लक्षणीय प्रतिसादातले मत चांगले आहे पण हेतू अवलक्षणी वाटतो. माझ्यासारख्या नवख्या गझल लिहीणार्‍यास अशा प्रतिसादामुळे बावरल्यासारखे होते. हा प्रतिसाद वाचून तर पोटात ढवळ ल्यासारखं झालं. एक गंम्मत सांगु का? विनोद हं विनोद, रागवायच नाही.
प्रतिसादाचा हेतू आणि देणार्‍या सरांचे नाव याच्यात किती साम्य आहे! अनंत ढवळे!

वरील काही प्रतिसाद वाचून दु:ख होते.
प्रतिसाद फक्त गझलेबद्दल असावा,तो वैयक्तिक पातळीवर येऊ नये असे वाटते.
प्रत्तेकाने कटूता टाळावी.मोकळेपणाने लिहावे व चर्चाही मनमोकळी व्हावी.
आक्रमक न होताही काही गोष्टी सांगता येतात.

*वरील काही प्रतिसाद वाचून दु:ख होते.*

मनीषाजी,
कुणासही दुखावण्याचा हेतु नाही. माझ्या कडून तसे विनाकारण घडले असल्यास मी पुढे काळजी घेइन.

@ ह बा

मनीषाजी आपणांस नाही..... इतरांच्या प्रतिसादाबद्दल म्हणत आह्वेत.....
बाकी कुणाच्या प्रतिसादाने आपण बावरणारे नाही आहात......आपल्या पहिल्या रचनेनंतरच्या सर्व रचना अधिकाधिक चांगल्या होत आहेत...... पहिल्या रचनेचा प्रतिसाद कसा होता?

असो... आपल्या पुढील लेखनास खुप शुभेछा.

डॉ.कैलास

ह बा
काय कळलं नाई बा..!
असा होता तो अविस्मरणीय प्रतिसाद.
पण चुक माझीच होती. स्पष्टीकरणाशिवाय ती रचना नेमकी कशाबद्दल आहे हे कळणे सहजशक्य नव्हते. असो... काही गुरूजी लिमलेटच्या गोळ्या देउन समजवतात तर काही धपाटे घालून. मला धपाटे खायची सवय आहे. फक्त कधी कधी मलाही गुरूजींच्या धोतराची टेबलाशी गाठ बांधायची हुक्की येते...