धोका

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

गझल: 

प्रतिसाद

खुप आवडली गजल. झरोका, सोडला मोका चांगले आहे.

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

असे का म्हणता हो?......हा आर्त शेर आवडला.

डॉ.कैलास गायकवाड.

सुंदर गझल, क्रांती जी.

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका

"या घराला एकही नाही झरोका"
केले तर?
सोबती काळोखगर्भाचा उबारा, सुरेख ओळ.
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा
छान.

एकंदरीतच खूप मनस्वी रचना !

विचार चांगले आहेत.पण,
धोका आणि सलोखा मध्ये 'क' आणि 'ख' ही दोन व्यंजने वेगवेगळी आहेत हे लक्षात घ्यावे. माझ्यामते अशाप्रकारचा काफिया चालणार नाही. जर स्वरकाफिया घ्यायचा असेल तर का, खा,मा, पा असे काहीही चालेल पुढे. परंतु पुढील प्रत्येक शेरात खा किंवा का असेच घेतले आहे. 'ख' आणि 'क' ही वेगवेगळी व्यंजने असल्याने अशी वापरता येणार नाहीत.

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

वाव्वा.

चारच द्विपदी आहेत. पण नेहमीप्रमाणे एकंदर चांगली. ह्या स्वरकाफियांच्या रचनेत क्रांती ह्यांनी मतल्यात घेतलेली सूट नंतरच्या द्विपदींत ही सूट वापरलेली नाही एवढेच.

हे कसे काय बुवा?
चित्तरंजन,
ह्या स्वरकाफियांच्या रचनेत क्रांती ह्यांनी मतल्यात घेतलेली सूट नंतरच्या द्विपदींत ही सूट वापरलेली नाही एवढेच.
हे तुम्हाला कसे काय समजले?
कारण, जर स्वरकाफिया घेतला तर त्यामागील अक्षराचा 'ओ' हा स्वरही त्यांनी तसाच ठेवला आहे. म्हणून असे वाटले की स्वरकाफिया त्यांना अपेक्षित असावा की नसावा? अर्थात, हा योगायोगही असू शकतो म्हणा...:)
क्रांति,
ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा
छान.

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा..........एकदम कातिल !!

जियो जानेमन !!

भन्नाट...

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका
क्रांति, काय ओळ लिहीली आहे. वा मजा आ गया. या ओळीवर कुर्बान.

उत्तम गझल !

शेवटचा शेर आवडला.

अजय,

धोका आणि सलोखा मध्ये 'क' आणि 'ख' ही दोन व्यंजने वेगवेगळी आहेत हे लक्षात घ्यावे. माझ्यामते अशाप्रकारचा काफिया चालणार नाही.

हे आपले मत चुकीचे वाटते. एकदा मतल्यात 'आ'कारान्त स्वरकाफिया घेतल्यानंतर कोणतेही अक्षर (म्हणजे पाचही वेळा मतल्यातीलच एका काफियातील अक्षरही) चालायलाच हवे. क्रान्ती यांची ही गझल शुद्ध आहे.

मात्र, क्रान्ती यांच्या आजवरच्या गझला वाचल्यानंतर (हे वैयक्तीक मत आहे) मला या गझलेत नवे काही मिळाल्यासारखे वाटले नाही. शेवटचा शेर खूप आवडला.

धन्यवाद!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

हे दोन शेर फारच सुरेख .

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

वा , फार आवडला हा शेर