कवितेचा प्रवास -५
एखाद्या प्रेषिताचा आव न आणता मी अगदी प्रेमपूर्वक नव्या कवींना सांगू इच्छितो की, प्रसिद्धी म्हणजे महानता नव्हे. सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते, ज्याच्या काव्यपंक्ती जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. तो कवी आपोआप अगदी सहज महान बनतो. येथे पदव्या, नोकऱ्या, अधिकारपदे, समीक्षा, सत्कार, दूरदर्शन, चित्रपट यांचा काहीही उपयोग नसतो.
जर तुमच्याजवळ जीवनाचे सत्य असेल आणि जर तुम्ही शब्दांपेक्षा सत्याला महत्त्व देत असाल, तर शब्द तुमच्याजवळ हात जोडून धावत येतील.
हा पहा लागला अर्थ बोलावया
शब्द येतील; त्यांना पुकारू नये
माझे असे होते की, मी बरेच दिवस लिहीत नाही. अगदी अजगरासारखा पडून राहतो आणि मग अचानक माझी अशी स्थिती होते--
मौन आताच मी सोडले
शब्द पाया पडू लागले
मला स्वतः कुणालाही दुखवायचे नाही. पण मी माझ्या आयुष्याचा आढावा घेतल्यावर असे वाटू लागले आहे की, जेथे एका संपूर्ण पिढीच्या आयुष्याचा, भवितव्याचा सवाल आहे, तेथे मी स्पष्ट व कठोर बोललेच पाहिजे.
- मी उद्याच्या कवींना व लेखकांना सांगू इच्छितो की, जर तुमचे आपल्या मराठी भाषेवर खरोखरच प्रेम असेल तर--
मराठी भाषा कशी लिहू नये व बोलू नये, हे तुमच्या मराठीच्या प्राध्यापकांकडून शिका. त्यांच्यावर नीट नजर ठेवा.
तुम्ही जिवंत मराठी भाषा शिका, मराठी इंग्रजी लिहू व बोलू नका. सामान्य माणूस हाच तुमचा सर्वश्रेष्ठ शिक्षक. शब्द जपून वापरा. प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी समजून घ्या. - तुमच्या घरात येणाऱ्या रद्दीवाल्याइतके सुद्धा तुम्ही तथाकथित समीक्षकांना महत्त्व देऊ नका. त्यांना वाटेल ते लिहू द्या. तुम्ही ज्यांच्यासाठी लिहिता, ती मराठी जनता "समीक्षा" वगैरे वाचत नसते. मराठी समीक्षा कधीही प्रामाणिक नव्हती व नाही. समीक्षक कवीला मोठे बनवीत नसतात, तर त्याला सामान्य लोक मोठे बनवतात. तुमची पुस्तके समीक्षक विकत घेणार आहेत काय?
- नेहमी सोपं, स्पष्ट, सरळ व खरे लिहा! म्हणजे आम जनता तुम्हाला आपल्यापैकी समजेल.
- स्वतःवर प्रेम करू नका. ते कवीचे लक्ष्य नाही. आपण लोकांहून महत्त्वाचे नाही!
-- हे नियम न पाळणारे "कवी" एका विशिष्ट कालखंडाचे कवी ठरतात. नंतर त्यांचा मागमूसही राहत नाही! मी असे कितीतरी "कवी" पाहिलेले आहेत. युक्त्या-प्रयुक्त्यांनी काही काळापुरती प्रसिद्धी मिळते, पण अशाने कवितेची सिद्धी मिळत नसते.
हे एवढे लिहिल्यानंतर आता माझ्या नावाने कोण किती शिमगा करणार आहे, याची मला पर्वा नाही. मी माझा विचार करीत नाही. त्याची गरज नाही. मी खरोखरच मराठी भाषेत लिहिणाऱ्या तरुण पिढीचा विचार करीत आहे. तिने झगमगाटाने दिपून जाऊ नये. सत्याशी इमान राखावे. सत्य महत्त्वाचे! न्याय महत्त्वाचा! शब्द तर टरफले असतात!
आणि मीही काही निवृत्तीच्या- वैराग्याच्या गोष्टी करीत नाही. माझे जीवनावर प्रेम आहे. म्हणून हे जग माणसांनी राहण्याच्या लायकीचे बनावे अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच मला सतत वाईटपणा पदरी घ्यावा लागतो.
मी स्वतःला हुतात्मा वगैरे समजत नाही. पण मला इतरांप्रमाणे महत्त्वाची "साहित्यिक" माणसे सांभाळता येत नाहीत, हे मात्र खरे. माझ्या चुकांवर मी पांघरूण घालत नाही. पण तो भूतकाळ झाला. आता उरलेल्या आयुष्यात त्या चुका दुरुस्त करून जगायची व लिहायची माझी खटपट सुरू आहे.
माझ्या कवितेचा प्रवास सुरूच आहे. कविता व माणूस यांचा वेगवेगळा विचार करता येत नसतो. म्हणून मी एवढेच म्हणेन--
दूर आलो एवढा की थांबल्या मागे दिशा
माझिया संगे उद्याची चालती संवत्सरे !
--सुरेश भट
(लोकमत दिवाळी अंक १९९०)