कवितेचा प्रवास - ४




माझी सर्वात मोठी अडचण ही आहे की, मी आता शरीराने थकलो आहे. प्रपंचाच्या जीवनसंघर्षात माझ्या बहुतेक जीवनशक्ती आणि वेळ निघून जातो. मानसिक व शारीरिक दृष्टीने थकलेला माणूस लिहून लिहून किती लिहिणार? मानसिक थकवा म्हणजे मेंदूचा शीण !  मी स्वतःला कोंडून घेऊन "साहेब घरी नाहीत" किंवा "साहेब झोपलेले आहेत" असे खोटे सांगून लोकांना टाळूच शकत नाहीत. मला फुरसतच मिळत नाही. दमच मिळत नाही ! ही ना ती बला कोसळतेच. तर असो.
येणारा दिवस मला हेटाळत हसणारच !
जाणारा दिवस मला जाताना डसणारच !
गेली काही वर्षे मी काव्यगायनाचे जाहीर कार्यक्रम बंद केले होते. कारणे-- कौटुंबिक आपत्ती व प्रकृती फार लवकर थकून जाते.
"सुरेश भट कवितेचा व्यापार करतात!"  असाही प्रचार दरम्यान सुरू झाला होता. पण कॉलेजात मुलांना न शिकवता, त्यांचा कोर्सही पुरा न करता, कॉलेजला सतत चाटा मारून हरामाचा पगार घेणे, हा कोणत्या प्रकारचा "व्यापार" झाला?
मी पैसे घेऊन जरूर कार्यक्रम केले. पण विनामूल्य किती कार्यक्रम दिले, ह्याचा काही हिशेब? ह्या वेळी मला माझीच कविता आठवीत आहे--



असते ज्यांचे हृदय बॅंकेत सुरक्षित
इन्क्रिमेंट आणि प्रमोशन
वांझेच्या विटाळासारखे निश्चित
त्यांना सर्वच माहीत असते
-- कविताही !


पूर्वी मी काय लिहिले हे मी जाणतो. सध्या मी काय लिहीत आहे हे मला व सर्वांनाच माहीत आहे.


पूर्वी माझ्या कवितेत हटकून पांडुरंग, इंद्रायणी वगैरे असायची. हल्ली तो प्रकार नाही. मी लिहिण्यासाठी सध्या देवाचा व अध्यात्माचा "आधार" घेत नाही. मला ही जिवंत माणसेच पुरीशी आहेत-- ह्या जिवंत माणसांचा विचार करणारे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरेसे आहेत. मला जिवंत माणसांचा विचार लिहावयास लावतो. ज्या गोष्टींमुळे मानवी जीवन अधिक सुंदर व निकोप होते, त्या गोष्टींचा मी विचार करतो आणि मानवी जीवनाला विद्रूप करणाऱ्या गोष्टींचाही मी सडकून विरोध करतो. कवीने माणसांच्या जीवनाचा, त्यांच्या सुखदुःखांचा, त्यांच्या स्वप्नांचा विचार केलाच पाहिजे. नाही तर कवी कवीच नसतो ! मग ते एक शब्दांचे थोतांड असते !
आणि जो सत्य व न्यायाच्या शोधात असतो, त्याला कोणत्याही कंपूजी गरज नसते ! एरवी फक्त स्वतःवर प्रेम करणारे कवी वेगवेगळ्या महामानवांच्या पाट्या आपापल्या दुकानावर लटकवतातच !
परिवर्तन व गतिशीलता हा जीवनाचा नियम आहे. जो परिवर्तनशील व गतिशील नाही, तो माणूस मुडदाच असतो. म्हणूनच मी जो काही वर्षांपूर्वी होतो तो आज नाही. फक्त सामान्य माणसांवरील प्रेम हाच माझा स्थायीभाव आहे.
आता आठवत आहे... १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमरशेख ह्यांनी माझे मराठी मायबोलीवर लिहिलेले "गीत तुझे मी आई गाइन" हे गीत सतत गायिले. सारा महाराष्ट्र ह्या गीताने जागवला आणि रडवला. ते गीत मी १९५० साली लिहिले. त्याच काळात मी लिहिले--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी !
एवढ्या जगात माय मानतो मराठी !
एक कवी म्हणून आणि एक माणूस म्हणून मी भरपूर चुकलेलो आहे. पण मी यथाशक्ती माझ्या चुका सुधारत माझी वाटचाल करीत आहे. माझ्या अपूर्णतेची मला पूर्ण जाणीव आहे.
मला हे कळून चुकलेले आहे की, "सत्य व न्याय" ह्या दोन गोष्टींची जो दखल घेत नाही, तो माणूसच नसतो. कवित्वाची तर गोष्टच सोडा ! जात व धर्म यांच्या आधारावर कोणत्याही तथाकथित कवीला महान होता येत नसते. ज्याला द्वेषाचा द्वेष करता येत नाही, त्याने स्वतःला कवी म्हणवून घेऊ नये.


खरोखरच अविश्वसनीय वाटेल; पण मी कुणाचाही मत्सर करीत नाही. मात्र कधीकधी मला चीड व संताप येतो. पण मला चीड येण्याचाही हक्क असू नये काय?
मंगेशकर परिवाराने माझी गाणी गायिली म्हणून मी "प्रसिद्ध" झालो, असेही म्हटले जाते. खरे तर त्यांचेशी माझे केवळ व्यक्तिगत व कौटुंबिक स्वरूपाचे संबंध आहेत. मी इतरांसारखा "करिअरबाज" असतो , तर दरवर्षी कोणत्या ना कोणत्या मराठी चित्रपटात मंगेशकरांच्या मार्फत माझी गाणी वाजली नसती काय? वस्तुस्थिती अशी आहे की, मी श्री. हृदयनाथ मंगेशकर ह्यांना नेहमीच इतरांच्या गाण्यांची जोर देऊन शिफारस केलेली आहे. कुणी त्यांना जाऊन सरळ विचारत का नाही?
जाऊ द्या.


मी महाराष्ट्रात गझलीमुळे ओळखला जातो. अधिक उहापोह न करता मी फक्त एवढेच सांगतो की, कुणी कितीही व कसाही विरोध केला, तरी मराठी गझल अटळ आहे. ती एक वस्तुस्थिती आहे. खडे टाकून समुद्राच्या लाटा थोपवता येत नसतात.
गेली काही वर्षे माझे काव्यलेखन जवळपास बंदच आहे. मनात कविता आहे. पण ती कारंजासारखी उसळून वर येत नाही, फक्त ठिबकत राहते. पूर्वीही माझे अनेकदा असे झालेले आहे. बराच काळ थांबल्यानंतर मी धो धो वाहू लागतो. संपादकांची पत्र आली म्हणून मी वाईट किंवा कमअस्सल लिहूच शकत नाही. माझ्याजवळ कवितांचा कारखाना नाही. ज्याला कवी म्हणू आपली स्वतःची  आणि मराठी भाषेची इज्जत राखायची असेल, त्याने कधीही "मागणी तसा पुरवठा" हे धोरण स्वीकारू नये. वर्षात फक्त ३-४ कविता झाल्या तरी चालतील, पण त्या १०० नंबरी सोनेच असाव्यात. जो कवी आपल्या कविता छापणाऱ्या दिवाळी अंकांच्या संख्येवरून आपला मोठेपणा ठरवतो, त्याच्यासारखा बेवकूफ इसम दुसरा नाही !
"सौ सुनार की और इक लुहार की !" असे लिहिणाराचे लिहिणे असावे !
एरवी दिवाळी अंकातील किती कविता पुढच्या दिवाळीपर्यंत वाचकांच्या मनात शिल्लक राहतात?


माझ्याजवळ भरपूर कविता आहेत, गझली आहेत. पण त्या माझ्या मनात आहेत. लिहिण्यासाठी आयुष्य उसंतच मिळू देत नाही. ज्याला "रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग" असतो, तो कितीसे लिहू शकणार?
पण ज्यांना भौतिक संघर्ष करावा लागत नाही आणि घरातला गॅस संपून जाणे हेच ज्यांच्यासाठी "राष्ट्रीय संकट" असते, जे आपल्या घरट्यातच विसावलेले असतात, ज्यांना भरपूर वेळ असतो ते लोक चांगले कां बरे लिहीत नाहीत?
याचे उत्तर आहे-- आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार? जे मुळातच खोटे, त्यांची कविता खरी कशी असणार?
जसा "कवी", तशी त्याची कविता ! कविता कुंथून कुंथून लिहिता येत नाही. मला अजून खूप लिहावेसे वाटते. पण काय करू?
दूर जायाचे कितीदा घाटले होते,
पाय रस्त्यानेच माझे छाटले होते !
माझे गेलेले आयुष्य मला परत मिळणार नाही. जमले तसे जगलो. जमले तसे लिहिले! यापुढे किती लिहीन हे मी कसे सांगू? आपले आयुष्य किती शिल्लक आहे, हे कुणीतरी ठामपणे सांगू शकेल काय?
पण माझ्या वाट्याला जे काही दुःख आले, निराशा आली आणि वंचना आली, ती माझ्यानंतरच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये!  थोडेबहुत शहाणपण शिकण्यासाठी मला इतकी वर्षे लागली.  माझ्यानंतरच्या पिढ्यांनी इतकी वर्षे गमावू नयेत. पुढच्यास ठोकर, मागचा शहाणा!