तू कशी जाशील...?

................................
तू कशी जाशील... ?
.................................


तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?


मी तुरुंगातील कैदी आठवांच्या...
मी कधी सुटणार अटकेतून माझ्या ?


फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या !


नीट घे निरखून, न्याहाळून आता...
तूच आढळशील प्रतिमेतून माझ्या !


मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !! 


त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या !


भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या !


चंद्र मज दिसला़; तरी दिसलाच नाही...!
भाकरी तू शोध उपमेतून माझ्या !


प्रेरणा होऊन ये माझ्या मनाची...
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या !


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?
मी तुरुंगातील कैदी आठवांच्या...
मी कधी सुटणार अटकेतून माझ्या ?
फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या !
नीट घे निरखून, न्याहाळून आता...
तूच आढळशील प्रतिमेतून माझ्या !
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !! 
त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या !
अ  फा ट

शेवटचे दोन शेर ही सुरेख आहेत. पण त्या आधीचे सगळे अफाट आहेत

प्रदीप,
भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या !
चंद्र मज दिसला़; तरी दिसलाच नाही...!
भाकरी तू शोध उपमेतून माझ्या !
प्रेरणा होऊन ये माझ्या मनाची...
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या !
- हे तीन प्रामुख्याने भावले.
सोनाली

मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !! 
शेर  आवडला.

तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !! 
वा वा, डोळेझाक ची कल्पना सुरेख

हे  शेर  फार फार  आवडले-
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !! 

 
त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या !

आणि  हा  शेर-
भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या... !
हेवा  वाटावा  अशी  पकड  आहे  तुमची  गझलेवर.
dhanyavaad!

ही रचना कविता जास्त वाटत आहे, गझल कमी.
सामान्य रचना!
 

खूपच सुंदर गझल आहे. आवडली. मोहक गझल!
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या...व्वा!

प्रतिसाद देणाऱया सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.
 

अजरामर आहे प्रदीप.
डोळेझाक लई झ्याक!

तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?             मस्त विचार.
दुस-या ओळीत ::  पण कशी जाशील कवितेतून माझ्या !  किंवा ?    --  हे कसे वाटते? त्यामुळे 'तू' ची पुनरावृत्ती टळते असे मला वाटते.


मी तुरुंगातील कैदी आठवांच्या...
मी कधी सुटणार अटकेतून माझ्या ?           हा ही मस्त विचार.
इथे 'मी' ची पुनरावृती आहे. पण ती टाळावी की नाही हे समजत नाहीये.

फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या !        चांगला विचार.

नीट घे निरखून, न्याहाळून आता...
तूच आढळशील प्रतिमेतून माझ्या !           उत्तमच.

मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!            अफलातून.. ग्रेट.

त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या !            चांगला विचार.

भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या !          चांगला विचार.
या ठिकाणी दुसरी ओळ वाचल्यानंतर जशी लक्षात येते तशी म्हणताना येईल कि नाही असे वाटते. कारण, सुटा असलेला 'न' बोलताना फारच वेगळा दाखवावा लागतोय.

चंद्र मज दिसला़; तरी दिसलाच नाही...!
भाकरी तू शोध उपमेतून माझ्या !             चांगला विचार.

प्रेरणा होऊन ये माझ्या मनाची...
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या !              मस्तच.
कलोअ चूभूद्याघ्या

मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!

नेहमीप्रमाणे दर्जेदार गझल!
जयन्ता५२

आपण लिहिता चांगले. पण, पुन्हा तेच ते वाचल्यासारखे वाटते.
चांगली -
(तसा मी फारसा बोलत नाही.)

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.

गझल आवडली.

मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!  बहोत बढिया

फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या ! ..वा
-मानस६