काळजी

जायचे असल्यास जा पण वेळ आहे आंधळी
सोबतीला गंध ने तू, घे, चुरड ही पाकळी

जीवघेण्या वादळाशी झुंजणे नव्हते नवे
बरसणार्‍या आसवांनी घेतला माझा बळी

पापणी मिटताच अजुनी वाटते दिसशील तू
अजुनही केवळ तुला ती वाट आहे मोकळी

दु:ख विरहाचे तुझ्या कोंडू नये मेघांतरी
शिंपल्यामधुनी पडावे दान माझ्या ओंजळी

चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी

काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी
यापुढे माझी तुझी  अन् काळजीही वेगळी

                                          

गझल: 

प्रतिसाद

काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी
यापुढे माझी तुझी  अन् काळजीही वेगळी
हा शेर अतिशय आवडला.

सुंदर  गझल  आहे. पुन्हा पुन्हा गुणगुणावी  अशी.
जीवघेण्या वादळाशी झुंजणे नव्हते नवे
बरसणार्‍या आसवांनी घेतला माझा बळी
सुरेख.
पापणी मिटताच अजुनी वाटते दिसशील तू
अजुनही केवळ तुला ती वाट आहे मोकळी
या शेरात  'केवळ' शब्द  'तुला' साठी  आहे  की  वाटेसाठी? मला  वाटते- आजही  तुला केवळ  ती  वाट  मोकळी  आहे  असा  भावार्थ  आहे. असे  असल्यास  दुसर्‍या  ओळीची  पुनर्रचना  करावी  लागेल.
चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी
मला  सर्वाधिक आवडलेला  शेर!
काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी
यापुढे माझी तुझी  अन् काळजीही वेगळी
यातही  पुन्हा  'अन' ची  जागा  चुकल्यासारखे  वाटते. माझी-तुझी  च्या  मध्ये  अन पाहिजे  होता. (अर्थाच्या  दृष्टीने. वृत्त निर्दोष  आहेच.)
धन्यवाद.

दु:ख आणि पापणी हे शेर आवडले! (पापणी आणि अन बद्दल ज्ञानेशशी सहमत)
सोबतीला गंध ने तू, घे, चुरड ही पाकळी; चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा; काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी ... हे सुटे मिसरेही फार सुंदर आहेत!!
 

गझल आवडली. खास शेर
दु:ख विरहाचे तुझ्या कोंडू नये मेघांतरी
शिंपल्यामधुनी पडावे दान माझ्या ओंजळीक्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

प्रत्येक शेर सुंदर..:)

- चक्रपाणि जीवन चिटणीस

सोनाली, ज्ञानेश, चक्रपाणि, शीतल, पुलस्ति, क्रांति
सर्वांना धन्यवाद...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी
छान! 

धन्यवाद चित्तजी...
 
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

पोकळी शेर खूप आवडला...
 

चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी

लक्षवेधी आहे, खासकरून पोकळी शब्द शेवटी येताना सगळा अर्थ घेऊन येतो :)