गझलेचा आकृतिबंध
आता गझलेचा आकृतिबंध म्हणजे काय हे समजून घेऊ या. कारण हा आकृतिबंध समजल्याशिवाय गझल लिहिता येत नाही.
गझलेचा आकृतिबंध
संबंधित गझलेचे वृत्त (बहर), यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (रदीफ) असल्यास अन्त्ययमक या घटकामुळे गझलेचा आकृतिबंध निश्चित होतो. या आकृतिबंधालाच "जमीन" असे म्हणतात.
ही न मंजूर वाटचाल मला
दे भविष्या तुझी मशाल मला
संत समजून काल मी गेलो
भेटला शेवटी दलाल मला
मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला
माझ्या या गझलेतील हे तीन शेर आपण वाचले. या तिन्ही शेरात (जातीच्या अंगाने आलेले) एकच वृत्त आहे.
राधिका, राधिका, यमाचा, गा
हेच वृत्त या गझलेत शेवटपर्यंत कायम राहते. या गझलेचा शेवटचा शेर असा आहे-
ये, लपेटून चांदणे घेऊ
तू कशाला दिलीस शाल मला?
वर निर्देशिलेले वृत्त "राधिका, राधिका, यमाचा, गा" या शेवटच्या शेरातही कायम आहे.
गझलेच्या पहिल्याच शेरात तिचा आकृतिबंध- तिची जमीन 'जमीन' स्पष्ट होते. कारण पहिल्या शेरात गझलेचे वृत्त, यमक आणि अन्त्ययमक स्पष्ट होते.
वर दिलेल्या उदाहरणात वृत्त (राधिका, राधिका, यमाचा, गा) स्पष्ट झाले आहे. आणि पहिल्या दोन ओळीत "वाटचाल" व "मशाल" ही दोन यमके आली आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही ओळीत "वाटचाल" आणि "मशाल" या यमकानंतर "मला" हे अन्त्ययमक आले आहे.
गझल शेवटपर्यंत एकाच वृत्तात चालत असली तरी तिच्या फक्त पहिल्या शेराच्या दोन्ही ओळीत यमक आणि अन्त्ययमक येते. नंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीतच यमक आणि त्यानंतर अन्त्ययमक येते.
गझलेतील अन्त्ययमक (रदीफ) गझल संपेपर्यंत बदलत नाही. काही गझलात अन्त्ययमक नसते. पण ज्या गझलेत अन्त्ययमक असते, त्या गझलेत ते अन्त्ययमक शेवटपर्यंत कायम राहते. एका शेरात एक अन्त्ययमक तर दुसऱ्या शेरात दुसरे अन्त्ययमक असा हास्यास्पद प्रकार गझल खपवून घेत नाही.
त्याचप्रमाणे आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, गझलेत यमक उर्फ काफिया बदलत नाही, त्याचे शब्द बदलतात. यमकाच्या शब्दात असलेली "अलामत" उर्फ "स्वरचिन्ह" हेच त्या यमकाचे स्थायी गमक असते. या अलामतीवरच त्या यमकाचे जीवन अवलंबून असते. हे स्वरचिन्ह (अलामत) सांभाळून यमक कसे साधावयाचे, हे मी येथे नंतर यथास्थल स्पष्ट करीन. त्यापूर्वी "काफिया" आणि "रदीफ" या शब्दांचे अधिक स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.