प्रस्तावना

आता महाराष्ट्रात गझल हा काव्यप्रकार आपल्या अंगभूत शक्तीमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. आता नव्या दमाची तरूण पिढी गझलेकडे वळू लागली आहे. परंतु दुर्दैवाने गझलेची पुरेशी किंवा मुळीच माहिती नसल्यामुळे कोणतीही रचना अनेकदा "गझल" म्हणून सादर केली जाते.

गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार असल्यामुळे गझल लिहिणारा आधी उत्तम कवी असला पाहिजे, ही गझलेची पूर्वअट आहे. आणि त्याबरोबरच गझल लिहिणाऱ्याला आधी वृत्तात कोणतीही चूक न करता लिहिता आले पाहिजे. गझलेमध्ये शेवटपर्यंत एकच वृत्त वापरले पाहिजे, हे गझल लिहू इच्छिणाऱ्या कवीने लक्षात ठेवले पाहिजे.

"गझल" हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मूळ अरबी शब्द "गजल" आहे. तोही स्त्रीलिंगी शब्द आहे. हा शब्द जसाच्या तसा फारसीत आला आहे तोही स्त्रीलिंगी म्हणूनच. आणि मराठीत "गजल" ह्या शब्दाला "गझल" हे रूप मिळाले. गझलेचा एकूणच पिंड, तिचा नखरा व नजाकत पाहाता तिचे लिंगपरिवर्तन करणे योग्य नव्हे.

एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.

गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो.  गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.

नेहमीची कविता सलग असते. तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.

जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते.

गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे! म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो.

नेहमीची कविता आणि गझल ह्यांत - १) अनेक कवितांची एकाच फॉर्ममध्ये बांधणी आणि मांडणी आणि २) प्रत्येक शेराचे स्वतःचे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व, हे दोन महत्वाचे व मूलभूत फरक असतात.