...स्मरशील तू !

...............................................
...स्मरशील तू !
...............................................
काठावरी गमजा किती करशील तू ?
बुडशील तू; तेव्हाच ना तरशील तू ?

कोठून तारे-तारका आणायच्या...?
माझ्यापुढे आकाश अंथरशील तू !

सलते कुठे निरखून घे आधी जरा...
भलतीकडे नुसतेच टोकरशील तू !

पाण्याप्रमाणे वाहती दुःखे तुझी...
डोळे स्वतःसाठी किती भरशील तू ?

हाती तुझ्या आले न काही शेवटी...
माझा कशाला हात मग धरशील तू ?

माझ्याविना आहे तुला कुठली दिशा ?
माझ्यासवे, माझ्यात वावरशील तू !

चिंधी मला शापून गेली फाटकी...
आयुष्यभर वाराच पांघरशील तू !

जन्मून कायेचा मिळाला फायदा...
पण शेवटी छायेविना मरशील तू !

जाशील मज विसरून तू, हेही खरे...
...हेही खरे, मज सारखी स्मरशील तू !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

सलते कुठे निरखून घे आधी जरा...
भलतीकडे नुसतेच टोकरशील तू !

माझ्याविना आहे तुला कुठली दिशा ?
माझ्यासवे, माझ्यात वावरशील तू !

जन्मून कायेचा मिळाला फायदा...
पण शेवटी छायेविना मरशील तू !

जाशील मज विसरून तू, हेही खरे...
...हेही खरे, मज सारखी स्मरशील तू !

सुरेख! एकापेक्षा एक सरस! अप्रतिम गझल!

क्रांतीशी सहमत आहेच. टोकरशील, वावरशील त्यातही फारच आवडले.

जाशील मज विसरून तू, हेही खरे...
...हेही खरे, मज सारखी स्मरशील तू

हा शेर फारच सुरेख! विसरण्याचे दोन्ही पैलू आले आहेत. फार फार आवडला.

मस्त! गझल खूप आवडली. चित्तंशी सहमत आहे.

दिलखुलास प्रतिसाद देणाऱया सगळयांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

पाण्याप्रमाणे वाहती दुःखे तुझी...
डोळे स्वतःसाठी किती भरशील तू ?
हा शेर आवडला.
तरी... ? ऐवजी ! असते तर.....
डोळे स्वतःसाठी किती भरशील तू !

सलते कुठे निरखून घे आधी जरा...
भलतीकडे नुसतेच टोकरशील तू !
हा ही....

तसे नुसतेच "शील तू" असेही काही बसले असते.

वा वा मस्तच गझल.
माझ्याविना आहे तुला कुठली दिशा ?
माझ्यासवे, माझ्यात वावरशील तू !
मस्तच!