स्वरचिन्ह उर्फ अलामत

स्वरचिन्ह उर्फ अलामत


गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची "जमीन" निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात. पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. उदाहरणार्थ- वाटचाल, मशाल, दलाल, निकाल, रुमाल, हालचाल वगैरे.मात्र गझलेतील अन्त्ययमक उर्फ रदीफ म्हणून असलेला शब्द किंवा शब्दगट शेवटपर्यंत बदलत नाही.


नमुन्यादाखल दिलेल्या शेरात "मला" हे अन्त्ययमक उर्फ रदीफ आहे. हे अन्त्ययमक, ही रदीफ पहिल्या ओळीत येणार आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीत यमकांनंतर म्हणजेच काफियानंतर हटकून येणार. उदाहरणार्थ - वाटचाल मला, मशाल मला, दलाल मला, आणि शाल मला वगैरे.


ज्याप्रमाणे गझलेच्या पहिल्या शेरात (मतला) तिचा आकृतिबंध उर्फ "जमीन" वृत्त, यमक व अन्त्ययमकावरून ठरत असते, त्याचप्रमाणे ज्या जमिनीत अंगभूत असलेल्या यमकाचे उर्फ काफियाचे स्वरूप त्यातील स्वरचिन्हावरून ठरत असते. या स्वरचिन्हालाच "अलामत" म्हणतात. म्हणूनच ही "अलामत" समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.


यमकाच्या उर्फ काफियाच्या शेवटच्या न बदलणाऱ्या एका अक्षराआधी किंवा एकाहून अधिक अक्षरांआधी येणाऱ्या एका विशिष्ट अक्षरात जो न बदलणारा स्वर असतो, त्यालाच स्वरचिन्ह किंवा "अलामत" समजावे.
उदाहरणार्थ-
हा ठोकरून गेला, तो वापरून गेला
जो भेटला मला तो वांधा करून गेला

वरील शेरात "ठोकरून, वापरून, करून" अशी यमके उर्फ काफिये (कवाफी) आलेले आहेत. (एकाच ओळीत दोन यमके चालू शकतात.) जर आपण यमकांचे बारकाईने निरीक्षण केले, तर आपणास असे आढळून येईल की "ठोकरून, वापरून, करून" या तिन्ही यमकात "रून" ही शेवटची दोन अक्षरे बदलत नाहीत. मात्र त्यांच्याआधी येणाऱ्या- "ठोकरून" मधील "" या अक्षरात 'वापरून' या यमकामधील "" या अक्षरात आणि पुन्हा "करून" या यमकातील '' या अक्षरात - हटकून "" हा स्वर आलेला आहे. क्वचित 'अ' च्या जागी ऱ्हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर वापरला जातो. परंतु तो अपवाद समजावा.


याच गझलेतील अजून एक शेर पहा.
आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा
माझाच भास माझ्या अंगावरून गेला
वरील शेरात यमक म्हणून "अंगावरून" हा शब्द आलेला आहे. या यमकात शेवटी "रून" ही दोन अक्षरे अटळपणे आलेली आहेत. परंतु त्याचवेळी "रून" या शेवटच्या दोन अक्षरांआधी असलेल्या 'व'  या अक्षरांतील 'अ' हा स्वर सांभाळला गेला आहे. म्हणजे "रून" ही शेवटची दोन अक्षरे कायम आणि त्याआधी येणाऱ्या "व" या अक्षरात "अ" ही अलामत कायम.

अलामतीची कल्पना देण्यासाठी मी याच गझलेतील अजून एक शेर येथे देतो-
कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"