तुझे ठसे...
[ गंभीर समीक्षकांच्या विनंतीस मान देऊन.. !]
====================
पहा कधी ना कधी असेही घडेल काही..
नसेन मी, त्यामुळे तुझेही अडेल काही !
तुझे ठसे चेहर्यात माझ्या नकोस शोधू,
(मनात कोठेतरी तुला सापडेल काही !)
"कुठे असावा जुना जिव्हाळा?"कळेल ते ही,
तुला चांदणे बनून जेव्हा जडेल काही..
अढी जराशी, ललाटरेषा बनून गेली..
मला भिती- प्राक्तनास आता नडेल का ही?
सुखा, तुझे नेमके इरादे मला कळू दे..
नको विचारू- "व्यथा तुला आवडेल का ही?"
जुन्या स्मृतींनो, मनात माझ्या हळूच या रे
उठेल झोपेमधून आणि रडेल काही...
लिहून टाका खुशाल जे जे सुचेल ते ते,
खपेल काही, घरात थोडे पडेल काही...
-ज्ञानेश.
====================
(सर्वांना नववर्षाच्या अनेक सदिच्छा..!)
प्रतिसाद
गंभीर समीक्षक
गुरु, 01/01/2009 - 14:47
Permalink
प्रथम तुज पाहता..
कवी ज्ञानेश,
आमच्या फर्माईशीमुळे गझल रचल्याबद्दल धन्यवाद! नववर्षाच्या शुभेच्छा!
प्रथम एका ठिकाणी एकच चूक झाली आहे ती सुधारून गझल संपादीत करावीस अशी अपेक्षा.
बाकी प्रतिसाद आम्ही नंतर देऊच.
बोलू का
शुक्र, 02/01/2009 - 10:45
Permalink
ठीक++
एक बदल सुचवावासा वाटतो.
तुझे ठसे चेहर्यात माझ्या नकोस शोधू,
(मनात डोकावुनी पहा.. सापडेल काही !)
गझल तशी ठीकच आहे. पण आपण नवे असल्याने ++.
नववर्षाच्या शुभेच्छा!
(तसा मी फारसा बोलत नाही.)
सुनेत्रा सुभाष
शुक्र, 02/01/2009 - 12:49
Permalink
प्रतिसाद
मतला व शेवटचा शेर छान.
अजय अनंत जोशी
शुक्र, 02/01/2009 - 22:31
Permalink
व्वा!
सुखा, तुझे नेमके इरादे मला कळू दे..
नको विचारू- "व्यथा तुला आवडेल का ही?"
हा शेर सुखासुखी सुचला आहे काय? असेल तर पुन्हा आलात की माझ्यातर्फे चहा-कॉफी. (इतर मी काही घेत नाही ना.)
कलोअ चूभूद्याघ्या
अनंत ढवळे
शनि, 03/01/2009 - 11:45
Permalink
चिन्हांचा अतिवापर
कवितेतील ओळी मुळातच भावसुचक असल्याने, विरामचिन्हे, उद्गारवाचक चिन्हे यांची गर्दी नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे. गझल चांगलीच आहे, पण बहुतेक शेर यमकाचा दोर धरून पुढे येताहेत असे वाटते.
गंभीर समीक्षक
शनि, 03/01/2009 - 12:04
Permalink
चिंन्हांचा अतिवापर!
कवी अनंत यांचे हे मत आम्हालाही मान्य आहे. 'गझल' हा सर्वसाधारणपणे 'लिहिण्यापेक्षा' 'ऐकवला जाणारा' काव्यप्रकार आहे. ऐकवताना उद्गारवाचक चिन्हे, अवतरण चिन्हे ही देहबोलीतूनच प्रकट होतात. जगजीत सिंघ किंवा गुलाम अलींनी गायलेली गझल जर सी डी वर ऐकली तर आपल्याला देहबोलीसुद्धा दिसू शकत नाही. अशा वेळेस आपण फक्त शब्दफेकीकडे लक्ष देतो. तेव्हा लिहिलेल्या गझलचे सौंदर्य चिन्हांनी प्रभावित होऊ नये असे आम्हालाही वाटते.
या गझलेतील एक क्षुल्लक चूक दुरुस्त केल्यावर आम्ही बाकी प्रतिसाद देऊच!
भूषण कटककर
शनि, 03/01/2009 - 14:34
Permalink
सहजता आवडते.
मतला अन मक्ता! उच्च! मस्त ज्ञानेश्...एकदम सराईतपणा वाटतो आपल्या गझलेत! म्हणजे सराईत गझलकार आहातच, पण अगदी सहजता दिसून येते.
ज्ञानेश.
शनि, 03/01/2009 - 20:37
Permalink
आभार.
समीक्षक, बोलका, सुनेत्राजी, जोशी साहेब, मा. अनंत ढवळे आणि भूषण..
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
@समीक्षक- "तुला चांदणे.." आणि (बहुधा) "जुन्या स्मृतींनो" या ठिकाणी वृत्त गडबडले आहे. ते लिहितांना नाही, पण टाईप करतांना लक्षात आले होते. पण चांगला बदल न सुचल्याने तसेच पोस्ट केले आहे.
तुमच्या सविस्तर प्रतिसादाची वाट पाहतोय.
@मा. अनंत ढवळे -मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. वाचणार्याला अर्थ नीट कळावा म्हणून विरामचिन्हे वापरतो. मात्र यापुढे त्यांचा अतिवापर आणि 'यमकानुसारीत्व' टाळेन.
@जोशी साहेब- मी पण चहा-कॉफी वालाच आहे हो!
"सुरा म्हणाली असा पिणारा कुठेच नाही.." हे फक्त गझलेपुरतेच !! :)
चांदणी लाड.
सोम, 05/01/2009 - 10:33
Permalink
ज्ञानेश.मत
ज्ञानेश.
मतला,
पहा कधी ना कधी असेही घडेल काही..
नसेन मी, त्यामुळे तुझेही अडेल काही ! (वा!!)
जडेल, आवडेल, पडेल ..शेर आवडले.
तिलकधारी
सोम, 05/01/2009 - 22:05
Permalink
असे करू नये.
प्रिय मित्र ज्ञानेश,
असे तर अजिबातच करू नये.
अत्यंत चांगली गझल करणे हे इतरांना न्युनगंड देणारे ठरू शकते की नाही?
प्रिय कवी अनंत,
( चिन्हांचा अति वापर )
तुझे विचार वाचले बर का?
बहुतेक विचार यमकाचा दोर धरुन पुढे येत आहेत असे वाटले - म्हणजे काय रे? जरा हे विधान सिद्ध करण्यासाठी हीच गझल आणि स्वतःची कुठलीही एक गझल घे पाहू.
तुला असे तर म्हणायचे नाही ना? की तुला सुचणारे विचारच मुळी नेमके तेच यमक घेउन येतात अन बिचारे छान बाळासारखे येऊन सांगीतलेल्या गझलेत बसतात?
तसे असेल तर जरा उदाहरणासहित सिद्ध कर पाहू?
प्रसाद लिमये
मंगळ, 06/01/2009 - 13:41
Permalink
अढी जराशी,
अढी जराशी, ललाटरेषा बनून गेली..
मला भिती- प्राक्तनास आता नडेल का ही?
सुरेख कल्पना..... इथल्या बर्याचशा सभासदांचे लेखन वाचताना मनात येते की आपल्याला ह्या असल्या कल्पना का नाही सुचू शकत ( उदा - प्रदीप कुलकर्णी यांचे बरेचसे शेर ).. हा शेर त्यातला
निलय
गुरु, 24/12/2009 - 12:19
Permalink
मी सध्या हेच करतोय
मी सध्या हेच करतोय ना...
लिहून टाका खुशाल जे जे सुचेल ते ते,
खपेल काही, घरात थोडे पडेल काही...
सहज सुंदर !