शेवटी महत्वाचे

महत्वाचे-

१. झल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा.


२. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे, हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते.


३. बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात. पण गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीनुसार ठरत नसते- आणि ते समीक्षकांच्या सोयीनुसार नव्हेच नव्हे!


४. मराठी गझलेसाठी आवश्यक असलेली प्रतिमा, रूपके आणि संकेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत. मराठी गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे.


५. यमक, अन्त्ययमक आणि वृत्तांचे बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद  असावा. फालतू शब्दांना जागा नसावी. अनावश्यक शब्दांनी वृत्ताची मात्रापूर्ती करू नये.


६. शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा. सोपेपणा हे यशस्वी शेराचे रहस्य होय.


७. शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे. शेर म्हणून परस्परांशी संबंध नसलेल्या दोन सुंदर ओळी एकत्र लिहिल्या म्हणजे शेर होत नाही. शेरात जे सांगायचे आहे, त्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत असते, तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा प्रभावी समारोप असतो.


८. गझलेमधील शेर विरोधाभासावरच (PARADOX) आधारित असतात, ही समजूत पार चुकीची आहे. स्थलाभावी नमुन्यादाखल माझा एकच शेर येथे उद्धृत करतो-
उरली विरंगुळ्याला ही सांजवेळ माझी
उरल्या तुझ्या जराश्या प्राणात हालचाली


९. शेर लिहितांना शेवटच्या शब्दातील शेवटचे अक्षर लघू असल्यास ते कधीही गुरू करू नये.
शेराच्या ओळीतील शेवटी असलेले लघू अक्षर गुरू करण्याची एक अत्यंत वाईट सवय खोड मराठीतील बऱ्याच कवींना फार वर्षांपासून लागलेली आहे. उदाहरणार्थ-
ही वाट हुंदक्याची थकली अता रडून s s s
रहदारि गच्च आहे देवा तुझ्यापुढून s s s
एकवार 'रहदारि' मधील ऱ्हस्व "रि" समजून घेता येईल. पण ओळ संपतांना हा 'न s s s s s' कशासाठी?
म्हणून निदान तरूण पिढीने तरी ही चूक करू नये. व्याकरणाची बाब बाजूला ठेवली तर शेवटच्या लघू अक्षराला ओढूनताणून गुरू केल्यावर ओळीतील प्रसाद व माधुर्य कमी होते, हाही मुद्दा लक्षात घ्यावा.


१०. गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. ज्याचा आपल्या मातृभाषेवर संपूर्ण ताबा आहे. त्याला कोणताही विषय किंवा कोणतीही भावना शिवीगाळ न करता तेवढ्याच प्रभावीपणे शेरातून व्यक्त करता येते. क्वचित प्रसंगी अगदी अपरिहार्य झाल्यास एखादा असा शब्द त्या शेराच्या अभिव्यक्तीत चपखलपणे बसत असल्यास उपयोगात आणायला हरकत नाही. पण तसा शब्द अपरिहार्य असावा. 


महाराष्ट्रातील तरुण पिढी ह्या माहितीचे सार्थक करील आणि महाराष्ट्रात यापुढे अधिकाधिक उत्कृष्ट व निर्दोष मराठी गझला लिहिल्या जातील, अशी मी आशा बाळगतो
जरी ह्या वर्तमानाला, कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही


-सुरेश भट