काफिया आणि रदीफ

"काफिया" या अरबी शब्दाचा अर्थ आहे- मागेमागे चालणारा, पुन्हापुन्हा येणारा, पायाला पाय लावून चालणारा.
मी वरील व्याख्येवरून "काफिया" अधिक स्पष्ट दाखविण्याचा प्रयत्न करतो.
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
काय तो वेडा इथेही बोलला
हा शहाणाही चळाया लागला?
हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला
नमुन्यादाखल दिलेल्या माझ्या एका गझलेतील ह्या तिन्ही शेरात "मावळाया, ढळाया, चळाया, वळाया" हे चार शब्द काफिया म्हणून आलेले आहेत. 'मावळाया' ह्या शब्दामागून 'ढळाया' हा शब्द येतो. 'ढळाया'ची पाठ धरून 'चळाया' येतो आणि 'चळाया' नंतर लगेच 'वळाया' हा शब्द त्याच्यामागे येतो. 'ढळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या आधीच्या शब्दाचे अनुसरण केले आहे, तर नंतरच्या शेरात 'चळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' व 'ढळाया' ह्या शब्दांची पाठ सोडलेली नाही. आणि 'वळाया' हा काफियाचा शब्द "मावळाया, ढळाया, चळाया" ह्या आधीच्या (काफिया म्हणून आलेल्या) शब्दांशी नाते राखत आहे. "मावळाया" ह्या काफियाच्या शब्दाच्या मागेमागे, एकामागे एक, अशी एकमेकांचा पदर धरून ही इतर (काफियाच्या) शब्दांची माळ चालत आहे. काफिया हा शब्द पुल्लिंगी आहे. काफियांचे बहुवचन 'कवाफी' असे होते.


आता आपण रदीफ म्हणजे काय ते पाहू या. "रदीफ" ह्या अरबी भाषेतील स्त्रीलिंगी शब्दाचे दोन अर्थ आहेत ते असे-
१) घोडा किंवा उंटावर बसलेल्या स्वारामागे बसलेली व्यक्ती किंवा २) गझलेतील शेरात काफियाच्या (यमक) नंतर पुन्हापुन्हा येणारा शब्द किंवा शब्दगट.
गझलेच्या संदर्भात सांगायचे झाले, तर तिच्या प्रत्येक शेराच्या बाबतीत हे दोन्ही अर्थ अगदी चपखलपणे लागू होतात. कारण आपण जर काफिया (यमक) म्हणून येणाऱ्या कोणत्याही शब्दाला वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेला स्वार मानले तर रदीफ (अन्त्ययमक) म्हणून येणारा शब्द किंवा शब्दगट त्या स्वाराच्या मागे हटकून स्वार होतो, उदाहरणार्थ -
कालची बातमी खरी नाही
हाय, स्वर्गात भाकरी नाही
मागता काय लेखणी माझी
ही कुणाचीच बासरी नाही
राहिले काय पूर्णिमेत अता?
चंद्र माझ्या उशीवरी नाही
वरील तीन शेरात काफिया (यमक) म्हणून आलेले "खरी, भाकरी, बासरी व उशीवरी" हे शब्द "राधिका, राधिका, यमाचा गा"  ह्या वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेले स्वार आहेत. पण ह्या प्रत्येक स्वाराच्या मागे "रदीफ" म्हणून आलेला "नाही" हा शब्द हटकून  बसतोच!

इस्लामपूर्व काळापासून अरब जमात काव्यप्रेमी आहे. आणि ह्या जमातीच्या जीवनात घोडा आणि उंट ह्या दोन प्राण्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. अरबी भाषेनुसार "रदीफ" ह्या शब्दाचा अर्थ "घोड्यावर किंवा उंटावर बसलेल्या स्वाराच्या मागे बसलेली व्यक्ती" असा आहे. आणि म्हणूनच अरबांनी आपल्याला छंदशास्त्रातातही काफियानंतर हटकून व चिकटून मागोमाग येणाऱ्या शब्दाला किंवा शब्दगटाला "रदीफ" हेच नाव दिले. "रदीफ" या स्त्रीलिंगी अरबी शब्दाचे बहुवचन "रदाफी" असे आहे.