व्यथा

व्यथा

जितके जमेल तितके अडवीन मी व्यथांना
नाहीच ऐकले तर बडवीन मी व्यथांना

केला प्रयास जर का त्यांनी लढावयचा...
नक्की क्षणाक्षणाला रडवीन मी व्यथांना

त्यांना हिर्यांप्रमाणे समजेन यापुढे मी
नशिबासवेच माझ्या घडवीन मी व्यथांना

एकेक अपयशाला हटवीन पार मागे...
अन् ठोकरीत एका उडवीन मी व्यथांना

कणखरपणास माझ्या जाऊ नये तडा; पण-
गेल्यास, लोचनी या दडवीन मी व्यथांना

....... आरती कदम

गझल: 

प्रतिसाद

सुंदर......
प्रत्येक शेर आवडला.

डॉ.कैलास

गेल्यास, लोचनी या दडवीन मी व्यथांना!

छान गझल!

आरती....
गझल भन्नाट आहे...

खुप छान. उडवीन व्यथाना आवडले.

नाहीच ऐकले तर बडवीन मी व्यथांना .... हा हा हा
फार रागावू नका हो !
[व्यथा आहेत म्हणून तर गझल आहे ना?]

कणखरपणास माझ्या जाऊ नये तडा; पण-
गेल्यास, लोचनी या दडवीन मी व्यथांना
वा...

छान. व्यथांना बडवणे अभिनव :)