शांत मी राहू कशी



शांत मी राहू कशी रे भेटला आहेस तू
आज शब्दांच्या पुराने वेढला आहेस तू !

आज जन्माशीच माझ्या बोलले इतकेच मी
जीव घेणाऱ्या स्मृतींचा गलबला आहेस तू !

हासती, समजावती सांभाळती माझे जिणे
काय या हळव्या ऋतूंशी बोलला आहेस तू !

भावनांची, जाणिवांची एक गुंतागुंत मी
काय या गुंत्यामध्येही गुंतला आहेस तू !

फक्त माझ्या कल्पनेचे चित्र तू आहेस का ?
की मला रेखाटणारा कुंचला आहेस तू !

-- नीता भिसे

प्रतिसाद

व्वा! फार सुंदर कल्पना. बाकीचे शेर ठीक वाटले.

गझल  फार आवडली....

आज जन्माशीच माझ्या बोलले इतकेच मी
जीव घेणाऱ्या स्मृतींचा गलबला आहेस तू !

हासती, समजावती सांभाळती माझे जिणे
काय या हळव्या ऋतूंशी बोलला आहेस तू !

भावनांची, जाणिवांची एक गुंतागुंत मी
काय या गुंत्यामध्येही गुंतला आहेस तू !

हे शेर...़काळीज खल्लास करणारे....

फारच सुंदर...तरल आणि अर्थवाही तर आहेच...प्रेमवाहीही....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

शांत मी राहू कशी रे भेटला आहेस तू
आज शब्दांच्या पुराने वेढला आहेस तू !
छान...

भावनांची, जाणिवांची एक गुंतागुंत मी
काय या गुंत्यामध्येही गुंतला आहेस तू !
अ   प्र  ति  म

फक्त माझ्या कल्पनेचे चित्र तू आहेस का ?
की मला रेखाटणारा कुंचला आहेस तू !
सुंदर...

फार फार आवडले हे शेर.

नमस्कार.
मी अमोल भारंबे, इथे नवीनच आहे.

प्रति नीता,
तुझी ही गझल आवडली. छानच आहे.
पण त्यातल्या त्यात...

फक्त माझ्या कल्पनेचे चित्र तू आहेस का ?
की मला रेखाटणारा कुंचला आहेस तू !

तुझ्या गझल मधल्या शेवटच्या या दोन ओळी खास करुन आवडल्या.
अतिशय सुंदर.

या दोन ओळींनी, हृदयनाथ मंगेशकरांच्या . . . "...त्या फुलांच्या गंध कोशी, सांग तू आहेस का?..." या कवितेची आठवण झाली.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

आणखी लिहीत रहावे.
धन्यवाद.

कळावे,
अमोल भारंबे. [बी. इ. - इंस्ट्रूमेंटेशन.]
(कल्याण - पश्चिम.)
(मोबाइल नंबरः- ०९९२०९२०६०१).