मिठाई
विचार आला पुन्हा जुना तो, जुनी धिटाई तशीच आहे
"बघा झटकले!" अशी आमची जुनी बढाई तशीच आहे!
जरी पुढारी हसून सांगे - "जवळजवळ संपलीच समजा! "
घरात दारात पोचलेली सुरू लढाई तशीच आहे
अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे
"उद्यातरी फेकतील... " म्हणती भुकेजलेली भिकार पोरे
"किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे
कितीक दिंड्या, किती पताका... अजून कल्लोळ होत नाही!
अजून बिलगून या विटेवर उभी विठाई तशीच आहे...
गझल:
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
बुध, 20/08/2008 - 09:41
Permalink
सुंदर शेर
अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे...
चक्रपाणि
बुध, 20/08/2008 - 12:11
Permalink
छान!
व्वा पुलस्ति! गझल छान आहे एकंदर. काही शेर ताकदीचे आहेत. एकंदर गझल आवडली.
भुकेजलेल्या पोरांचा शेर आवडला. मुळात भुकेलेली+कोमेजलेली = भुकेजलेली हा नवा शब्दप्रयोग आवडला :) या शेराच्या दुसर्या ओळीत 'किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे' ऐवजी 'तरी दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे' असा मामुली बदल केल्यास ओळ अधिक प्रभावी होईल असे वाटते (भिकार्यांची तशी अपेक्षा असली तरी दुसर्या ओळीतून मात्र अपेक्षाभंग आणि त्याचे दु:ख)
सावळी निळाई आणि विठाईचे शेरही छान झालेत; मात्र विटेला बिलगणे (?) खटकलेच. त्याऐवजी काही पर्यायी शब्दयोजना करता आल्यास उत्तम होईलसे वाटते.
मतला आणि दुसर्या शेराच्या दोन ओळींमधला परस्परसंबंध कमकुवत वाटतो; त्यातल्या त्यात मतल्यात जरा अधिकच! चू. भू. द्या. घ्या.
पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!
- चक्रपाणि जीवन चिटणीस
पुलस्ति
बुध, 20/08/2008 - 19:42
Permalink
बिलगणे
मला "तिष्ठणे", "ताटकळणे" पेक्षा - "बिलगणे"च अपेक्षित आहे. हा राग, खंत त्या दिंड्या-पताकांबद्दल नाहीच आहे. "कल्लोळ" विठाईतच होत नाही. विठाईलाच स्थितप्रज्ञ देवत्वाचा "मोह" सुटत नाही असं सुचवायचंय. नाहीतर ती केव्हाच रस्त्यावर उतरून कामाला लागली असती. जरा अधिक खोलात जाऊन... ही "विठाई" समष्टीतल्याच नव्हे तर व्यक्तीमधल्या गृहीत "चांगुलपणा" चं प्रतीक आहे.
शेर थोडा हुकलाच म्हणायचा :)
"तरी" चा बदल पटला! मतला कमकुवत आहे .. हेही अगदी १००% पटले!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चित्तरंजन भट
बुध, 20/08/2008 - 21:48
Permalink
मिठाई आवडली
सगळेच शेर जमून आले आहेत. विठाई, मिठाई, निळाई विशेष. मिठाई आवडली.
गणेश धामोडकर ह्यांची मिठाई आठवली:
बंद कर तू नाकडोळे आपले
बंगल्यामध्ये मिठाई चालली
सोनाली जोशी
बुध, 20/08/2008 - 23:36
Permalink
गझल आवडली
गझल अतिशय आवडली
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 22/08/2008 - 17:42
Permalink
सावळी निळाई ...
अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे
हा शेर आवडला... शुभेच्छा.
तुम्ही अवतरणचिन्हांचा समर्पक वापर करता गझलेत, ही फार चांगली बाब आहे!
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 22/08/2008 - 17:44
Permalink
बिलगण्याविषयी थोडेसे ः :)
बिलगण्याविषयी थोडेसे ः :)
- खूप शोधाशोध केल्यानंतर आई एकदाची दिसली की लहान मुलाला अवर्णनीय आनंद होतो आणि ते आवेगाने तिला जाऊन बिलगते...
- प्रियकर आणि प्रेयसी निळ्या निळ्या चांदण्यात फिरायला गेले आहेत... गारवाही छान आहे... प्रियेच्या अंगभर गोड शिरशिरी पसरते आणि ती प्रियकरला हलकेच बिलगते...
- बाबांच्या कडेवर छोटू बसलाय... बाबांचे मित्र गप्पा संपवून निघालेत... दोन्ही हात ते छोटूच्या दिशेने पसरतात आणि त्याला आपल्याबरोबर (खोटं खोटं) घेऊन जाऊ इच्छितात.. पण छोटू दोन्ही हात बाबांच्या गळ्यात टाकून बाबांना पहिल्यापेक्षा अधिकच बिलगतो...
बिलगणे हा शब्दच मुळी कवळण्यासंदर्भातील अतिनिकटचे स्पर्शत्व दर्शवितो... अगदी सर्वांगाला सर्वांगाचा स्पर्श अपेक्षित नसला तरी एका देहाचा बराचसा भाग दुसऱ्या देहाला स्पर्शणे ही कृती बिलगणे या शब्दातून प्रतिबिंबित होत असते...
या निकषावर पुलस्ती यांनी ` विठाई `चा शेर घासून बघायला हरकत नाही...
पुलस्ति
शुक्र, 22/08/2008 - 18:53
Permalink
तुमच्याकडूनच...
तुमच्या गझला वाचत वाचत ज्या गोष्टी शिकाव्याश्या / सुधाराव्याश्या वाटल्या आहेत त्यातलीच ही एक! वाटतं तेवढं हेही सोपं काम नाही हे लक्षात आलंच आहे.. प्रयत्न करीत राहीन!!