सोपे न माना
टाळणे कंटाळणे सोपे न माना
शायराला पाळणे सोपे न माना
सारखा जातो कुठे मी कोण जाणे
सारखे धुंडाळणे सोपे न माना
वेदनांची दीर्घशी कादंबरी ही
या मनाला चाळणे सोपे न माना
जेवढी येते मजा टोचून आम्हा
तेवढे किंचाळणे सोपे न माना
प्रेम नावाचा गुन्हा केलाय मीही
लोचनांचे वाळणे सोपे न माना
की खडे फेकाल धान्यातून जेव्हा
नाव माझे गाळणे सोपे न माना
हे तुम्हा जमणार नाही, शब्द माझा
बिनक्रिया वाचाळणे सोपे न माना
भेट मृत्यूचीच देते शेवटी ते
जीवनाचे भाळणे सोपे न माना
ते सरावातून येते, यत्न सोडा
आमचे ओशाळणे सोपे न माना
आसवांची ईंधने ओता जराशी
प्रेत माझे जाळणे सोपे न माना
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
गुरु, 11/09/2008 - 18:54
Permalink
मजा आली
गझल वाचून मजा आली.
वेदनांची दीर्घशी कादंबरी ही
या मनाला चाळणे सोपे न माना
प्रेम नावाचा गुन्हा केलाय मीही
लोचनांचे वाळणे सोपे न माना
भेट मृत्यूचीच देते शेवटी ते
जीवनाचे भाळणे सोपे न माना
आसवांची ईंधने ओता जराशी
प्रेत माझे जाळणे सोपे न माना
ठळक केलेला शब्द 'इंधने' असा हवा होता का?
बाकी तुमची गझल अत्यंत सुंदर आहे. तुम्ही लिहीत जा. 'मा फलेषु कदाचन|'
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 12/09/2008 - 10:51
Permalink
व्वा
वेदनांची दीर्घशी कादंबरी ही
या मनाला चाळणे सोपे न माना
अजयजींशी सहमत.
ज्ञानेश.
शुक्र, 12/09/2008 - 14:49
Permalink
वा!
सम्पुर्ण गझल सुरेख आहे. त्यातही कादंबरी आणि प्रेत माझे हे शेर खुप आवडले.