कवितेचा प्रवास -३

१९५५ पासून माझा 'ग्रहदशेचा फेरा' सुरू झाला. ह्या काळात मी माझा स्वतःचा खर्च भागविण्यासाठी नाना तऱ्हा केल्या. त्यांचे वर्णन कशाला करीत बसू? काही जिज्ञासू पत्रकारांनी मला चुकून विचारलेच तर मी एवढेच उत्तर देईन, "जसे आज तुम्ही आहात ना, अगदी तसाच मी तेव्हा होतो. पण मी स्वतःच्या पैशाने दारू प्यायचो आणि माझे मराठी शुद्धलेखन बऱ्यापैकी होते. शिवाय, मी भरपूर वाचन करीत असे."

हे असे असले, तरी त्याच काळात मला गझलीचा चेहरामोहरा दिसू लागला. मी जे काही लिहीत होतो, त्यापैकी काही रचना 'गझल' म्हणवून घ्यावयास पात्र होत्या. "तू गझल लिहितोस!" हे मला माझा दोस्त वली सिद्दीकीने प्रथम सांगितले.

काही माणसे झटक्यात प्रेमात पडतात. काही माणसे हळुहळू प्रेमात पडतात. पण मी गझल ह्या काव्यप्रकाराच्या प्रेमात पडलेलो आहे, हे मला बरीच वर्षे उमगलेलेच नव्हते. मला गझलीचे तपशील अ-मराठी मित्रांकडून नंतर कळले. माझ्यावर झालेल्या मुशायऱ्यांच्या संस्कारामुळे मी बहुतेक वेळा गझलीच्या कायद्याने लिहीत होतो. पण मला वलीने स्पष्ट शब्दात तिचे कायदे समजावून सांगितले.

पण कायदे व नियम ठाऊक झाले म्हणून गझल वश होत नसते. तसे असते तर व्याकरणाचा प्रत्येक पंडित आपापल्या भाषेतला महाकवी झाला असता.  तसे संस्कार असल्याशिवाय, तशी तबियत असल्याशिवाय कुणी खरी गझल लिहूच शकत नाहीत. फक्त नियम पाळून लिहिलेली गझल म्हणजे एक निर्जीव प्रेतच असते!
आता गझलीचा विषय तात्पुरता बाजूला ठेवून मी पुन्हा मूळ विषयाकडे वळतो.

१९५५ पासून मला फुलोर येऊ लागला. १९५६ साली मी माझे सुप्रसिद्ध गीत लिहिले--
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !
जेव्हा तू नाहशील
दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
मग सुटेल मंदमंद
वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल!
....
ह्याच काळात मी माझ्या अनेकानेक सुंदर कविता, गझली व गीते लिहिली. "मालवून टाक दीप!" हे गीत मी अगदी आरामात म्हणजे १९५९ पासून १९६२ पर्यंत लिहीत होतो. तीन वर्षे!
गार गार ह्या हवेत
घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग!

माझ्या आठवणीनुसार " उषःकाल होता होता-" हे माझे सुप्रसिद्ध गीत मी १९६४ साली लिहिले आणि ते सर्वात आधी अरविंद ढवळे, विजय अग्रवाल व रामदासभाई श्रॉफ ह्यांनी ऐकले. त्या गाण्याचा "आणीबाणी"शी काही संबंध नाही!

यंदाच्या मराठी चित्रपट महोत्सवात प्रथम पुरस्कार मिळवणारे "केव्हातरी पहाटे-" मी ५ ऑक्टोबर १९७९ साली लिहिले.
त्यातील सर्वात सुंदर शेर चित्रपटात येऊ शकला नाही--
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली!
श्रीमती आशा भोसले ह्यांनी गायिलेली "मी मज हरपुन बसले ग" ही गौळण मी ४ जानेवारी १९६२ साली लिहिली.

श्री. दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेले व श्रीमती सुमन कल्याणपूर ह्यांनी गायिलेले "चल ऊठ रे मुकुंदा!" हे गीत मी ६ मे १९६२ साली लिहिले. पण तारखेची खात्री नाही.
"मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे !" हे गाणे मी १५ ऑगस्ट १९६० रोजी लिहून पूर्ण केले. हे मल्मली तारुण्य तारुण्यात यायला बरोबर दोन वर्षे लागली!
आणि माझी सुप्रसिद्ध रचना "मेंदीच्या पानावर-" मी ५ जून १९६० रोजी पूर्ण केली.
बरोबर ११ वर्षांनी १९७१ साली श्री. हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी हे गीत स्वरबद्ध केले.
माझ्या सर्वच गोष्टींना फार उशीर झाला. तेही एका परीने फार बरेच झाले. नाही तर मी कामातूनच गेलो असतो. माझा स्वतःविषयी गैरसमज झाला असता आणि मी "करिअरबाज" झालो असतो. काही काळ माझा गाजावाजा झाला  असता आणि मग मी बेपत्ता झालो असतो. मी अजून वाट पाहायला तयार आहे. मी मरून गेल्यावरही मी वाट पाहीन!
माझे कोणते पुस्तक असे लवकर निघाले? १९६१ साली "रूपगंधा" हा पहिला काव्यसंग्रह निघाला. १९७४ साली "रंग माझा वेगळा" हा काव्यसंग्रह निघाला. नंतर १० वर्षांनी १९८४ साली "एल्गार" निघाला! कदाचित १९९१ साली माझा चौथा काव्यसंग्रह प्रकाशित होईल. कदाचित!
"रंग माझा वेगळा"च्या ४ आवृत्ती निघालेल्या आहेत. पुढील वर्षे ५ वी आवृत्ती निघेल. एल्गारची दुसरी आवृत्ती संपलेली आहे. तिसरी आवृत्ती पुढील वर्षी निघेल!

 माझे भाग्य थोर म्हणून "रंग माझा वेगळा"ला श्रीमती लता मंगेशकर आणि पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना मिळाली. ह्या बाबतीत मी त्या दोघांचाही कृतज्ञ आहे.
पण त्या दोघांच्याही प्रस्तावनेमुळे "रंग माझा वेगळा"हे  पुस्तक खपले, असेही म्हणणारे काही खवट लोक आहेतच.
मग "एल्गार"ची प्रस्तावना मी स्वतःच लिहिलेली आहे. तरीही ते पुस्तक काउण्टरवर कसे खपले?
मी एका बाबतीत अत्यंत भाग्यवान कवी आहे. ती बाब म्हणजे विद्यापीठे व ग्रंथालये ह्यांनी माझे काव्यसंग्रह स्वीकृत केले, तरी माझी बहुसंख्य पुस्तके काउण्टरवरच खपतात! आणि ह्याबद्दल मी मराठी जनतेचा ऋणी आहे.

"रंग माझा वेगळा" आणि "एल्गार" ह्या माझ्या काव्यसंग्रहाच्या बाबतीत मी येथे काही विशेष लिहिणार नाही. कारण लोक आजही ती पुस्तके वाचत आहेत. ही पुस्तके बाजारात मिळत नाहीत. पण त्यांची सतत मागणी होत आहे. मला नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील एका गावाहून पत्र पाठवून एका रसिकाने "एल्गार"ची मागणी केली. पत्ता एका हेअर कटिंग सलूनचा दिला होता!

मला आम मराठी माणसांनी आपला म्हटलेले आहे. मी उरलेल्यांची कशाला पर्वा करू? ज्याला जनता उराशी लावते, त्याला समीक्षकांच्या औषधाची किंवा दूध पावडरीची गरज नसते! ज्याच्यात भरपूर मार खाण्याची शक्ती असते, तोच सडकून मार देऊन शेवटी जिंकतो. मी वर्षानुवर्षे उपेक्षा, निंदानालस्ती व मानवी क्षुद्रपणाचा भरपूर मार खात आलेलो आहे. अजून ४ वर्षे मी कुठे दिसलो नाही म्हणून माझे डोळे पांढरे होणार नाहीत. तो कमजोर लोकांचा हिशोब असतो.

ज्या समाजात मी जन्मलो, त्याचा विचार केला तर भौतिकदृष्ट्या माझी मते मला परवडत नाहीत. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे एक यातनाच असते. पण जे हृदयाला पटते, त्याविरुद्ध वागणे म्हणजे त्याहून मोठी यातना असते. मी पहिली यातना निवडली !