मी पाहिले उजळूनही...


मी पाहिले उजळूनही अन पाहिले निखळूनही
पण जाणले नाहीस तू लांबूनही , जवळूनही

मग शेवटी कळले मला होतो किती पाण्यात मी
पाणीच होतो शेवटी दर्यापरी उसळूनही

ह्या आसवांना एकदा शिक्षाच केली पाहिजे
उरतात का ओल्या स्मृती सा-या व्यथा निथळूनही

आयुष्यभर जगलो तुझ्या त्या मस्त बेतासारखा
होतो तुझ्या लक्षात मी कित्येकदा उधळूनही

तो वेगळा होता गुन्हा , ती वेगळी होती सजा
ती कैद नाही संपली त्या साखळ्या वितळूनही

तूर्तास हे गोंजारणे बाजूस राहू दे मना
मागेपुढे केव्हातरी जाईन मी हुरळूनही

आता तुम्हाला कोणते कारण जगाया द्यायचे?
नाही समाधानी तुम्ही माझे जिणे चघळूनही

-- वैभव जोशी  


प्रतिसाद

छान गझल आहे. हल्ली मला 'ळ' हे अक्षर काफियात घ्यायची भीती वाटते. त्याला जु 'ळ' वा जु 'ळ' व म्हणतात. आपले अभिनंदन.
तूर्तास हे गोंजारणे बाजूस राहू दे मना
मागेपुढे केव्हातरी जाईन मी हुरळूनही

व्वा! सुंदर शेर.

माझे जिणे चघळूनही - उत्तम शेर आहे. खरोखर उत्तम शेर आहे. तसाचः
व्यथा निथळूनही हा एक उत्तम शेर आहे.
उधळूनही व वितळूनही मधे काय म्हणायचे आहे ते समजले नाही.
 

उसळून, निथळून, हुरळून हे शेर फारच मस्त आहेत!!

तूर्तास हे गोंजारणे बाजूस राहू दे मना
मागेपुढे केव्हातरी जाईन मी हुरळूनही
 
व्वा !


ह्या आसवांना एकदा शिक्षाच केली पाहिजे
उरतात का ओल्या स्मृती सा-या व्यथा निथळूनही
सुरेख...

आयुष्यभर जगलो तुझ्या त्या मस्त बेतासारखा
होतो तुझ्या लक्षात मी कित्येकदा उधळूनही
मस्त...

फार फार आवडले हे शेर.

क्या बात है ! मग शेवटी कळले मला होतो किती पाण्यात मी
पाणीच होतो शेवटी दर्यापरी उसळूनही>> उच्च 

अ...फ...ला...तू... न....
बस... फक्त वाचतच रहावी असं वाटतं...

   अतिशय मनाला छेद देतेय !