सुरेश भटांच्या त्या दोन ओळी...

sureshbhat.in या संकेतस्थळावर मला जवळपास दोन वर्षें होतील. सुरेश भट आणि त्यांच्यासंबंधी बर्‍याच गोष्टी वाचायला - अभ्यासायला मिळाल्या. केवळ रदिफ-काफिया घेऊन गझल करता येत नाही. त्यातील बाह्यतंत्र आणि आंतरिक तंत्र या दोनही गोष्टींवर चर्चा ऐकायला/वाचायला आणि अर्थातच करायला मिळाल्या. सुरेश भटांचे काव्य हे गझलकारांना एक प्रेरणास्त्रोत असते हे अनुभवायला मिळाले. गझल कशी करावी या बरोबरच त्यातील भाव कसा उलगडावा हेही शिकायला मिळाले. तसे, शिकविणारे अनेक भेटले पण इथे मिळाले ते भावले.
सुरेश भटांचे काव्य गझलकारांसाठी उपयुक्त आहे असे नेहमीच ऐकले. अनेक कवी/साहित्यिक यांच्या तोंडून सुरेश भटांचे नाव गझलसाठी जोडले गेलेले ऐकले/पाहिले. गझल केवळ एक काव्यप्रकार नसून त्यात असणारी जी अफाट शक्ती ती मात्र खूपच कमी अभ्यासकांच्या तोंडून ऐकायला मिळाली. मराठी गझल आणि उर्दू गझल यांची तुलना करताना मराठी गझलने असे करावे/ तसे करावे असे मौलिक संदेश ऐकायला मिळाले. एकूण काय, तर मराठी गझलमधे फारसा अर्थ नाही. काही काळ मलाही ते खरे वाटत होते. मात्र, मी sureshbhat.in या संकेतस्थळावर लिहितो हे जेंव्हा मी माझ्या माहितीतल्या एक दोघांना सांगितले तेंव्हा मला त्यांनी या दोन ओळी ऐकविल्या आणि थांबले. गझलशी काहीही संबंध नसलेल्या आणि स्वतः कविता लिहित नसलेल्या लोकांकडून हे ऐकल्यामुळे मला प्रथम धक्काच बसला, नंतर आनंदही वाटला. कविवर्य सुरेश भटांनी मराठी लोकांच्या हृदयात पक्के स्थान मिळवले असल्याची जाणीव झाली. या दोन ओळींबद्दल मीही पुन्हा विचार करायला लागलो आणि याद्विपदीमधील व्यापकता डोळ्यासमोर उभी राहिली. अर्थात, अनेक उदाहरणे देता येतील या ओळींबद्दल पण काहीच देतो....
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

याच त्या दोन ओळी.
या ओळी आपल्या कोणालाच नवीन नाहीत. त्यातील अर्थही फार गूढ वगैरे नाही. पण, सहज-सोप्या वाटणार्‍या या ओळींनी कितीतरी चरित्रे माझ्या डोळ्यासमोर आणून उभी केली. तेच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
द्विपदीतील दुसरी ओळ पहा..
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा
१. संत ज्ञानेश्वर महाराज : संत ज्ञानेश्वरांचे चरित्र कोणाला माहित नाही? अनेक अन्याय सहन करूनही कोणाबद्दलही मनात किंतु न ठेवता पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाला ही ओळ हुबेहूब जुळते.
२. संत तुकाराम महाराज : संत तुकारांमांनी आयुष्यच जगले ते समाजासाठी! 'आता उरलो उपकारापुरता' असे म्हणणार्‍या संत तुकारामांचे जीवन पाहिल्यानंतर याच ओळीची आठवण होते.
३. संत एकनाथ महाराज : सुसंपन्न स्थितीत असलेल्या संत एकनाथ महाराजांना समाजाने वाळीत टाकलेल्या लोकांकडे जाऊन समाजाचा रोष ओढवून घेण्याची तशी खरोखरच आवश्यकता लौकीकार्थाने नव्हती. परंतु, स्वत:चे जीवन जाळून या लोकांसाठी ते खर्च करणार्‍या संत एकनाथांनाही या ओळी लागू पडतात.
४. कुमारील भट्ट : केवळ निवृत्तीवादाचे धडे गिरविणार्‍या समाजाला पुन्हा प्रवृत्तीवादाकडे आकर्षित करणार्‍या कुमारील भट्टांच्या जीवनात असा काही प्रसंग आला की त्यांना स्वतःचे दहन करावे लागले. चितेवर चढल्यानंतरही माणूस प्रवृत्तवादाकडे वळावा असेच ते सांगत होते. एखाद्या विचारासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणार्‍या महापुरुषांमध्ये कुमारील भट्टांचा समावेश होईल. त्यांचे समर्पित जीवन आणि चितेवरच्या प्रसंगाची या ओळी आठवण करून देतात.
५. आद्य शंकराचार्य : कुमारील भट्टांच्यानंतर प्रवृत्तीवादाचा झेंडा आद्य शंकराचार्यांनी उचलला. आपले आयुष्य फार थोडे आहे हे लक्षात आल्यावर ठराविक प्रापंचिक जीवनाची आसक्ती न ठेवता एकदम चतुर्थ आश्रम 'संन्यास' स्वीकारला आणि भारतभर फिरून आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. १६-१७व्या वर्षी संपूर्ण भारत वादविवादामध्ये जिंकणारे आद्य शंकराचार्य मोठेपणा मिरवित बसले नाहीत. पुन्हा गावोगाव फिरले. लोकांना जीवनाचा योग्य मार्ग दाखविला. आपले मोजके आयुष्य भारतासाठी झिजविले. अशांची ही आठवण येते.
६. वेदातील 'यम' : विवाह हा केवळ स्त्री-पुरुषाचा नाही, तर परवंशाच्या स्त्री-पुरुषांचा होवू शकतो. भावा-बहिणींचा नाही हा विचार समाजात रुजविणार्‍या आणि प्रसंगी स्वतःच्या सर्व इच्छा बाजूला ठेवून केवळ नि केवळ याचसाठी आपले जीवन जाळणार्‍या यमाची आठवण या ओळीमुळे होते.
कार्ल मार्क्स, चार्वाक, गौतम बुद्ध, भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवनाचे बलिदान करणारे क्रांतिवीर, छ. शिवाजीमहाराज, बाबा आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले यांसारखी जीवने, अशी विचारांसाठी/समाजासाठी आपले जीवन जाळणारी अनेक उदाहरणे देता येतील.
मला सांगायचा मुख्य मुद्दा हा की 'माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा' ही लोकोक्ती ठरावी. ज्या ज्या वेळी असे उदाहरण येईल त्यावेळी एक उक्ती म्हणून या ओळीचा वापर नक्कीच होऊ शकेल.
कविवर्य सुरेश भट हा केवळ मराठी मनाचा नव्हे तर काव्यजगताचा मानबिंदू ठरावा अशा या ओळी आहेत.
अमराठी ओळींबरोबरच मराठी ओळींनाही तितकेच महत्व द्यायला हवे. अशा ओळी ही गझलेची ताकद आहे. अशाप्रकारचे काव्य लिहिता येण्याचा प्रत्येक कवीने प्रयत्न करावा.

धन्यवाद!

प्रतिसाद

काही मुद्दे पटले नाहीत.

१. गझलेची द्विपदी ह्या दृष्टीने पाहिल्यास ही द्विपदी विशेष वाटत नाही. यात दोन्ही ओळीत एकच मुद्दा दोन भिन्न पद्धतीने सांगीतला आहे असे माझे मत! पहिल्या ओळीचा समारोप होणारी दुसरी ओळ वाटली नाही. एकंदरीत 'मी माणसांच्या आयुष्यात प्रकाश (ज्ञानाचा / सत्याचा या स्वरुपी) आणण्यासाठी स्वतः जळत आहे' असे ते सरळ वर्णन वाटते.

२. 'अमराठी ओळींबरोबरच मराठी ओळींनाही तितकेच महत्व द्यायला हवे' हे आपले विधान मला दिशाहीन वाटल्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही. मराठी ओळींना महत्व देऊ नये असे विचार मांडणारा कुणी गट समोर असावा असे गृहीत धरून लिहिल्यासारखे वाटत आहे.

३. 'अशा प्रकारचे काव्य लिहिता येण्याचा कवीने प्रयत्न करायला हवा' - सहमत आहे.

धन्यवाद!

जोशी,
लेख चांगला आहे. त्या दोन ओळी विचार करायला लावतील, अशाच.

पहिले म्हणजे 'ही द्विपदी गझलेची म्हणून विशेष वाटत नाही' म्हणजे काय? इतर काव्यासाठी विशेष आहे असे आपले म्हणणे आहे की या ओळीत काहीच दम नाही असे आपले म्हणणे आहे?
या ओळींमध्ये दम नाही असे म्हणत असाल तर जे लोक या ओळींमुळे सुरेश भटांना ओळखतात त्याचे काय? त्यामुळे आपले हे म्हणणे रास्त नाही.

माझी दोन मते:
१. ही द्विपदी एक आकर्षक व अभिमानयुक्त द्विपदी आहे.
२. व्यक्तीगत मतानुसार मला 'गझलेतील द्विपदीमधे आशयाचा संवेदनात्मक / स्फोटक / चमत्कृतीपूर्ण पंच असतो / असावा' असे वाटते. हे मत खोडून काढल्यास मला फरक पडणार नाही. कारण माझे मत बदलणार नाही. हा दुराभिमान नसून सोदाहरण स्पष्ट करण्यासारखी गोष्ट आहे. तसेच, मी हा सिद्धांत मांडत नाही किंवा मांडू शकतही नाही. मात्र पुन्हा लिहितो, की स्पष्ट व वाटते ते समाजमान्य भाषेत लिहिणे हा माझा अधिकार आहे, मी 'आले काहीतरी छापून की टीका करायची' असे करणार नाही. चर्चा जरूर करा, मात्र विनंती आहे की वैयक्तीक उल्लेख कृपया नसावेत.

मला एक सुचला तो मिसरा लिहीत आहे.

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
मागतो आहे स्वतःला किरण माझा कोवळा

माणसांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे कर्तव्य करता करता स्वतःचा कोवळेपणाही संपून गेला. आता तो पुर्वीचा मी मलाच मिळत नाही.

असो. खरे तर आपल्या लेखावर व तेही भटसाहेबांच्या द्विपदीबाबत मी इतकी चर्चा करण्याचे प्रयोजन नव्हते. मात्र, माझ्याकडे सध्या माझे विचार मांडण्यासाठी दुसरे माध्यम उपलब्ध नाही. मी 'संकेतस्थळ सर्वांसाठी' या सवलतीचा वापर माझे विचार मांडण्यासाठी करत आहे. त्याची जबाबदारी घ्यायला तयारही आहे. जे म्हणायचे ते म्हणू दिल्याबद्दल विश्वस्तांचे आभार!

लेखाच्या निमित्ताने मांडलेला विचार आवडला. वरील ओळीतून अनुभवांचा,शब्दांचा, काय अर्थ लागतो ते व्यक्तीसापेक्ष असेल. पण मराठीतले दोन गझलकार आपले लैच आवडते. एक भाऊसाहेब पाटणकर आणि दुसरे सुरेश भट. मराठीत उत्तम गझलकार कोण ! तर वरील दोन नावाशिवाय आम्हाला कोणतीच नावे सांगता येत नाही. कोणाचा अनादर करायचा नाही, ..पण, ती या लेखनप्रकारातली दादा माणसं....!

उन हशरतोंसे कह दो कही और जा बसे
इतनी जगे कहा है दिल दागदार में !!

-दिलीप बिरुटे

अर्थातच बिरुटेसाहेब,

सुरेश भटांच्या काव्याचा स्पॅन प्रचंड आहे. सुरेश भट बनणे हे मराठी गझलकारांचे स्वप्न असू शकते.

मी फक्त वरील द्विपदीबाबत बोलत आहे. तसेच, याच स्वरुपाच्या त्यांच्या अनेक द्विपदी आणखीनही आहेत, मात्र तो विषय नव्हे.

बाकी भाऊसाहेब पाटणकर माझ्यामते 'गझल' लिहीत नसावेत. पण त्यांनी गझला लिहिल्या असल्याचे आपल्याला ज्ञात असल्यास कृपया मलाही सांगा. मात्र त्यांचे लिखाण विशेष वृत्तात नसायचे व रंगीन हा एकच गुण घेऊन यायचे असे माझे मत!

बर्‍याच दिवसांनी आपला प्रतिसाद पाहून आनंद झाला.

धन्यवाद!

बेफिकीर, केदार, डॉ. बिरुटेसाहेब
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
बिरुटेसाहेब,
लेखाच्या निमित्ताने मांडलेला विचार आवडला. हे आपले म्हणणे पूर्णपणे योग्य.
वरील ओळीतून अनुभवांचा,शब्दांचा, काय अर्थ लागतो ते व्यक्तीसापेक्ष असेल. हेही तितकेच खरे.
परंतु, काव्याची समीक्षा ही व्यक्तिसापेक्ष असू नये. त्याने काव्याची सूक्ष्मता आणि व्यापकता मारली जाते असे मला वाटते.
धन्यवाद.

गझल लेख चन्गला आहे. त्या २ ओळिबद्द्लचा विचार पोसिटिव आहे. ओळिन्चा अर्थ कसा घ्ययचा ते आप्ल्या मनोव्रुतिन्वर अवलम्बुन आहे. पण पोसिटिव अप्प्रोच थेउन ओळिन्चा अर्थ समजौन सन्गितल्यबद्दल अजय जोशि यान्चे धन्यवाद.
के.सुवर्णा

अरे वा!
अनेक लोकांना या ओळी आवडतात याचा आनंद झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही या दोन ओळींचा विशेष उल्लेख केला आहे. (हे पूर्वी वाचले होते. पण आत्ता अपघातानेच मिळाले. संपादन सुविधा विभागात टंकलेखन साहाय्य यावर क्लिक केले असता एकदम हेच पत्र उघडले.)

धन्यवाद के. सुवर्णा
आपल्याला या ओळी आवडल्या यापेक्षा या ओळींकडे 'पॉझिटीव्ह' (सकारात्मक) दृष्टीने पाहिल्याबद्दल धन्यवाद. अन्यथा अर्थ काढावे तेवढे निघतील.

या दोन ओळी आकर्षक आहेत, त्यात एक प्रकारचा गर्वाकडे झुकणारा स्वाभिमान आहे,
शिवाय रंग माझा वेगळा या चांगल्या गझलेचा हा शेवटचा शेर आहे.
(या गझलेचं गीत झाल्यामुळे शेराला क्लाय्मॅक्सचं स्वरूप आलं आहे हेही नमूद करणं आवश्यक आहे.)

पण तरी असं वाटतं की कवी काहीतरी लिहून जातो आणि वाचक त्याचे असंख्य अर्थ काढतात...
(जे ब-याचदा कवीलाही सुचलेले नसतात) आणि जर कवी श्रेष्ठ असेल तर मग त्याच्या एकेका ओळीवर लोक ग्रंथही लिहितात. यात चूक-बरोबर वगैरे काही नसते. उदाहरणच द्यायचे झाले तर अगदी भगवतगीतेपासून ते तुकाराम गाथेपर्यन्त अनेक कवितांचे देता येईल.

ऋत्विक,
त्यात एक प्रकारचा गर्वाकडे झुकणारा स्वाभिमान आहे..
हे विधान नेमके कशामुळे? संत तुकाराम म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा || आता यालाही तुम्ही तसेच म्हणणार का?
(या गझलेचं गीत झाल्यामुळे शेराला क्लाय्मॅक्सचं स्वरूप आलं आहे हेही नमूद करणं आवश्यक आहे.)
क्लायमॅक्स वगैरेचा विचार करून मी हा लेख लिहिलेला नाही. चार लोकं म्हणतात म्हणूनही मी लिहिले नाही.
जर कवी श्रेष्ठ असेल तर मग त्याच्या एकेका ओळीवर लोक ग्रंथही लिहितात.
हे मलाही मान्य आहे. मला कोणाला मोठे वगैरे करायचे नाही. या ओळींचा मी सकारात्मक अर्थ लिहिला एवढेच. अन्यथा, इतर अर्थ निघू शकतातच की!
मुळामध्ये एखाद्या कवीच्या आयुष्यात त्याला घायाळ करणार्‍या गोष्टींची मालिकाच असेल तर ते त्याच्या काव्यात दिसणे स्वाभाविक आहे. सुरेश भटांची ही गझल पहिल्यांदा मी वाचली तेंव्हा मला फारसे काही वाटले नव्हते. मात्र जसजसा माणसाबद्दलचा अभ्यास वाढत गेला तसे त्यातील एकेक धागे मी निरखित गेलो. ही गझल आता माझ्या मनाला हलविल्याशिवाय रहात नाही.

त्यात एक प्रकारचा गर्वाकडे झुकणारा स्वाभिमान आहे..
हे विधान नेमके कशामुळे?

अजयजी, मला काव्यातून जे जाणवले ते मी लिहिले..
काव्याची समीक्षा ही कवीसापेक्ष असू नये. त्याने काव्याची सूक्ष्मता आणि व्यापकता मारली जाते असे मला वाटते.
मला सुरेश भटांच्या जीवनाबद्दल फारशी काही माहिती नाही, क्षमस्व!

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा ||
ही तुकारामांची ओळ कुठल्या संदर्भातली आहे हे मला माहित नाही (पुन्हा एकदा क्षमस्व!)
त्यामुळे मी काय म्हणणार? पण वरवर ही ओळ जराशी उपरोधात्मक वाटते आहे.

क्लायमॅक्स वगैरेचा विचार करून मी हा लेख लिहिलेला नाही.
आपण आपल्या लेखात दिल्याप्रमाणे अनेक लोकांना या ओळी माहित असतात आणि आवडतात; मी त्याबद्दल म्हटले होते.

मागतो आहे स्वतःला किरण माझा कोवळा
ह्या ओळी फारच कोमट आहेत.

मात्र जसजसा माणसाबद्दलचा अभ्यास वाढत गेला तसे त्यातील एकेक धागे मी निरखित गेलो.
इथे जोशींना कुठल्याही एका व्यक्तीबद्दल व्यक्तव्य करायचे नसावे, असे वाटते.

सुरेशभट.इन ह्या व्यासपीठावर चांगल्या चर्चा व्हाव्यात. पण ह्या व्यासपीठाचा मतप्रदर्शनवजा गोंधळ किंवा गोंधळवजा मतप्रदर्शन किंवा थोडक्यात पिंका टाकण्यासाठी उपयोग होऊ नये, ह्याची सगळ्यांनी जबाबदारी घ्यावी.

ह्या संकेतस्थळाला बऱ्यापैकी वाचकवर्ग आहे. त्यामुळे मराठी गझलेच्या सध्याच्या स्थितीबद्दल चांगला मेसेज जावा, एवढेच वाटते.

चित्तरंजन,

केवळ, आपण माझ्या ओळीपासून आपल्या प्रतिसादाला सुरुवात केलीत म्हणूनः

वास्तवः

१. चर्चा चांगल्या व्हाव्यात - अर्थातच सहमत!

२. पिंका टाकण्यासाठी वापर होऊ नये - अर्थातच सहमत! माझ्या प्रतिसादांत तसे झाले नाही असे मी समजतो. तसे झाले आहे असे वाटत असल्यास जरूर नोंदवावेत. इतरांच्या म्हणण्यात काही झाले असले तर माहीत नाही.

३. मराठी गझलेच्या सध्याच्या स्थितीबद्दल चांगला मेसेज जावा - सहमत!

विनोदाचा भागः

कोमट ओळी हे नवीन विशेषण समजले. धन्यवाद! मी ओळ रचताना तिच्या तापमानाचा विचार करत नाही. 'सुचते' ते लिहितो.

चित्तरंजन,
मात्र जसजसा माणसाबद्दलचा अभ्यास वाढत गेला तसे त्यातील एकेक धागे मी निरखित गेलो.
*इथे जोशींना कुठल्याही एका व्यक्तीबद्दल व्यक्तव्य करायचे नसावे, असे वाटते.
आपले म्हणणे खरे आहे.

*ह्या संकेतस्थळाला बऱ्यापैकी वाचकवर्ग आहे. त्यामुळे मराठी गझलेच्या सध्याच्या स्थितीबद्दल चांगला मेसेज जावा, एवढेच वाटते.
नक्कीच. संकेतस्थळापेक्षाही मराठी गझलेबद्दल चांगला मेसेज जावा असे मलाही वाटते. ते मी प्रकाशनाच्या दिवशी बोललो होतोच.

खुपच अभ्यासपुर्ण लेख आहे.