शेरो-शायरी: दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ

मिर्झा गालिब ह्यांच्या रचना अर्थाच्या दृष्टीने इंद्र-धनुष्यासारख्या असल्या तरीही अर्थ पेलायचा असल्यास त्या शिव-धनुष्या सारख्या आहेत, असे मज नेहमी वाटते. या तर, हे शिव-धनुष्य आपल्याला उचलायला जमते का ते बघू!

चला तर,मिर्झा गालिब ह्यांच्या ’दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ’, ह्या प्रसिद्ध गझलेने आपण सुरुवात करुया. त्यातील काही निवडक शेरांचा अर्थ आपण बघू.

मिर्झा गालिब ह्यांच्या रचना अर्थाच्या दृष्टीने इंद्र-धनुष्यासारख्या असल्या तरीही अर्थ पेलायचा असल्यास त्या शिव-धनुष्या सारख्या आहेत, असे मज नेहमी वाटते. या तर, हे शिव-धनुष्य आपल्याला उचलायला जमते का ते बघू!
ह्या गझलेचा मतला असा आहे की-

दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ
मै न अच्छा हुआ, बुरा न हुआ

( मिन्नतकश=आभारी, ऋणी. मिन्नतकश-ए-दवा= औषधाचा आभारी.)

शायर म्हणतो की माझे दु:ख , माझी वेदना ही औषधाच्या ऋणात नाहीय, माझ्या वेदनेला औषधाचे आभार मानायची गरज पडली नाही. कारण ’मै न अच्छा हुआ’ म्हणजे माझी वेदना हे औषध काही दूर करु शकलेले नाही, मी बरा झालो नाही. पण हे जे झाले ते, ’बुरा न हुआ’ म्हणजे काही फारसे वाईट झाले नाही, कारण मी जर बरा झालो असतो तर माझ्या वेदनेला कायम औषधाच्या ऋणात, औषधाचे आभारी रहावे लागले असते, आणि मला, माझ्या वेदनेला कुणाच्याही ऋणात राहणे कदापि मंजूर नाही. कविची स्वाभिमानी आणि मनस्वी वृत्ती ह्या शेरातून बघायला मिळते.

पुढे शायर म्हणतो की-
जम्मा करते हो क्यूं रकीबो को
इक तमाशा हुआ, गिला न हुआ

(रकीब=शत्रू, प्रतिस्पर्धी. गिला=तक्रार)

गालिब म्हणतोय की, ’जम्मा करते हो क्यूं रकीबो को’ म्हणजे माझ्या शत्रूंना तुम्ही का गोळा करताहात? हा तर ’इक तमाशा हुआ’, म्हणजे एक तमाशा होईल’, ’गिला न हुआ’ म्हणजे माझ्या विरुद्ध तक्रार करणे होणार नाही. शायर आपल्याला प्रतिस्पर्ध्याला उद्देशून असे म्हणतोय, वाद तुझ्या-माझ्यात आहे, तुला माझ्या विरोधात जर काही बोलायचे आहे, काही तक्रार करायची आहे, तर ती माझ्या समोरासमोर येऊन कर, माझ्या शत्रूंना असे गोळा करुन तू जे करतो आहेस तो एक तमाशाच आहे, माझ्या विरुद्ध तक्रार करण्याची की कुठली पद्धत आहे?

पुढे गालिब म्हणतो की-
है खबर गर्म उनके आने की
आजही घरमे बोरिया न हुआ

( बोरिया=चटई)
ह्यातील भावार्थ असा की, माझी प्रेयसी आज माझ्या घरी येणार आहे अशी बातमी मी ऐकतोय, आणि ती आल्यावर, अगदी नजरेच्या पायघड्या घालून तिचे स्वागत करण्याची माझी इच्छा आहे, पण माझे दारिद्र्य आणि दुर्दैव बघा की तिला बसायला द्यायला, नेमकी आजच, घरात साधी चटई सुद्धा नाहीय.मला प्रेयसीचे अतिशय प्रेमाने स्वागत करायचे आहे, पण मी किती भणंग आहे बघा, की घरात एक साधी चटई सुद्धा नाहीय. गालिबने त्याच्या आयुष्यात खूप हलाखीत दिवस काढले आहेत. त्याचेच प्रतिबिंब कदाचित ह्या शेरात पडले असावे का?

पुढे शायर म्हणतो की-
कितने शीरीं है तेरे लब के, रकीब,
गालिया खाके बेमज़ा न हुआ

( शीरीं= मधुर, लब=ओठ)
गालिबने ह्या शेरात अतिशय अनोख्या पद्धतीने प्रेयसीच्या ओठांची तारीफ केलीय. तो म्हणतो की ",कितने शीरी है तेरे लब" म्हणजे" , "प्रिये, तुझे ओठ इतके मधुर आहेत की", "रकीब, गालिया खाके बेमजा न हुआ", म्हणजे "माझा प्रेमातील जो प्रतिस्पर्धी आहे, ज्याने तुझ्या ओठांचे माधुर्य अनुभवलेले नाहीय, (खरे तर तो ही त्याकरिता आसुसलेला आहे), त्याने तुझ्या ओठातून ज्या शिव्या ऐकल्या, त्या सुद्धा त्याला मधुरच भासल्या! खरे तर शिव्या ह्या कडवटच वाटायला हव्या होत्या, पण तुझ्या ओठांचे माधुर्य असे की शिव्या ऐकून सुद्धा तो ’बे-मझा’ झाला नाही; म्हणजे त्याला मझाच आला!

पुढील शेर बघा-
क्या वो नमरुद की खुदाई थी,
बंदगी मे मेरा भला न हुआ

(नमरुद= एक राजा, जो स्वत:ला ईश्वर समजायचा, बंदगी=भक्ती,ईश्वर-सेवा)
शायर म्हणतो की, एकीकडे नमरुद नावाचा राजाची ही गुर्मी, की तो स्वत:लाच खुदा मानायचा, ईश्वराने त्याचे काडीचेही वाकडे केले नाही, आणि मी आयुष्यभर जी त्याची बंदगी, म्हणजे सेवा केली, त्याचे फळ मला काहीच मिळाले नाही. गालिब एका अर्थाने ईश्वरालाच हा सवाल करतोय की माझी सेवा ही काय नमरुदच्या खुदाई सारखी होती की काय, म्हणून मला ईश्वर-सेवेचे काहीच फळ मिळाले नाही?

ह्या लेखातील जो शेवटचा शेर आपण बघणार आहोत, तो तर एकदम उत्तुंग असा आहे, तो असा की-
जान दी; दी हुई उसीकी थी,
हक़ तो ये है के, हक़ अदा न हुआ

(हक़=खरे,सत्य, हक़=हक्क, जवाबदारी)
हक़ ह्या शब्दाच्या दोन अर्थाचा अतिशय अलंकारिक पद्धतीने गालिबने ह्या शेरात उपयोग केलाय. शायर म्हणतो की, "जान दी; दी हुई उसीकी थी", म्हणजे मी ईश्वराने दाखविलेल्या रस्र्त्यावरुन चालताना माझे आयुष्य वेचले, पण हे आयुष्य मला कोणी दिलेय? हे तर त्यानेच दिलेय! म्हणून पुढे शायर म्हणतो की" खरे तर हे आहे की जे आयुष्यच त्याने दिलेय, जे मुळात माझे नव्हतेच मुळी, ते मी त्याच्या सेवेत जरी लावले असेल तरीही त्याचा अर्थ, माझ्यावर त्याने टाकलेली जवाबदारी मी पूर्ण केली असा होत नाही.हे जीवन त्यानेच दिलेले होते, जे मी त्याच्या करिता वाहिले, पण मी माझ्याकडून काय दिले, हा खरा प्रश्न आहे! म्हणून शायर म्हणतो की, "हक़ तो ये है के, हक़ अदा न हुआ". ह्या विचाराची उत्तुंगता खरे तर हिमालयालाही लाजवील अशी आहे!
चला तर, आता निघतो, पुढील भागात भेटूच!

आपल्या अधिक माहितीकरिता- ’लता सिंग्स गालिब’ ह्या हृदयनाथांनी संगीत-बद्ध केलेल्या ध्वनि-फितीत ह्या गझलेतील काही शेर आपण ऐकू शकता. (राग ’जोगकंस’ मधे ही चाल बांधली आहे बहुदा.) कृपया गुगलवर शोधा :)

-मानस६

प्रतिसाद

धन्यवाद मानस६,
अतिशय स्तुत्य उपक्रम आपण सुरू केलेला आहे.....
अभिनंदन आणि शुभेच्छा....
हा लेख उत्तमच आहे....पुढील लेखांच्या प्रतीक्षेत..... :-)

माफ करा पण इतका उथळ नाहीये अर्थ. काही ठिकाणी जवळ पोचला आहात.

मानस ६,

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

लिहीत राहावेत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

श्री. अजय कोरडे,
आपण ह्या गझलेचा जो अर्थ जाणताय तो प्रतिसादाच्या माध्यमातून कृपया येथे लिहावा, म्हणजे सर्वांनाच माहिती होईल, किंबहुना आपण लिहिलेल्या प्रतिसादातच जर तो दिला असता तर आनंद झाला असता.(आपल्या प्रतिसादची वाट बघतोय.)
-मानस६

धन्यवाद! आपण सुरु केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.

परंतू अर्थाच्या बाबतीत अजय कोरडेंच्या मताशी मी सहमत आहे.
आपण खुप शब्दशः अर्थाची मांडणी केलीत.केवळ उर्दू शब्दांचे अर्थ कळल्याने त्यातिल कवितेचे अर्थ पकडता येतिल का?तेही गालिबच्या?मग त्याच्यात अन इतरांमधे फरक तो काय राहिला?

मी काही जाणकार नाही, उलट तुम्ही देताय म्हणून हे शेर वाचायला मिळताहेत अशी अवस्था!
,तरी अर्थ वेगळे लागताहेत .चुक -बरोबर ठाउक नाही.परंतू प्रत्तेकाने स्वतःला कळलेले अर्थ जर इथे शेअर केलेत तर या मुशायर्‍याला अधिक रंगत येइल.

मी अजून वाचतेय्...

उथळ, जवळपास पोचणे, गालिब व इतरांमधील फरक समर्थपणे न दाखवू शकणे असे म्हणण्यापेक्षा कुणी स्वत:च्या मताप्रमाणे खोल अर्थ काय आहेत ते सांगेल तर बरे होईल असे वाटते.

मानस,

माझ्यामते आपण सांगीतलेल्या अर्थावर जास्त विवेचन केले नसलेत तरी येथे सगळेच गझलकार असल्यामुळे दडलेला अर्थ जाणवण्याची क्षमता कमीअधिक प्रमाणात सगळ्यांकडेच आहे. त्यामुळे शब्दार्थ सांगीतला तरी पुरेसे आहे. आपण वेगवान पद्धतीने आणखीन काही उर्दू गझलांचे स्पष्टीकरण देत राहावेत अशी विनंती!

>

बरोबर आहे!
अधिकाधिक गझला टाकाव्यात्.आपण अर्थ देता आहातच,इतरांनी त्या सोबतच त्यांना भावलेला,जाणवलेला अर्थ टाकावा म्हणजे अधिक रंगत येइल.

उपक्रम अतिशय स्तुत्य, ज्ञानात भर पडण्यास उपयुक्त आहे.

मनीषा साधू, अजयजी कोरडे,
मला काही गोष्टी सांगाव्याश्या वाटतात
१) आपण जर म्हणता की अर्थ ह्याहूनही गहन आहे, तर मग आपल्याला जे वाटते ते बिन-दिक्कतपणे लिहित का नाहीत? त्या निमित्ताने चर्चा होईल. नुसतेच मोघम बोलून काय साध्य होईल? आपल्या मतांचे स्वागत आहे.
२) हा लेख लिहिण्या आधी काही संकेत-स्थळावरून ह्या गझलेचा, आणि त्यातील अर्थाचा थोडा-फार अभ्यास केलाय,तेथील काही जाणकारांची मते ही अभ्यासली, आणि मी जो अर्थ द्यायचा प्रयत्न केलाय तो बराचसा जाणकारांच्या मताच्या जवळ जातोय, असे मला वाटते.ह्याही पेक्षा वेगळा आणि तर्क-संगत अर्थ जर कोणाला लागत असेल तर जरूर मांडावा. ही लेखमाला शेअरींग साठी आहे, एकतर्फी समीक्षे करीता नाहीय.
३) ह्याच लेख मालेचा अर्थ दुसरी ही भाग वाचावा.
-मानस६

कितने शीरीं है तेरे लब के, रकीब,
गालिया खाके बेमज़ा न हुआ

येथे कवि स्वतःलाच रकीब म्हणतोय.
तिच्या ओठांचा प्रतिस्पर्धी!
कारण ती तिच्या ओठांवर प्रेम करतेच शिवाय कविवरही
म्हणून ते कविला शिव्या देताहेत..
परन्तु ते इतके मधूर आहेत कि त्यांच्या शिव्याही गोड वाटतात.

इथे कविचा प्रतिस्पर्धी (तिच्यावर प्रेम करणारा दुसरा मनुष्य)असा अर्थ योग्य या साठी वाटत नाही
कारण प्रेयसीची तारीफ करित असतांना एव्हढ्या एकांत वार्तालापात
कुणी प्रतिस्पर्ध्याची आठवण तिला का करून देइल?
शिवाय रकीब हा शब्द वरच्या ओळीत सलग लिहिलाय.
रकीब म्हणजे एकावर प्रेम करणारे दोघे असाही आहे.

शिवाय आपल्या प्रेयसिच्या ओठानी कुणाला मजा आला, मग तो शिव्या खाउन का होइना
हे कुणी प्रियकर कधितरी सांगेल का? पचवेल का?